Press "Enter" to skip to content

भगवंत मान यांना गाडीचोरीच्या आरोपात अटक झाली होती? वाचा व्हायरल फोटोचे सत्य!

‘पंजाब पोलिसांनी ४ बाईक चोरांना पकडल्याचा एक दुर्मिळ फोटो सापडला असून त्यातीलच एक व्यक्ती आता पंजाबची मुख्यमंत्री झालीय’ अशा काहीशा कॅप्शनसह दोन पायांवर बसलेल्या ४ जणांचा जुना फोटो सोशल मीडियात व्हायरल होतोय. आम आदमी पक्षाचे नेते आणि पंजाबचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री भगवंत मान (Bhagwant Mann) यांना भूतकाळात गाडीचोरीच्या आरोपात अटक करण्यात आली होती असा दावा या माध्यमातून केला जातोय.

Advertisement

कल का चोर आज का CM…यह उस समय का चित्र है जब इन 4 चोरों को बाइक चोरी के अपराध में पंजाब पुलिस ने धर लिया था..!’ अशा कॅप्शनसह तरुणाईतील भगवंत मान दिसणारा फोटो व्हायरल होतोय.

‘चेकपोस्ट मराठी’चे वाचक नेहाल जमादार, निसार अली आणि सी.एस. केतकर यांनी ट्विटर, फेसबुकप्रमाणे व्हॉट्सऍपवरही हे दावे जोरदार व्हायरल होत असल्याचे निदर्शनास आणून देत पडताळणीची विंनती केली.

पडताळणी:

‘चेकपोस्ट मराठी’ने व्हायरल फोटो गुगल लेन्सच्या मदतीने रिव्हर्स सर्च करून पाहिला असता पंजाबचे गायक-अभिनेते करमजित अनमोल (Karamjit Anmol) यांनी स्वतः १८ मार्च रोजी फेसबुकवर अपलोड केलेला हा फोटो आढळला. फोटोच्या कॅप्शनमध्ये त्यांनी ‘होली मेमरीज’ असे लिहून भगवंत मान (Bhagwant Mann) आणि मनजित सिद्धू (Manjit Sidhu) यांना टॅग केले आहे.

Source: facebook

करमजीत यांनी या आधीही अनेकदा आपल्या तरुणाईतील विविध फोटोज सोशल मीडियातून पोस्ट केले आहेत. टाईम्स ऑफ इंडियाने भगवंत मान आणि करमजीत यांचा असाच आणखी एक फोटो आपल्या बातमीतून प्रसिद्ध केला होता.

Source: Times of India

व्हायरल फोटोविषयी ‘इंडिया टुडे’शी बोलताना करमजीत सांगतात की हा फोटो १९९५ साली केलेल्या होळी उत्सवाचा आहे. पंजाबी गायक हरभजन मान यांच्या घरी हे सेलिब्रेशन झाले होते. तिथेच हा फोटो घेण्यात आला होता.

व्हायरल फोटो व्यवस्थित पाहिला तर सहजपणे लक्षात येईल की फोटोमध्ये परिधान केलेले पांढरे कपडे रंग खेळल्याने गुलाबी झालेले आहेत. याहून महत्वाचे म्हणजे पोलिसांनी अटक केल्याचा फोटो स्वतः फोटोतील व्यक्ती काही वर्षांनी का होईना सोशल मिडीयात का पोस्ट करेल?

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीत हे स्पष्ट झाले की व्हायरल फोटोमध्ये पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान असल्याची बाब खरी आहे, परंतु फोटोतील चौघांना बाईक चोरी प्रकरणी अटक करण्यात आल्याची बाब चुकीची आहे. तो फोटो होळी उत्सवाचा आहे अटकेचा नाही. त्यांच्या कपड्यांवर रंगही दिसून येतोय.

हेही वाचा: पंजाबमध्ये ‘आप’ची सत्ता येताच हिंदू साधूंना भर रस्त्यात मारहाण? वाचा व्हायरल व्हिडीओचे सत्य!

(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती आमच्या (9172011480) या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.

आपण फेसबुकट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता)

More from राजकारणMore posts in राजकारण »

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published.

× न्यूज अपडेट्स मिळवा