कर्नाटकातील हिजाब विवादाचे (Hijab Controversy) पडसाद अनेक ठिकाणी पडताहेत. सोशल मीडियावर या संदर्भाने अनेक दावे-प्रतिदावे व्हायरल होताहेत. अभिनेत्री राखी सावंत (Rakhi Sawant) हिचा हिजाब घातलेला एक व्हिडीओ व्हायरल होतोय. या फोटोच्या आधारे दावा केला जातोय की आता राखी सावंतने देखील हिजाब विवादात उडी घेतली असून तिने हिजाबचे समर्थन केले आहे.
‘आयबीसी 24’ या न्यूज चॅनेलच्या अधिकृत फेसबुक चॅनेलवरून 12 फेब्रुवारी रोजी हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आलाय. राखी सावंत जिममध्ये हिजाब घालून पोहोचली असल्याचे व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये सांगण्यात आले आहे.
पडताळणी:
आम्ही किवर्डसच्या साहाय्याने व्हायरल व्हिडीओ नेमका कधीचा आणि कुठला आहे हे शोधण्याचा प्रयत्न केला असता एंटरटेनमेंट टाईम्सच्या वेबसाईटवर 31 ऑगस्ट 2021 रोजी प्रसिद्ध बातमीमध्ये हा व्हिडीओ बघायला मिळाला. व्हिडीओ ऑगस्ट 2021 मधला असल्याने सध्याच्या हिजाब विवादाशी या व्हिडिओचा काहीही संबंध नाही, हे येथेच स्पष्ट झाले.
राखी सावंत हिजाब घालून जिममध्ये पोहोचली. तसेच तिने सनी लिओनी (Sunny Leone) हिच्या ‘बिग बॉस’मधील प्रवेशावर प्रतिक्रिया दिल्याचे बातमीच्या हेडलाईनमध्ये सांगण्यात आले आहे. आपल्या मैत्रिणीने आपल्याला हिजाब दिला असून हिजाबच्या आत जिमचे कपडे घातलेले असल्याचे, राखी सावंत उपस्थित माध्यम प्रतिनिधींना सांगत असल्याचे या व्हिडिओमध्ये बघायला मिळतेय.
कोईमोईच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरून देखील 31 ऑगस्ट 2021 रोजीच राखीचा हिजाबमधील व्हिडीओ पोस्ट करण्यात आला होता.
वस्तुस्थिती:
‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की राखी सावंतच्या हिजाबमधील व्हिडिओचा सध्याच्या कर्नाटकमधील हिजाब विवादाशी काहीही संबंध नाही. राखी सावंतचा हिजाबमधील व्हिडीओ साधारणतः पाच महिन्यांपूर्वीचा आहे. ऑगस्ट 2021 मध्ये राखी सावंत हिजाब परिधान करून जिममध्ये पोहोचली होती. त्यावेळी हा व्हिडीओ रेकॉर्ड करण्यात आला होता.
हेही वाचा- हिजाब विवाद: धर्म रक्षणासाठी कर्नाटकातील हिंदू मुले उतरली रस्त्यावर?
(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती ‘चेकपोस्ट मराठी’च्या (9172011480) या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.
आपण फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता)
Be First to Comment