क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च ‘राजीव गांधी खेल रत्न’ (Khel Ratna) या राष्ट्रीय पुरस्काराचे नाव बदलून ‘मेजर ध्यानचंद खेल रत्न’ असे करण्यात आल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली. त्याबद्दल भाजप नेते आणि समर्थक मोदींना धन्यवाद देण्यासाठी एक ग्राफिक्स सोशल मीडियात पोस्ट करत आहेत त्यातील मेडल ‘परम वीर चक्र’ (Param Vir Chakra) पुरस्काराचे आहे.
भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा यांनीही तेच ग्राफिक ट्विट केले आहे. यावर नामांतराबाबत मोदींना धन्यवाद देणारा मजकूर आहे. मोदींचा मोठा फोटो आहे आणि उजव्या कोपऱ्यात छोट्या आकारात हॉकीचे जादुगार समजले जाणाऱ्या मेजर ध्यानचंद यांचा धुरकटसा फोटो आहे. याच ग्राफिकवर डाव्या बाजूला वर एका मेडलची इमेज आहे.
पुरस्काराच्या नामांतराविषयी बातम्या देताना राष्ट्रीय माध्यमांनीही त्याच मेडलची प्रतिमा वापरली आहे.
भाजपच्या अनेक समर्थकांनी आपापल्या व्हॉट्सऍप स्टेटसवरही तेच ‘BJP4India’ ने बनवलेले ग्राफिक ठेवल्याचे निदर्शनास येत आहे.
पडताळणी:
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर हँँडलवरून ‘लोक आग्रहास्तव पुरस्काराचे नामांतर करत असल्याचे’ ६ ऑगस्ट २०२१ रोजी ट्विट केले. (Khel Ratna)
- याच घोषणेवर समर्थन नोंदवत आणि धन्यवाद देत भाजप नेते आणि समर्थकांनी सोशल मिडियामध्ये पोस्ट्स केल्या होत्या.
- संबित पात्रा यांच्या ट्विटला रिप्लाय देत सुजन दत्ता यांनी ‘परम वीर चक्र’ (Param Vir Chakra) पुरस्काराच्या मेडलचा फोटो वापरल्याचे निदर्शनास आणून दिले.
- याविषयी आम्ही पडताळणी केली असता ‘इंडीयन एअर फोर्स’च्या अधिकृत वेबसाईटवर ते मेडल ‘परम वीर चक्र’ (Param Vir Chakra) पुरस्काराचेच असल्याचे लक्षात आले.
- शत्रूच्या उपस्थितीत अतुलनीय शौर्य किंवा आत्मत्यागासारख्या धाडसी कामगिरीस हा सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्कार दिला जातो. आजवर २१ वीरांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे, त्या पैकी १४ पुरस्कार मरणोत्तर दिले गेले.
- ते मेडल जर ‘परम वीर चक्र’ पुरस्काराचे असेल तर ‘खेळ रत्न’ (Khel Ratna) पुरस्काराचे मेडल नेमके कसे आहे याविषयी आम्ही शोधाशोध केली असता ‘ऍथलेटीक्स फेडरेशन ऑफ इंडिया’च्या वेबसाईटवर मेडलचा फोटो आम्हाला मिळाला.
- ऑलिम्पिक स्पर्धेत रायफल निशाणेबाजीमध्ये कांस्य पदक जिंकलेल्या गगन नारंग यांना भारत सरकारने खेलरत्न (Khel Ratna) पुरस्काराने गौरवान्वित केले होते. गुगल सर्चमध्ये आम्हाला त्यांना प्रदान करण्यात आलेल्या मेडलचा फोटो मिळाला. त्यावर नारंग यांचे नाव, भारताची राजमुद्रा आणि पुरस्काराचे नाव आहे.
वस्तुस्थिती:
‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीत हे स्पष्ट झाले की भाजप नेते, समर्थक आणि वृत्त वाहिन्या ‘खेल रत्न’ (Khel Ratna) पुरस्कारचे मेडल म्हणून वापरत असलेली प्रतिमा अतुलनीय शौर्यासाठी दिल्या जाणाऱ्या राष्ट्रीय पुरस्काराच्या ‘परम वीर चक्र’च्या (Param Vir Chakra) मेडलची प्रतिमा आहे.
हेही वाचा: संबित पात्रा यांची मुलगी मुस्लीम मुलासोबत फरार झाल्याने ‘लव्ह जिहाद’ कायद्यान्वये आरोपी?
(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती आमच्या (9172011480) या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.
आपण फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता)
[…] […]
[…] […]