Press "Enter" to skip to content

बीरभूम हिंसाचार: ओडिशातील बस दुर्घटनेचा जुना व्हिडिओ बीरभूममधील हिंदूंवरील अत्याचारांचा म्हणून व्हायरल!

पश्चिम बंगालमधील बीरभूम जिल्ह्यातील बोगातुई गावात 21 मार्च रोजी तृणमूल काँग्रेसचे नेते भादू शेख (Bhadu Sheikh) यांची हत्या करण्यात आली. या हत्येनंतर उसळलेल्या हिंसाचारात 8 जणांचा बळी गेला आहे. याप्रकरणी पोलिसांनी तारापीठ येथून अनारुल हुसेन (Anarul Hossain) या स्थानिक तृणमूल नेत्याला ताब्यात घेतले. त्यानंतर कोलकाता उच्च न्ययालयाकडून या प्रकरणाचा तापस सीबीआयकडे वर्ग करण्यात आला आहे.

Advertisement

बीरभूममधील या हिंसाचाराच्या (Birbhum Violence) घटनेच्या संदर्भाने एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. व्हिडिओमध्ये जळालेले मृतदेह रस्त्यावर पडलेले बघायला मिळताहेत. सोबतच एक निळ्या रंगाची ट्रॅव्हल्स देखील दिसतेय. व्हिडीओ शेअर करताना दावा केला जातोय की तृणमूल नेते भादू शेख यांच्या मृत्यूनंतर मुस्लिम जमावाने हिंदूंना त्यांच्याच घरात जिवंत जाळले. यामध्ये 12 हिंदूंचा बळी गेला.

अर्काइव्ह

पडताळणी:

सर्वप्रथम तर एक महत्वाची गोष्ट म्हणजे बीरभूम येथील हिंसाचारात कुठल्याही हिंदू व्यक्तीचा बळी गेलेला नाही. पीडित आणि आरोपी दोघेही मुस्लिम समुदायातील आहेत. ‘चेकपोस्ट मराठी’ने यापूर्वीच यासंदर्भातील पडताळणी केलेली आहे.

बीरभूममधील हिंसाचाराचा म्हणून व्हायरल होत असलेला व्हिडीओ नेमका कधीचा आणि कुठला हे शोधण्यासाठी आम्ही रिव्हर्स सर्चची मदत घेतली. व्हायरल व्हिडिओच्या किफ्रेम्स रिव्हर्स सर्चच्या मदतीने शोधल्या असता न्यू इंडिअन एक्स्प्रेसचे पत्रकार हेमंत रौत यांचे 9 फेब्रुवारी 2020 रोजीचे ट्विट बघायला मिळाले. या ट्विटमध्ये त्यांनी बस दुर्घटनेचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओतील दृश्ये सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओशी जुळणारी आहेत.

मिळालेल्या माहितीच्या आधारे अधिक शोध घेतला असता ‘नई दुनिया’च्या वेबसाईटवर 10 फेब्रुवारी 2020 रोजी प्रसिद्ध बस दुर्घटनेची बातमी बघायला मिळाली. बातमीनुसार ओडिशातील गंजाम जिल्ह्यातील गोलंथरा पोलीस ठाण्यांतर्गत असलेल्या मेंडराजपुरमध्ये एक बस 11 केव्ही वायरच्या संपर्कात आली. या दुर्घटनेत 11 जणांचा मृत्यू झाला, तर 30 जण जखमी झाले.सदर दुर्घटनेमध्ये सात महिलांचा मृत्यू झाला होता. सिल्क सिटी नावाची बस लग्न समारंभासाठी डुमकुलपुडूहुन चिकरडा येथे चालली होती.

आम्हाला कनक न्यूजचा या घटनेसंबंधीच्या बातमीचा व्हिडिओ रिपोर्ट देखील बघायला मिळाला. या रिपोर्टमधील दृश्ये व्हायरल व्हिडिओमधील बसशी जुळणारी आहेत. कनक न्यूजच्या युट्यूब चॅनेलवरून 9 फेब्रुवारी 2020 रोजी हा रिपोर्ट अपलोड करण्यात आला होता.

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडिओचा बीरभूम हिंसाचाराशी काहीही संबंध नाही. व्हायरल व्हिडीओ ओडिशातील बस दुर्घटनेचा असून साधारणतः दोन वर्षे जुना आहे. शिवाय बीरभूम हिंसाचारात एकही हिंदू व्यक्तीचा बळी गेलेला नाही.

हेही वाचा- बीरभूम हिंसाचार: बंगालमध्ये 10 हिंदू महिला आणि 2 बालकांच्या हत्येचे दावे चुकीचे!

(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती आमच्या (9172011480) या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.

आपण फेसबुकट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता)

More from धर्म-संस्कृतीMore posts in धर्म-संस्कृती »
More from राजकारणMore posts in राजकारण »

Be First to Comment

    Leave a Reply

    Your email address will not be published.

    × न्यूज अपडेट्स मिळवा