Press "Enter" to skip to content

केरळ सरकारने पुजारी पद दिलेल्या मुस्लिम पुजाऱ्यांनी हिंदू मंदिरात गायले अल्लाह इलाही गाणे? वाचा सत्य!

केरळ सरकारने मुस्लीम आणि इसाई धर्मियांना पुजारी पदे दिल्याने आता हिंदू मंदिरांत अल्लाह इलाहीची गाणी गायली जात असल्याचे दावे सोशल मीडियात व्हायरल होतायेत. त्यासाठी खरेच ‘ला इलाहा इल्लल्लाह’ गाणे गाणारे पुजारी दिसणारा व्हिडीओ व्हायरल केला जातोय.

Advertisement

‘केरल में सरकार द्वारा मंदिरों में मुस्लिम व ईसाईयो को मंदिरों में पुजारी के पद पर नियुक्तियों का नतीजा देख लो।’ अशा कॅप्शनसह तो २.७ मिनिटांचा व्हिडीओ शेअर केला जातोय.

चेकपोस्ट मराठी’चे वाचक प्रशांत यमजाल, प्रसन्ना घुमे आणि डी जे चांद यांनी ट्विटर, फेसबुकप्रमाणेच व्हॉट्सऍपवरही हे दावे जोरदार व्हायरल होत असल्याचे ‘निदर्शनास आणून देत पडताळणीची विनंती केली.

पडताळणी:

‘चेकपोस्ट मराठी’ने व्हायरल दाव्यांच्या अनुषंगाने काही कीवर्ड्स गुगल सर्च करून पाहिले असता काही तथ्ये समोर आली, ती पुढीलप्रमाणे:

केरळ सरकारने मुस्लीम-इसाई धर्मियांना पुजारी म्हणून नेमलेय?

केरळमध्ये मंदिर प्रशासनाचे निर्णय देवासम पद्धतीने होतात. यानुसार मुख्यतः राज्य सरकारद्वारा गठीत देवासम प्रबंधन किंवा खाजगी संस्था मंदिर प्रशासनाचे निर्णय घेतात. जवळपास ३००० मंदिराचा कारभार देवासम कमिश्नरच्या अखत्यारीत आहे. देवासम बोर्डाच्या मुख्य सदस्यांची निवड केरळ विधानसभेतील हिंदू सदस्य करत असतात.

केरळ सरकारने केरळ उच्च न्यायालयातील एका याचिकेवर उत्तर देताना २०१८ सालीच हे स्पष्ट केले होते की हिंदू मंदिरांकरिता अहिंदू देवासम कमिशनर नेमण्याचा कुठलाही निर्णय घेतला गेलेला नाही किंबहुना भविष्यातही असा कुठला निर्णय घेतला जाणार नाही. याविषयीची बातमी ‘द टाईम्स ऑफ इंडियाने’ प्रसिद्ध केलेली आहे.

याचाच अर्थ असा की केरळ सरकारने मुस्लीम-इसाई धर्मियांना पुजारी म्हणून नेमण्याचा कुठलाही कायदा केलेला नाही.

व्हायरल व्हिडीओचे सत्य काय?

व्हायरल व्हिडीओ नेमका कुठला हे शोधण्यासाठी आम्ही गुगल सर्च केले असता ‘इंडिया टुडे‘ची बातमी बघायला मिळाली. सदर व्हिडीओ अनेक दिवसांपासून व्हायरल होत असून ‘इंडिया टुडे’ने १६ डिसेंबर २०२१ रोजी या व्हिडीओचे मूळ तपासण्याचा प्रयत्न केला होता.

‘इंडिया टुडे’नुसार सदर व्हिडीओ केरळमधील नसून आंध्रप्रदेश पश्चिम गोदावरी जिल्ह्याच्या चालसानी गार्डन या मंगल कार्यालयातील व्हिडीओ आहे. व्हिडीओमध्ये दिसणारे सर्व अय्यप्पा स्वामींचे भक्त आहेत. गाणे गाणाऱ्या गायकाचे नाव ‘एन बालाजी’ असे आहे.

Source: India Today

‘इंडिया टुडे’शी बोलताना एन. बालाजी सांगतात,

‘हा व्हिडीओ २०१७ सालचा आहे. शबरीमला तीर्थक्षेत्राकरिता पूजा ठेवली होती, त्यावेळी मला गायनासाठी बोलावले होते. वावर स्वामी हे मुस्लीम संत होते परंतु अय्यप्पाचे मोठे भक्त होते. वावर स्वामी आणि अय्यप्पा अतिशय जवळचे मानले जातात. त्यामुळेच अय्यप्पाच्या इतर गीतांसह वावर स्वामींसाठी हे गाणे गायले जाते.’

– एन बालाजी (व्हायरल व्हिडीओतील गायक)

शबरीमालाच्या शासकीय वेबसाईटवरील माहितीनुसार वावर स्वामी (Vavar Swamy) यांची शबरीमला येथे मजार आहे तसेच शबरीमालाच्या इरूमला येथे मस्जिद सुद्धा आहे. या बाबी धार्मिक सांस्कृतिक सहोदराचे उत्तम उदाहरण आहे.

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीनुसार हे स्पष्ट झाले की व्हायरल दावे फेक आहेत. व्हायरल व्हिडीओमध्ये दिसणारे लोक पुजारी नसून अय्यप्पा स्वामींचे भक्त आहेत. शिवाय तो व्हिडीओ केरळातील नव्हे तर २०१७ सालचा आंध्रप्रदेशमधील आहे.

केरळ सरकारने अहिंदूंना मंदिराचे पुजारी बनविण्याचा कायदा केल्याचे दावेसुद्धा फेक आहेत. स्वतः सरकारने उच्च नायालयात याविषयी स्पष्टीकरण देत अशा प्रकारचा कुठलाही कायदा केला गेला असल्याचा किंवा प्रस्तावित असल्याची बाब सरकारने फेटाळून लावली आहे.

हेही वाचा: केरळी मुस्लिमांनी ‘युनायटेड मल्लापूरम’ असा वेगळा देश घोषित करून स्वतःचा पंतप्रधान निवडल्याचे दावे फेक!

(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती आमच्या (9172011480) या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.

आपण फेसबुकट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता)

More from धर्म-संस्कृतीMore posts in धर्म-संस्कृती »
More from राजकारणMore posts in राजकारण »

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published.

× न्यूज अपडेट्स मिळवा