पश्चिम बंगाल मधील मुर्शिदाबाद येथील महिषासुर रेल्वे स्टेशनची तोडफोड करणाऱ्या तरुणांचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियात व्हायरल होतोय. दावा केला जातोय नमाज पढत असताना ट्रेनच्या हॉर्नचा आवाज आल्याने नमाज अदा करताना त्रास झाला म्हणून भडकलेल्या मुस्लीम जमावाने रेल्वे स्टेशनची तोडफोड केलीय.
‘Mahishashur Railway Station in Murshidabad West Bengal being vandalised by Radical Pislamic mobs because the sound of train whistle is disturbing their Uzan’ अशा कॅप्शनसह व्हिडीओ व्हायरल होतोय.
चेकपोस्ट मराठीचे वाचक राजेंद्र काळे, रमेश लोहे, सुभाष देसाई, भालचंद्र कदम आणि सुभाष विसपुते यांनी ट्विटर, फेसबुकप्रमाणेच व्हॉट्सऍपवरही हे दावे जोरदार व्हायरल होत असल्याचे निदर्शनास आणून देत पडताळणीची विनंती केलीय.
पडताळणी:
‘चेकपोस्ट मराठी’ने व्हायरल दाव्याच्या अनुषंगाने विविध कीवर्ड्सच्या आधारे सर्च केले असता अशा प्रकारची कुठलीही घटना घडल्याविषयीची बातमी बघायला मिळाली नाही. दरम्यान, आम्हाला फेसबुकवर काही पोस्ट्स आढळल्या. या पोस्ट्स १५-१६ डिसेंबर 2019 रोजी शेअर करण्यात आल्या आहेत. यामध्ये दिसणारी दृश्ये आणि व्हायरल व्हिडीओतील दृश्ये तंतोतंत जुळतायेत.
फेसबुक पोस्ट्सवरून हा व्हिडीओ सध्याचा नसून साधारणतः दोन वर्षांपूर्वीचा आहे हे तर स्पष्ट झाले. शिवाय या पोस्टसमध्ये सीईए-एनआरसी आंदोलनाशी संबंधित हॅशटॅग्ज देखील बघायला मिळाले. यावरून हा व्हिडीओ या आंदोलना दरम्यानचा असावा असा प्राथमिक अंदाज बांधला आणि त्याआधारे शोध घेतला असता या आधारे गुगलवर किवर्डसच्या आधारे शोध घेतला असता आम्हाला ‘इंडिया टुडे’चा रिपोर्ट बघायला मिळाला.
‘इंडिया टुडे’च्या रिपोर्टनुसार व्हायरल व्हिडीओ एनआरसी-सीएए विरोधातील आंदोलना दरम्यानचा असल्याची माहिती मिळाली. पश्चिम बंगाल मधील मुरादाबाद येथे नवपाडा महिषासुर रेल्वे स्टेशन आहे. याच ठिकाणच्या घटनेची ही दृश्ये आहेत.
मालदाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक यतेंद्र कुमार यांनी ‘इंडिया टुडे’शी बोलताना व्हायरल व्हिडिओसोबत केल्या जात असलेल्या दाव्यांचे खंडन केले आहे. व्हिडिओ डिसेंबर 2019 मध्ये झालेल्या सीएए विरोधी आंदोलनातील असून याचा ट्रेनच्या हॉर्नशी किंवा नमाजशी काहीही संबंध नाही. महिषासुर रेल्वे स्थानकात अलीकडच्या काळात अशी कोणतीही घटना घडली नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
वस्तुस्थिती:
‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीत हे स्पष्ट झाले की नमाज पढत असताना रेल्वेच्या हॉर्नमुळे त्रास झाला आणि म्हणून मुस्लीम युवकांनी रेल्वे स्टेशनची तोडफोड केल्याचे दावे फेक आहेत. व्हायरल व्हिडीओत दिसणारी दृश्ये आताची नसून डिसेंबर 2019 मधील आहेत.
नागरिकत्व सुधारणा विधेयका विरोधात उग्र झालेल्या आंदोलनादरम्यान पश्चिम बंगाल मधील तरुण मुलांनी नवपाडा महिषासुर रेल्वे स्टेशनची तोडफोड केली होती. याच दरम्यानचा हा व्हिडीओ आहे.
हेही वाचा: अलाहाबाद विद्यापीठाच्या वसतीगृहात बॉम्ब बनवताना २५ विद्यार्थी रंगेहाथ पकडल्याचे दावे फेक!
(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती आमच्या (9172011480) या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.
आपण फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता)
[…] […]