कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेने देशात थैमान घातल्यानंतर आता गेल्या काही दिवसांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या काहीशी कमी होताना दिसतेय. मात्र गेल्या काही दिवसातल्या भारतातल्या कोरोना कहराच्या काळात आंतरराष्ट्रीय माध्यमांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि सरकारच्या कामगिरीवर अत्यंत कठोर भाषेत ताशेरे ओढण्यात आले आहेत. अशातच आता सोशल मीडियावर एका वृत्तपत्राचं कटिंग मोठ्या प्रमाणात व्हायरल होतंय. या कटिंगच्या आधारे दावा केला जातोय की अमेरिकी डेटा रिसर्च संस्थेने कोरोना विरुद्धच्या लढाईत पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्वात आघाडीवर असल्याचं जाहीर केलंय.
‘कोरोना के खिलाफ जंग में मोदी टॉप पर’ या हेडलाइनखालील बातमीचं कात्रण शेअर केलं जातंय. पंतप्रधान मोदींनी जगभरातील सर्व नेत्यांना मागे टाकून कोरोनाविरुद्धची लढाई प्रभावीपणे लढणाऱ्या नेत्यांच्या यादीत पहिले स्थान पटकावले असल्याचा दावा केला जातोय. जगभरात मोदींच्या नेतृत्वाचा डंका वाजत असल्याचं सांगितलं जातंय.
अर्काइव्ह पोस्ट
फेसबुकवर देखील अशाच प्रकारचे दावे केले जाताहेत.
पडताळणी:
सोशल मीडियावर शेअर केल्या जात असलेल्या बातमीचे कात्रण आपण व्यवस्थित बघितले तर त्यात १० नेत्यांच्या यादीमध्ये अमेरिकेचे डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) आणि जपानचे शिंजो आबे (Shinzo Abe) यांचा देखील समावेश आहे. ट्रम्प या यादीत आठव्या स्थानावर असल्याचं बघायला मिळतंय, तर आबे सर्वात शेवटच्या म्हणजे दहाव्या स्थानावर असल्याचं दिसतंय.
गमतीची गोष्ट अशी की ट्रम्प आणि आबे हे दोघेही नेते सध्या अनुक्रमे अमेरिका आणि जपानचे ‘माजी’ राष्ट्रप्रमुख झालेले आहेत. ट्रम्प यांच्या जागी जो बायडन हे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदावर विराजमान आहेत, तर जपानचे पंतप्रधान म्हणून योशिहिडे सुगा यांनी शिंजो आबे यांची जागा घेतली आहे. म्हणजेच सदर बातमी बरीच जुनी आहे, हे प्रथमदर्शनीच स्पष्ट होते.
बातमी नेमकी कधीची हे शोधण्यासाठी आम्ही गुगलवर किवर्डच्या सहाय्याने शोध घेतला. आम्हाला ‘लाईव्ह हिंदुस्थान’च्या वेबसाईटवर २२ एप्रिल २०२० रोजी म्हणजेच साधारणतः वर्षभरापूर्वी यासंदर्भातील बातमी बघायला मिळाली.
‘लाईव्ह हिंदुस्थान’च्या बातमीनुसार अमेरिकी डेटा रिसर्चर कंपनी ‘मॉर्निंग कंसल्ट’ने कोरोना व्हायरसचा अमेरिकेवर काय परिणाम झाला याचा शोध घेण्यासाठी एक संशोधन केले होते. यामध्ये अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची जगभरातील इतर मोठ्या देशांच्या राष्ट्रप्रमुखांशी तुलना करण्यात आली होती.
‘मॉर्निंग कंसल्ट’ने या संशोधनासाठी १ जानेवारी २०२० ते १४ एप्रिल २०२० या काळातील तपशिलाचा आणि आकडेवारीचा आधार घेतला होता. त्यावेळी मोदींचं अप्रूव्हल रेटिंग ६८ इतकं होतं आणि याबाबतीत मोदी जगात सर्वात आघाडीवर होते.
लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की संशोधनासाठी संकलित करण्यात आलेल्या माहितीच्या काळात भारतात कोरोनाचा फारसा प्रादुर्भाव नव्हता. त्यावेळी भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी मोदींची ही जागतिक आघाडी भारतीयांसाठी अभिमानाची बाब असल्याचं सांगितलं होतं.
दरम्यान, ‘मॉर्निंग कंसल्ट’च्या सर्वात ताज्या सर्वेनुसार मोदींच्या लोकप्रियतेत मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. ‘मॉर्निंग कंसल्ट’कडून ऑगस्ट २०१९ पासून मोदींच्या लोकप्रियतेचा अभ्यास केला जातोय. तेव्हापासून प्रथमच मोदींच्या (Narendra Modi) लोकप्रियतेत एवढ्या मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. कोरोना काळातील मोदी सरकारची वाईट कामगिरी आणि महामारीच्या दुसऱ्या लाटेला थोपविण्यात आलेलं अपयश, ही मोदींची लोकप्रियता घटण्याचं सर्वात मुख्य कारण आहे.
वस्तुस्थिती:
‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की कोरोना विरोधातील लढाईत मोदी आघाडीवर असल्याचा दावा करण्यासाठी ज्या बातमीचा आधार घेतला जातोय, ती वर्षभरापेक्षा जुनी आहे. वर्षभरापूर्वीच्या बातमी आधारे दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
Be First to Comment