गेल्या आठवड्यात दिल्लीतील जहांगीरपुरी येथे उसळलेल्या दंगलीनंतर (Jahangirpuri Violence)सोशल मीडियावर अनेक फोटोज आणि व्हिडीओज व्हायरल होताहेत. या व्हिडीओजच्या आधारे अनेक चिथावणीखोर दावे केले जाताहेत.
अशाच प्रकारच्या एका व्हायरल व्हिडिओत एक मुस्लिम व्यक्ती चिथावणीखोर प्रतिक्रिया देताना दिसतोय. दावा केला जातोय की ही व्यक्ती दिल्लीतील काझी असून तो जहांगीरपुरी हिंसाचारानंतर देशभरातल्या हिंदूंना धमकी देत आहे.
दिल्ली भाजपचे माध्यम प्रमुख नवीन कुमार जिंदल यांनी हा व्हिडीओ पोस्ट केलाय. व्हिडीओ पोस्ट करताना त्यांनी दिल्ली पोलिसांना त्यात टॅग करत यांच्यावर कारवाई कधी केला जाणार असा सवाल केलाय. व्हिडिओसोबत ‘आम्ही हिंदूंचं जगणं अवघड करून टाकू’ असे लिहिले असल्याचे बघायला मिळतेय.
दिल्ली भाजपचे उपाध्यक्ष सुनील यादव, भाजप समर्थक अरुण पुदुर, पाकिस्तानी-कॅनेडिअन लेखक तारेक फतह यांनी देखील आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर केलाय.
पडताळणी:
व्हायरल व्हिडिओच्या किफ्रेम्स रिव्हर्स सर्चच्या साहाय्याने शोधल्या असता मुस्लिम सेवा संगठन देहरादूनच्या युटयूब चॅनेलवरून 4 जुलै 2019 रोजी हा व्हिडीओ अपलोड करण्यात आला असल्याचे बघायला मिळाले. ‘मुफ्ती रईस बयान मुस्लिम सेवा संगठन’ अशा शीर्षकासह हा व्हिडीओ अपलोड करण्यात आलेला आहे.
मिळालेल्या माहितीच्या आधारे अधिक शोध घेतला असता ईटीव्ही भारतच्या वेबसाईटवर 29 जून 2019 रोजी प्रसिद्ध बातमी बघायला मिळाली. या बातमीनुसार तबरेज अन्सारी या मुस्लिम युवकाची मॉब लिंचिंगमध्ये हत्या झाल्यानंतर या विरोधात निषेध नोंदविण्यासाठी मुस्लिम सेवा संघटनेने देहरादून जिल्हा दंडाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने दिली होती.
या निदर्शनादरम्यान मुफ्ती रईस (Mufti Raees) उपस्थित होते. त्यावेळी न्यायालयाबाहेर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी जी प्रतिक्रिया दिली, ती प्रक्षोभक असल्याचे मानत पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा नोंदवला होता. मुफ्ती विरोधात नगर कोतवाली येथे भारतीय दंड विधानाच्या कलम 153 (ब) आणि 505 (ब) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
वस्तुस्थिती:
‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओचा जहांगीरपुरी हिंसाचाराच्या घटनेशी काहीही संबंध नाही. व्हिडीओ दिल्लीतील नसून देहरादून येथील आहे. शिवाय हा व्हिडीओ जवळपास अडीच वर्षे जुना आहे. पोलिसांनी त्याचवेळी भडकाऊ भाषण देणाऱ्या व्यक्तीवर गुन्हा दाखल केला होता.
हेही वाचा- जहांगीरपुरी मधील मुस्लिम समुदायातील व्यक्तीने थेट पोलिस अधिकाऱ्याला धमकावले?
(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती आमच्या (9172011480) या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.
आपण फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता)
Be First to Comment