सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होतोय. व्हायरल व्हिडिओमध्ये मतदान केंद्रामध्ये एक व्यक्ती महिलांऐवजी स्वतःच मतदान करत असल्याचे बघायला मिळतेय. दावा केला जातोय की हा व्हिडीओ उत्तर प्रदेशातील कुंडा (Kunda) या मतदारसंघातील बूथ कॅप्चरिंगचा (Booth capturing) आहे. कुंडा येथील मतदार रद्द करण्यात येऊन दोषी व्यक्तीला अटक करण्याची मागणी करण्यात येतेय.
समाजवादी पक्षाच्या समर्थकांकडून हा व्हिडीओ शेअर केला जातोय. समाजवादी पक्षाचे नेते आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांनी देखील हा व्हिडीओ ट्विट केला होता. मात्र नंतर यादव यांनी आपले ट्विट डिलीट केले.
पडताळणी:
व्हायरल व्हिडिओच्या किफ्रेम्स रिव्हर्स सर्चच्या साहाय्याने शोधल्या असता आम्हाला 2019 सालच्या एका ट्विटमध्ये हा व्हिडीओ बघायला मिळाला. रवी नायर या युजरकडून 12 मे 2019 रोजी हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला होता. यावरून ही गोष्ट तर येथेच स्पष्ट झाली की या व्हिडिओचा सध्याच्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांशी काहीही संबंध नाही.
याच ट्विटच्या रिप्लायमध्ये जिल्हा निवडणूक कार्यालय, फरिदाबादच्या ट्विटर हँडलवरून करण्यात आलेले एक ट्विट बघायला मिळाले. या ट्विटमध्ये सांगण्यात आले आहे की सदर प्रकरणी तातडीने कारवाई करण्यात आली असून एफआयआर दाखल करण्यात आली आहे. मतदान केंद्रात घुसलेल्या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे.
यासंदर्भात किवर्डसच्या साहाय्याने अधिक शोध घेतला असता ‘लल्लनटॉप’च्या युटयूब चॅनेलवरील बातमी बघायला मिळाली. या बातमीनुसार व्हिडीओ हरियाणातील फरिदाबादमधील असौटी मतदान केंद्रावरील आहे. व्हिडिओत मतदान प्रक्रियेशी छेडछाड करणारा व्यक्ती भाजपचा पोलिंग एजंट असून गिरीराज सिंग नामक या व्यक्तीला पलवल पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर त्याला जामीन देखील मिळाला.
वस्तुस्थिती:
‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडिओचा उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीशी काहीही संबंध नाही. व्हिडीओ साधारणतः तीन वर्षे जुना असून हरियाणामधील आहे.
हेही वाचा- पोलिंग एजंट स्वतःच नागरिकांच्या नावे मतदान करत असल्याच्या व्हिडीओचे सत्य आले समोर!
(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती आमच्या (9172011480) या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.
आपण फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता)
Be First to Comment