Press "Enter" to skip to content

दिल्लीतील शेतकरी आंदोलन ‘खलिस्तानी’ लोकांनी ‘हाय जॅक’ केल्याच्या दाव्यात किती तथ्य?

सोशल मीडियात एक व्हिडीओ व्हायरल होतोय. केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांच्या विरोधात छेडण्यात आलेले शेतकऱ्यांचे आंदोलन ‘खलिस्तानी’ विचारधारेच्या लोकांनी ‘हाय जॅक’ केले (khalistan in farmers protest) असल्याचा दावा या व्हिडिओच्या माध्यमातून केला जातोय.

व्हिडिओ सह व्हायरल होणारा मेसेज:

‘किसान आंदोलन high jack हो गया है। खालिस्तानी की माँग करने वाले गद्दारो ने देश विरोधी नारे दिए। गली गली में शोर है, भारत माता चोर है। खालिस्तान जिंदाबाद। अरे भाई कोनसे किसान है ये? हिन्दुस्तान के टुकड़े होने के इन देशद्रोहीयो गद्दारो के सपने कभी पुरे नही होने देंगे, हिन्दुस्तान एक है एक ही रहेगा, #SayNoToBharatBandh #KisanStandsWith Modi’

‘हिंदू है हम’ या फेसबुक पेजवरून पोस्ट करण्यात आलेला हा व्हिडीओ तब्बल ७५१ लोकांनी शेअर केला आहे.

These r the supporters & fund-raisers of protestors. They r chanting "Bharat Mata chor hai". This is why whole nation is…

Posted by HINDU HAI HUM on Friday, 4 December 2020

हेच दावे ‘हिंदू राष्ट्र संघ‘, ‘उपदेश राणा समर्थक’ या अशा फेसबुक पेजेस आणि ग्रुप्सवरूनही शेअर करण्यात आले आहेत. झी न्यूजचे मुख्य संपादक सुधीर चौधरी यांच्या नावाने चालवल्या जात असलेल्या फेसबुक फॅनपेज वरूनही सदर व्हिडीओ शेअर केला गेलाय. याविषयी ‘चेकपोस्ट मराठी’चे वाचक धनंजय सातारकर यांनी माहिती दिली आणि पडताळणीची विनंती केली.

पडताळणी:

व्हायरल व्हिडीओ निरखून पाहिल्यास त्यात दिसणारे रस्ते, आजूबाजूचा परिसर भारतातील असल्याचे काही जाणवत नाही. त्यामुळे त्यात दिलेल्या घोषणाच कीवर्ड्स म्हणून वापरल्या तेव्हा १२ जून २०१८ रोजी फेसबुकवर अपलोड केला गेलेला एक व्हिडीओ आम्हाला सापडला. तो व्हायरल व्हिडीओशी तंतोतंत जुळणारा असून स्पष्ट दिसणारा आहे.

ਗਲੀ ਮੇ ਛੋਰ ਹੈ ਹਿੰਦੂਆਂ ਦੀ ਮਾਤਾ ਚੋਰ ਹੈ !!ਸਾਨਫ੍ਰਾੰਸੱਸਕੋ ਅਜ਼ਾਦੀ ਮਾਰਚ ੨੦੧੮

Posted by Hardeep Singh Khalsa on Monday, 11 June 2018

या व्हिडीओच्या ०.३८ व्या सेकंदाला आंदोलकांनी घातलेल्या टीशर्टवरील मागच्या बाजूस लिहिलेले शब्द स्पष्ट दिसत आहेत. त्यांवर ‘MARCH FOR FREEDOM OF KHALISTAN’ असे लिहिलेले असून त्या खाली ‘San Francisco’ चा उल्लेख आहे.

khalistani in farmers protest claim is fake
Source: Facebook

या मोर्चाविषयी’सॅन फ्रॅन्सिस्को’च्या ‘KQED’ या न्यूज पोर्टलवर ११ जून २०१८ रोजी बातमी सुद्धा प्रसिद्ध झाली होती. ‘Thousands of California Sikhs March in Annual Remembrance Rally’ या मथळ्याखाली असलेल्या बातमीत आंदोलनाचे ठिकाण ‘सॅन फ्रॅन्सिस्को असेच सांगितले आहे.

वस्तुस्थिती:

शेतकरी आंदोलन खलिस्तान समर्थकांचेच (khalistan in farmers protest) असल्याच्या दाव्यासह ‘भारत माता चोर’असल्याच्या घोषणा देण्यात येत असलेला व्हायरल व्हिडिओ दिल्ली येथील शेतकरी आंदोलनातील नाही. व्हिडीओ साधारणतः दोन वर्षांपूर्वीचा असून २०१८ साली अमेरिकेतील’ सॅन फ्रॅन्सिस्को येथे खलिस्तान समर्थकांनी काढलेल्या मोर्चाचा आहे.

दोन वर्षापूर्वी कॅलीफोर्नियामध्ये झालेल्या मोर्चाचा सध्याच्या दिल्लीतील शेतकरी आंदोलनाशी काहीएक संबंध नाही. सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडीओसोबत केली जाणारे दावे फेक आहेत. शेतकरी आंदोलनाला बदनाम करण्याच्या उद्देश्याने अशा प्रकारचे दावे केले जाताहेत.

हेही वाचा: ‘भारत बंद’मध्ये भाजीपाल्याची नासधूस केल्याचे सांगत भाजप कार्यकर्ते फिरवताहेत जुना फोटो!

More from राजकारणMore posts in राजकारण »

2 Comments

Leave a Reply

Your email address will not be published.

× न्यूज अपडेट्स मिळवा