Press "Enter" to skip to content

नितीश कुमार यांनी पुन्हा कधीच ‘राष्ट्रीय जनता दला’ सोबत युती न करण्याची शपथ घेतली होती?

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) यांनी भाजपशी असलेली युती तोडून लालू प्रसाद यादव (Lalu Prasad Yadav) यांच्या राष्ट्रीय जनता दलाशी हातमिळवणी केली आहे. नितीश यांनी पुन्हा एकदा बिहारचे मुख्यमंत्री म्हणून तर राष्ट्रीय जनता दलाच्या तेजस्वी यादव (Tejaswi Yadav) यांनी उप-मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे.

Advertisement

बिहारमधील सत्तापालटाच्या या नाट्यानंतर आता सोशल मीडियावर नितीश कुमार यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत असल्याचे बघायला मिळतोय. व्हिडिओमध्ये नितीश कुमार म्हणताहेत, “यानंतर कुठल्याही परिस्थितीत परत जाण्याचा प्रश्नच नाही. कुठल्याही परिस्थितीत तुमच्याशी कुठलीही आघाडी केली जाणार नाही. आता ते शक्यच नाही. आता तो विषयच संपलेला आहे. कारण तुम्ही विश्वासघात केला आहे.”

नितीश कुमार यांचा विधानसभेतील भाषणाचा हा व्हिडीओ शेअर करताना दावा केला जातोय की हा व्हिडीओ नितीश कुमार यांनी यापूर्वी जेव्हा राष्ट्रीय जनता दलाशी असलेली आघाडी तोडून भाजपसोबत जात सत्ता स्थापन केली होती, त्यावेळचा आहे. त्यावेळी नितीश कुमार यांनी पुन्हा कधीच ‘राष्ट्रीय जनता दला’ सोबत न जाण्याची शपथ घेतली होती.

बिहारच्या गया लोकसभा मतदारसंघातील भाजपचे माजी खासदार हरी मांझी यांनी हा व्हिडिओ ट्विट करून नितीश यांनी यापूर्वी राजदशी युती तोडताना अशा प्रकारचे विधान केले होते, असा दावा केला आहे.

अर्काइव्ह

भाजप प्रवक्ते शहजाद पुनावाला, ‘आज तक’चे अँकर शुभांकर मिश्रा यांनी देखील अशाच प्रकारच्या दाव्यांसह हा व्हिडीओ ट्विट केलाय.

पडताळणी:

आम्ही गुगलवर किवर्डसच्या आधारे शोध घेतला असता दैनिक जागरणच्या वेबसाईटवर 18 फेब्रुवारी 2014 रोजी प्रसिद्ध बातमी बघायला मिळाली. बातमीनुसार बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी विधानसभेत बोलताना पुन्हा भाजपशी हातमिळवणीची शक्यता फेटाळून लावली होती. कुठल्याही परिस्थितीत पुन्हा भाजप बरोबर जाणार नाही. आता तो विषयच संपला असल्याचे त्यांनी म्हंटले होते.

Source: Dainik Jagran

भास्करने देखील यासंदर्भातील बातमी प्रकाशित केली होती. भास्करच्या बातमीनुसार नितीश कुमार म्हणाले होते की, भाजपपासून वेगळं होण्याचा निर्णय भावनिक होऊन घेतलेला नाही, तर अतिशय विचारपूर्वक घेतलेला आहे. त्यांनी भाजपला सभागृहात अविश्वास प्रस्ताव आणण्याचे आव्हान देखील दिले होते. भाजपकडे पुरेसं संख्याबळ असेल तर भाजपने आपले सरकार सरकार पाडून दाखवावे, असे त्यांनी म्हंटले होते.

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की नितीश कुमार यांचा सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडीओ साधारणतः आठ वर्षांपूर्वीचा आहे. शिवाय व्हिडीओ राजदशी आघाडी करण्यासंदर्भातील नसून नितीश कुमार यांचे हे वक्तव्य भाजप संदर्भातील आहे.

हेही वाचा- पगार मागितला म्हणून भाजप आमदाराने कामगारास केली मारहाण? वाचा व्हायरल व्हिडीओचे सत्य!

(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती आमच्या (9172011480) या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.

आपण फेसबुकट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता)

FacebookWhatsAppTwitterTelegram

More from राजकारणMore posts in राजकारण »

Be First to Comment

    Leave a Reply

    Your email address will not be published.

    × न्यूज अपडेट्स मिळवा