Press "Enter" to skip to content

उत्तर प्रदेशात मते मागायला आलेल्या भाजप नेत्यास जनतेकडून बेदम मारहाण? वाचा सत्य!

सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होतोय. फोटोमध्ये पोलिसांच्या संरक्षणात एक व्यक्ती रस्त्यावरून चालत असलेली दिसतेय. दावा केला जातोय की घटना उत्तर प्रदेशातील असून मतदान मागायला गेलेल्या भाजप नेत्यास जनतेकडून कपडे फाडून बेदम मारहाण करण्यात आली.

Advertisement

“वोट माँगने जनता के बीच गए भाजपा नेता जी का हाल, योगी बाबा को मैसेज करके बताया कि मै ज़िंदा लौट कर आ गया हूँ।” अशा कॅप्शनसह ट्विटर आणि फेसबुकवर हा फोटो मोठ्या प्रमाणात शेअर केला जातोय.

अर्काइव्ह

पडताळणी:

व्हायरल फोटो रिव्हर्स सर्चच्या साहाय्याने शोधला असता 30 जुलै 2021 रोजी ‘वन इंडिया हिंदी’ पोर्टलवर प्रसिद्ध बातमीमध्ये व्हायरल फोटो बघायला मिळाला.

बातमीनुसार घटना उत्तर प्रदेशातील नसून राजस्थानमधील श्रीगंगानगर येथील आहे. फोटोतील व्यक्ती भाजप नेते कैलाश मेघवाल (Kailash Meghwal) आहेत. सदर घटना शेतकरी आंदोलना दरम्यानची (Farmers Protest) असून केंद्र सरकारच्या कृषी कायद्याला विरोध करणाऱ्या आंदोलक शेतकऱ्यांनी भाजप नेते कैलाश मेघवाल यांचे कपडे फाडले होते.

Source: OneIndia

भाजप कार्यकर्त्यांनी महागाई आणि सिंचनाच्या प्रश्नावर श्रीगंगानगरमध्ये राज्य सरकारविरोधात आंदोलन छेडले होते. भाजपचे आंदोलन मध्यवर्ती कारागृहाजवळ सुरू होते, तर त्याचवेळी महाराजा गंगासिंह चौकात केंद्राच्या तीन कृषी कायद्यांविरोधात शेतकरी निदर्शने करत होते. हनुमानगडचे भाजप कार्यकर्ते आणि एससी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष कैलास मेघवाल हे भाजपच्या जिल्हास्तरीय निदर्शनात सहभागी होण्यासाठी आले होते.

दरम्यान, मेघवाल यांचा रस्ता चुकला आणि ते शेतकरी आंदोलनाच्या स्थळी पोहोचले. मेघवाल यांच्या गळ्यात भाजपचा झेंडा पाहून आंदोलक शेतकरी संतापले आणि शेतकऱ्यांनी मेघवाल आणि भाजपविरोधात घोषणाबाजी सुरु केली.

मेघवाल आणि शेतकऱ्यांमध्ये बाचाबाची झाली आणि शेतकऱ्यांनी मेघवाल यांना धक्काबुकी करत त्यांचे कपडे फाटले. त्यानंतर काही शेतकरी आणि पोलिसांच्या मध्यस्थीने मेघवाल यांना तेथून सुखरूप बाहेर काढण्यात आले.

टीव्ही 9 भारतवर्षच्या युट्यूब चॅनेलवर देखील या घटनेची बातमी उपलब्ध आहे.

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की सोशल मीडियावरील व्हायरल फोटो सध्याचा नसून जुना आहे. घटना राजस्थानमधील श्रीगंगानगर येथील असून शेतकरी आंदोलना दरम्यान आंदोलक शेतकऱ्यांनी भाजप नेते कैलास मेघवाल यांचे कपडे फाडले होते. व्हायरल फोटोचा उत्तर प्रदेश निवडणुकीशी काहीही संबंध नाही.

हेही वाचा- हिंदू विरोधी वक्तव्य करणाऱ्या काँग्रेस उमेदवाराला जमावाने चोप दिलाय?

(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती आमच्या (9172011480) या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.

आपण फेसबुकट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता) 

More from राजकारणMore posts in राजकारण »

Be First to Comment

    Leave a Reply

    Your email address will not be published.

    × न्यूज अपडेट्स मिळवा