सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होतोय. व्हिडिओमध्ये पोलीस काही महिलांना अटक करून पोलीस व्हॅनमधून घेऊन जात असताना बघायला मिळताहेत. व्हिडीओ शेअर करताना दावा केला जातोय की पोलिसांनी रामनवमी मिरवणुकीवर दगडकेक करणाऱ्या महिलांना ताब्यात घेतले आहे.
फेसबुकवर देखील हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय.
पडताळणी:
व्हायरल व्हिडिओच्या किफ्रेम्स रिव्हर्स सर्चच्या सहाय्यांने शोधल्या असता एनडीटीव्हीच्या वेबसाईटवर 15 एप्रिल 2020 रोजी प्रसिद्ध रिपोर्ट बघायला मिळाला. या रिपोर्टनुसार उत्तर प्रदेशातील मुराबादमधील नवाबपुरा कॉलनीमध्ये एक कोरोना रुग्ण असल्याची माहिती मिळाल्यानंतर काही डॉक्टर आणि आरोग्य सेवा कर्मचारी त्या रुग्णास घेण्यास गेले होते. यावेळी काही लोकांनी त्यांच्यावर हल्ला केला होता.
व्हिडीओ रिपोर्टमध्ये घराच्या छतावरून दगडफेक करणाऱ्या महिला देखील बघायला मिळताहेत आणि त्यानंतर त्याच व्हिडिओमध्ये पोलीस काही महिलांना पोलीस ठाण्यात नेण्यासाठी गाडीत बसवताना दिसताहेत.
रिपोर्टमध्ये वरिष्ठ पोलीस अधिकारी अमित पाठक यांची प्रतिक्रिया देखील बघायला मिळतेय. अमित पाठक सांगतात की कोविड-19 च्या रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या सर्व लोकांना क्वारंटाईन करण्यासाठी डॉक्टरांची टीम गेली होती. मृत रुग्णाचे कुटुंबीय अँब्युलन्समध्ये असताना सुमारे दीडशे लोकांचा जमाव गोळा झाला आणि त्यांनी दगडफेक सुरू केली. यामध्ये पोलिसांची गाडी आणि अँब्युलन्सचे नुकसान झाले.
नवाबपुरा दगडफेकीच्या प्रकरणात पोलिसांनी 17 आरोपींनी अटक केली होती. त्यामध्ये 7 महिलांचा समावेश होता.
‘इंडिया ब्लूम्स’च्या युटयूब चॅनेलवर देखील 15 एप्रिल 2020 रोजी या घटनेचा व्हिडीओ अपलोड करण्यात आला होता.
वस्तुस्थिती:
‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओचा रामनवमी मिरवणुकी दरम्यान झालेल्या हिंसाचाराशी काहीही संबंध नाही. व्हायरल व्हिडीओ साधारणतः दोन वर्षांपूर्वीचा आहे. कोरोना काळात डॉक्टर, आरोग्य सेवा कर्मचारी आणि पोलिसांवर दगडफेक करणाऱ्या महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचा घटनेचा हा व्हिडीओ आहे.
हेही वाचा- जहांगीरपुरी मधील मुस्लिम समुदायातील व्यक्तीने थेट पोलिस अधिकाऱ्याला धमकावले?
(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती आमच्या (9172011480) या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.
आपण फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता)
Be First to Comment