सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होतोय. व्हायरल व्हिडिओच्या आधारे दावा केला जातोय की मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान (Shivraj Singh Chouhan) यांनी देशाच्या स्वातंत्र्य दिनी तिरंगा या राष्ट्रध्वजाऐवजी भाजपचा झेंडा फडकावून ध्वजारोहन केले आणि तिरंगा तसेच देशाचा अपमान केला.
मध्य प्रदेश काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष जीतू पटवारी (Jitu Patwari) यांनी हा व्हिडीओ शेअर केलाय. ट्विटच्या माध्यमातून व्हिडीओ शेअर करताना जीतू पटवारी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांना उद्देशून म्हणतात की वृद्धापकाळात सुद्धा आपल्याला हे समजले नाही की देश पक्षापेक्षा जास्त महत्वाचा आहे. ना मोदींनी “राजधर्म” पाळला, जा आपण राजधर्माचे पालन करत आहात. राष्ट्रध्वजाच्या नावाने पक्षाचा खिसा भरणारेच भाजपच्या झेंड्याला तिरंग्यापेक्षा अधिक महत्व देऊ शकतात.
समाजवादी पक्षाचे प्रवक्ते मनोज काका यांनी देखील हा व्हिडीओ ट्विट करत अशाच प्रकरचा आरोप केलाय.
पडताळणी:
व्हायरल व्हिडिओच्या किफ्रेम्स रिव्हर्स सर्चच्या आधारे शोधल्या असता आम्हाला वरिष्ठ पत्रकार दिनेश शुक्ला यांचे 14 मे 2018 रोजीचे ट्विट बघायला मिळाले. या ट्विटमध्ये सध्या व्हायरल होत असलेला व्हिडीओ बघायला मिळतोय.
आपल्या ट्विट मध्ये शुक्ला सांगतात की मध्य प्रदेशातील चलो पंचायत मोहिमेअंतर्गत शिवराज सिंह चौहान यांनी खजुराहो जवळील खजुआ गावात भाजपच्या ध्वजाचे पूजन केले आणि त्यानंतर राष्ट्रगीत गायले गेले. देशात आता तिरंग्याऐवजी भाजपचा झेंडा फडकवून राष्ट्रगीत गायले जाणार का, असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला होता.
पडताळणी दरम्यान आम्हाला न्यूज बिट्सच्या वेबसाईटवर 15 मे 2028 रोजी प्रसिद्ध बातमी देखील बघायला मिळाली. बातमीनुसार मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान 14 मे रोजी छतरपूरच्या राजनगर पंचायतीमधील खजुवामध्ये गावात ‘चलो पंचायत की ओर’ अभियानात सहभागी झाले होते. या कार्यक्रमादरम्यान त्यांनी पक्षाचा झेंडा फडकावला आणि त्यासमोर राष्ट्रगीत देखील गायले गेले.
वस्तुस्थिती:
‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणी मध्ये स्पष्ट झाले आहे की मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी एका कार्यक्रमा दरम्यान भाजपचा झेंडा फडकावल्यानंतर त्यासमोर राष्ट्रगीत गेल्याच्या घटनेचा व्हिडीओ खरा आहे. परंतु, हा व्हिडीओ या वर्षीच्या स्वातंत्र्यदिन सोहळ्या दरम्यानचा नाही. मे 2018 मध्ये मध्य प्रदेश सरकारच्या एका कार्यक्रमा दरम्यान शिवराज सिंह चौहान यांनी भाजपचा झेंडा फडकावल्यानंतर राष्ट्रगीत गेले गेले होते.
हेही वाचा- सुप्रीम कोर्टाने खासदार आमदारांच्या पेन्शन बंद करण्याचा निकाल सुनावला?
(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती आमच्या (9172011480) या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.
आपण फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता)
Be First to Comment