‘भगत सिंह, राजगुरु के साथ कुर्बान हुसैन को हुई थी फाँसी’: मराठी किताब में स्वतंत्रता सेनानी सुखदेव के नाम से छेड़छाड़
इयत्ता आठवीच्या बालभारतीच्या पुस्तकातील एका वाक्यावरून महाराष्ट्रात राजकारण तापलं आहे. आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडताहेत. याविषयी बातमी करताना ‘ऑपइंडिया’ (OpIndia) ने मजकुरात काय लिहिलंय पहा.
‘आमतौर पर इतिहास पढ़ते हुए हमेशा भगत सिंह और राजगुरु के साथ सुखदेव का नाम सबको याद आता है। लेकिन 8वीं कक्षा की बालभारती किताब में उनका नाम कुर्बान हुसैन बताया गया है। साथ ही इसमें ये भी लिखा कि कुर्बान हुसैन को ही भगत सिंह और राजगुरु के साथ लाहौर घटना के बाद फाँसी सुनाई गई थी।’
या बातमीचे स्क्रिनशॉट सोशल मीडियातही व्हायरल होत असल्याचे ‘चेकपोस्ट मराठी’चे वाचक सलीम गवंडी यांनी निदर्शनास आणून दिले.
पडताळणी:
‘ऑपइंडिया’ ने खरंच अशी बातमी दिलीय का हे तपासण्यासाठी आम्ही त्यांच्या वेबसाईटवर जाऊन क्रॉसचेक केलं. त्यावेळी खरोखर ही आहे अशीच बातमी आम्हाला सापडली.
बातमीतील उल्लेखाप्रमाणे ईयत्ता आठवीच्या बालभारतीच्या पुस्तकात वाक्य आहे का हे आम्ही तपासून पाहण्याचं ठरवलं. बालभारतीचं पुस्तक मिळवून तो धडा शोधला. पान क्रमांक २ वर ‘यदुनाथ थत्ते’ लेखक असणारा ‘माझ्या देशावर माझे प्रेम आहे’ या शीर्षकाचा तो पाठ आहे. यामध्ये एका शाळेच्या भेटीत विद्यार्थ्यांसोबत झालेला संवाद लेखकाने मांडला आहे.
पाठातील मजकूर:
“देशावर प्रेम करायचे तर भूमी आणि भूमिपुत्र, दोघांवर प्रेम हवे, होय न?”
“बरोबर आहे.” मुले म्हणाली.
एक मुलगा म्हणाला, “भगतसिंह, राजगुरू, कुरबान हुसेन हे फासावर गेले. ते देशावर खरेखुरे प्रेम करत होते.”
मी विचारले,”ते खरेच आहे; पण आता त्यांच्यासारखे प्रेम करायचे तर देश पुन्हा गुलाम व्हायला हवा? आपले देशावर प्रेम असते ते फक्त आपत्काळी असते, की नेहमी असायला हवे?”
एक मुलगा म्हणाला,” नेहमीच करायला हवे. आपल्याला प्रेम दाखवायला संधी मिळावी, म्हणून संकटांना आमंत्रण थोडेच द्यायचे?”
या धड्यातील मजकुरात ‘भगतसिंह, राजगुरू आणि कुरबान हुसेन’ यांना लाहोर घटनेनंतर एकाच वेळी फाशी झाली असा उल्लेख कुठेही नाही. मजकुरात केवळ तिघेही देशासाठी फासावर गेले असाच उल्लेख आहे.
विरोधकांचे आरोप:
‘ऑपइंडिया’ (OpIndia)च्या बातमीमध्ये असे म्हंटले आहे की ‘इस मामले के प्रकाश में आने के बाद विपक्ष लगातार महा विकास अघाड़ी सरकार पर बच्चों का ब्रेनवॉश करने का इल्जाम लगा रहा है।’
ABP माझा सोबत बोलताना ‘अखिल भारतीय ब्राह्मण महासंघा’ने ‘आठवीच्या विद्यार्थ्यांना चुकीचा ईतिहास शिकवला जातोय हे निंदनीय असल्याचे म्हंटले आहे.
भाजप आमदार राम कदम यांनी ‘यांचा किमान समान कार्यक्रम ईतिहास बदलण्याचा आहे असं च यावरून दिसत असल्याचं सांगत महाविकास आघाडीवर टीकास्त्र सोडलेय.
पुस्तकाच्या निर्मितीशी महाविकास आघाडीचा संबंध:
इयत्ता आठवीच्या बालभारतीच्या सर्वात पहिल्या पानावर वरती ‘शासन निर्णय क्रमांक : अभ्यास-२११६/(प्र.क्र.४३/१६) एसडी-४ दिनांक २५.४.२०१६ अन्वये स्थापन करण्यात आलेल्या समन्वय समितीच्या दि. २९.१२.२०१७ रोजीच्या बैठकीमध्ये हे पाठ्यपुस्तक सन २०१८-१९ या शैक्षणिक वर्षापासून निर्धारित करण्यास मान्यता देण्यात आली आहे.‘ अशी माहिती आहे.
म्हणजे या पुस्तकाला परवानगी २०१६ साली मिळाली असून २०१८-१९ सालापासून हे पुस्तक अभ्यासक्रमात आहे. यातील मोठ्या कालावधीत महाराष्ट्रात महाविकास आघाडीची सत्ता नव्हती. याचाच अर्थ असा की या पुस्तक निर्मितीशी महाविकास आघाडीचा काडीचाही संबंध नाही.
मूळ पुस्तकात काय आहे?
धड्याच्या सुरुवातीलाच लेखक परिचयात हा धडा ‘यदुनाथ थत्ते’ यांच्या ‘प्रतिज्ञा’ या पुस्तकातून घेतलेला असल्याचे समजले. ‘अक्षरनामा’चे संपादक राम जगताप यांच्या सहकार्याने मूळ पुस्तकातील मजकुराचे फोटोज आम्हाला मिळाले. यातही कुरबान हुसेन असाच उल्लेख असून. त्यामध्ये सुद्धा कुठेही तिघे एकाचवेळी फासावर गेल्याचा दावा करण्यात आलेला नाही.
कुरबान हुसेन कोण होते?
लोकमतने या विषयावर केलेल्या बातमीत कुरबान हुसेन यांच्याविषयी विस्तृत माहिती वाचायला मिळते.
अब्दुल रसूल कुरबान हुसेन हे सोलापूर येथील स्वातंत्र्य चळवळीतले पत्रकार होते. कुरबान हुसेन यांना इंग्रजांनी स्वातंत्र्यलढ्यातील सहभागाबद्दल दोषी ठरवून १२ जानेवारी १९३१ रोजी फासावर चढविले. त्यावेळी त्यांचे वय अवघे २२ वर्षे होते.
सोलापुरातील मलप्पा धनशेट्टी, जगन्नाथ शिंदे, कुरबान हुसेन आणि किसन सारडा या हुतात्म्यांचे नाव आजही स्वातंत्र्य लढ्याच्या सुवर्णाक्षरांत कोरले गेले आहे.
ऑपइंडिया काय आहे?
‘ऑपइंडिया’ (OpIndia) ही उजव्या विचारधारेची न्यूज वेबसाईट असून हिंदी आणि इंग्रजी दोन्ही भाषांत बातम्या पब्लिश करते. Newslaundry या पोर्टलने दिलेल्या एका रिपोर्टमध्ये ऑपइंडिया ही द्वेष पसरवणारी न्यूज वेबसाईट असल्याचा उल्लेख करण्यात आलाय. या दाव्याची पुष्टी करण्यासाठी त्यांनी काही पुरावे आणि हायपरलिंक सुद्धा दिलेल्या आहेत.
ऑपइंडिया द्वेष परवत असल्याच्या कारणावरून वेबसाईटच्या काही जाहिरातदारांनी यापुढे वेबसाईटला जाहिरात न देण्याचे धोरण स्वीकारले आहे.
वस्तुस्थिती:
‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये हे स्पष्ट झाले आहे की इयत्ता आठवीच्या बालभारतीच्या पुस्तकातील मजकुरात कसलीही छेडछाड करण्यात आलेली नाही.
मजकुरात कुठेही भगतसिंह, राजगुरू आणि कुरबान हुसेन यांना एकाच वेळी, एकाच खटल्यात फासावर चढविण्यात आल्याचा उल्लेख नसताना, लेखकाचाही तसा दावा नसताना शिवाय त्या पुस्तकाच्या निर्मितीचा महाविकास आघाडी सरकारशी संबंध नसताना विनाकारण चुकीच्या माहितीच्या आधारे जनतेच्या मनात भ्रम निर्माण करण्यात येत आहे.
हे ही वाचा- कोरोना साथीला बनावट म्हणणारे डॉ. विश्वरूप आणि हर्षद रुपवतेंचा लेख किती विश्वासपात्र?
[…] हेही वाचा: ‘महाविकास आघाडी’ सरकारवर निशाणा साधण… […]
[…] हेही वाचा: ठाकरे सरकारने आठवीच्या पुस्तकात भगतस… […]