भारतीय भालाफेकपटू नीरज चोप्राने (Neeraj Chopra) टोकियो ऑलिम्पिकमध्ये (tokyo olympics) इतिहास घडविताना भारतासाठी अथेलेटिक्समधले पहिले सुवर्णपदक जिंकले. नीरजच्या या सुवर्ण कामगिरीनंतर सोशल मीडियावर नीरजचा प्रतिस्पर्धी पाकिस्तानी भालाफेकपटू अरशद नदीमने (Arshad Nadeem) नीरज आपला आदर्श असल्याचे सांगत त्याला शुभेच्छा दिल्याचा दावा करणारं ट्विट प्रचंड व्हायरल झालं.
मुख्य प्रवाहातल्या अनेक माध्यमांनी या ट्विटच्या आधारे अरशद नदीमने नीरज आपला आदर्श असल्याचं सांगितल्याचा बातम्या देखील दिल्या. न्यूज १८ लोकमत, लोकसत्ता, इंडिया टीव्ही, झी न्यूज, द न्यू इंडियन एक्स्प्रेसने यासंदर्भात बातम्या दिल्या होत्या.
“सुवर्णपदक जिंकल्याबद्दल माझा आदर्श नीरज चोप्राचे अभिनंदन. सॉरी पाकिस्तान, मी तुमच्यासाठी सुवर्णपदक जिंकू शकलो नाही” अशा प्रकारचं ट्विट अरशद नदीमने केल्याचं सांगण्यात आलं होतं.
पडताळणी:
पाकिस्तानच्या भालाफेकपटू अरशद नदीमचं (Arshad Nadeem) म्हणून सांगण्यात आलेल्या ट्विटर हॅण्डलवरून करण्यात आलेल्या जुन्या ट्विट्सच्या रिप्लायमध्ये हे अकाउंट फेक असून पूर्वी या अकाउंटचं नाव सईद अन्वर आणि हॅण्डल ‘@css_25’ असं असल्याचं सांगण्यात आलं होतं.
आम्ही जेव्हा ट्विटरवर ‘@css_25’ या हॅण्डलसह शोध घेतला त्यावेळी एका युजरने @arshadnadeempak या हॅण्डलला दिलेला रिप्लाय समोर आला. ‘@css_25’ हे हॅण्डल गुगलवर शोधले असता सईद अन्वर या नावाने चालवल्या गेलेल्या ट्विटर अकाउंटचे अर्काइव्ह मिळाले.
त्यानंतर आम्ही @arshadnadeempak या ट्विटर अकाऊंटची प्रोफाइल आयडी आणि सईद अन्वर या नावाने चालवल्या गेलेल्या अकाऊंटच्या प्रोफाइल आयडीची एकमेकांशी तुलना केली असता दोन्ही हँडलचे ट्विटर आयडी एकच असल्याचे आढळून आले. दोन्ही ट्विटर आयडी एकच आहेत, याचाच अर्थ असा की दोन्ही अकाउंट देखील एकच आहेत.
सध्या @arshadnadeempak या हँडलच्या आधारे पाकिस्तानी भालाफेकपटू अरशद नदीमचं म्हणून चालवलं जात असलेलं अकाउंट पूर्वी पाकिस्तानी क्रिकेटर सईद अन्वरच्या नावाने चालवलं जात होतं. याच अकाऊंटचं नाव बदलून सध्या ते अरशद नदीम असं करण्यात आलंय.
अजून एक महत्वाची महत्वाची बाब म्हणजे सुरुवातीला हे अकाऊंट अरशद नदीमचे अधिकृत अकाउंट असल्याचे सांगण्यात आले होते. आता मात्र या अकाऊंटच्या बायोमधील माहिती देखील बदलण्यात आली आहे.
वस्तुस्थिती:
‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की पाकिस्तानी भालाफेकपटू अरशद नदीमने नीरज चोप्रा आपला आदर्श असल्याचे सांगत त्याला शुभेच्छा दिल्याचा दावा करणारं ट्विट फेक आहे.
अरशद नदीमने अशा प्रकारचं कुठलंही ट्विट केलेलं नसून अरशद नदीमच्या नावे चालवल्या जात असलेल्या फेक अकाउंटवरून हे ट्विट करण्यात आलं होतं, जे नंतर डिलीट केलं गेलं.
हेही वाचा- भाजप नेते ‘खेल रत्न’ पुरस्काराचे म्हणून फिरवत आहेत ‘परम वीर चक्र’ पुरस्काराचे मेडल!
(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती आमच्या (9172011480) या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.
आपण फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता)
Be First to Comment