राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते नवाब मलिक (Nawab Malik) यांच्या घरात पाणी शिरल्याचे फोटो आणि त्यासोबत ‘आता केंद्र सरकारला जबाबदार धरणार का?’ असा उपरोधिक सवाल असलेल्या पोस्ट सोशल मीडियात जोरदार व्हायरल होत आहेत.
‘माझ्या घरात पाणी याला केंद्र सरकार जबाबदार..-नवाब मलिक’ या कॅप्शनसह ‘RSS राष्ट्रीय स्वयंसेवक संघ’ या फेसबुक ग्रुपवर घरत साचलेल्या गुडघाभर पाण्यात स्वतः नवाब मलिक उभे असल्याचा फोटो पोस्ट केलाय. बातमी करेपर्यंत ही पोस्ट ५१ जणांनी शेअर केली होती.
‘श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले सरकार प्रतिष्ठान महाराष्ट्र’ या फेसबुक ग्रुपवरही अशाच प्रकारे पोस्ट शेअर करण्यात आली आहे.
ट्विटर आणि फेसबुकवर मोठ्या प्रमाणात हे फोटोज व्हायरल होत आहेत.
पडताळणी:
‘चेकपोस्ट मराठी’ने व्हायरल दाव्याच्या अनुषंगाने गुगलवर ऍडव्हान्स्ड की वर्ड्स सर्च केले असता या संदर्भातील बातम्या समोर आल्या. झी २४ तास, इंडिया टीव्ही, न्यू इंडियन एक्स्प्रेस यांसारख्या न्यूज पेपर आणि चॅनल्सने बातम्या केल्या आहेत पण या बातम्या आतच्या नसून २ जुलै २०१९ रोजीच्या आहेत.
बातमीतील माहितीनुसार नवाब मलिक यांनी स्वतः फेसबुक आणि ट्विटरच्या माध्यमातून घरात साचलेल्या पाण्याचे फोटोज पोस्ट केले होते आणि मुंबई महानगरपालिका, उद्धव ठाकरे, तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टॅग केले होते.
वस्तुस्थिती:
‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये हे स्पष्ट झाले की राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते नवाब मलिक (Nawab Malik) यांच्या घरात पाणी घुसल्याचे फोटोज शेअर करून भाजप समर्थक दिशाभूल करत आहेत. हे फोटोज आताचे नसून २०१९ सालचे आहेत. त्यावेळी राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सेना-भाजप युतीचे सरकार होते.
हे ही वाचा: अरविंद केजरीवाल यांच्या कुटुंबाचं जनसंघ, RSS कनेक्शन खरंय का?
Be First to Comment