सोशल मीडियावर ‘न्यूज 18 हिंदी’ची साधारणतः 2 मिनिटांची एक क्लिप व्हायरल होतेय. व्हिडिओमध्ये काही लोक माध्यमांना प्रतिक्रिया देताहेत. त्यात ते सांगताहेत की भाजप कार्यकर्ते 500 रुपये देऊन लोकांच्या बोटांवर शाई लावताहेत आणि त्यांना मतदान करायला जाण्याची गरज नसल्याचे सांगताहेत.
ज्येष्ठ पत्रकार ओम थानवी यांनी हा व्हिडीओ शेअर केलाय. थानवी यांनी ‘दुनिया का सबसे बड़ा लोकतंत्र!’ अशा कॅप्शनसह शेअर केलेल्या या व्हिडिओचा संदर्भ सध्याच्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीशी जोडला जातोय. थानवी यांचे ट्विट 4600 पेक्षा अधिक युजर्स कडून रिट्विट करण्यात आले आहे.
पडताळणी:
व्हायरल व्हिडिओची सत्यता पडताळण्यासाठी रिव्हर्स सर्चच्या आधारे शोध घेतला असता ‘न्यूज 18 हिंदी’च्या वेबसाईटवर 19 मे 2019 रोजी प्रसिद्ध बातमी मिळाली. बातमीनुसार ही घटना 2019 सालच्या लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातील मतदानापूर्वीची आहे.
उत्तर प्रदेशातील चंदौली लोकसभा मतदारसंघातील ताराजीवनपुर गावातील दलित वस्तीवरील लोकांनी आरोप केला होता की भाजप कार्यकर्त्यांकडून त्यांना मतदान न करण्यासाठी पैसे देण्यात आले. एवढेच नाही तर त्यांना मतदान करता येऊ नये म्हणून मतदानानंतर बोटावर लावली जाणारी शाई देखील त्यांना लावण्यात आली.
याप्रकरणी तक्रार नोंदविण्यात आली होती. दरम्यान, ही घटना मतदान सुरु होण्यापूर्वी उघडकीस आल्यामुळे तक्रारदार मतदानास पात्र होते. त्यांच्या हातावर जबरदस्तीने शाई लावण्यात आल्याचे एफआयआरमध्ये नोंदविल्यावर ते मतदान करू शकतील, असे त्यावेळी एसडीएम हर्ष कुमार यांनी सांगितले होते.
‘न्यूज 18 उर्दू’च्या युटयूब चॅनेलवरून देखील 19 मे 2019 रोजी यासंदर्भातील बातमी देण्यात आली होती.
सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओच्या संदर्भाने चंदौली पोलिसांच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरून देखील ही घटना जुनी असल्याचे सांगण्यात आले आहे.
वस्तुस्थिती:
‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडीओ सध्याचा नसून 2019 लोकसभा निवडणुकांदरम्यानचा आहे. या व्हिडिओचा उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांशी काहीही संबंध नाही.
हेही वाचा- बूथ कॅप्चरिंगच्या घटनेचा जुना व्हिडिओ उत्तर प्रदेश निवडणुकीतील म्हणून व्हायरल!
(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती आमच्या (9172011480) या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.
आपण फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता)
Be First to Comment