Press "Enter" to skip to content

अमित शहांच्या सहा वर्षांपूर्वीच्या रॅलीचा फोटो सध्याच्या ‘रोड शो’चा म्हणून व्हायरल!

देशाचे गृहमंत्री आणि भाजप नेते अमित शहा यांनी नुकताच पश्चिम बंगालचा दोन दिवसीय दौरा (amit shah bengal visit) केला. अमित शहा यांच्या याच दौऱ्यातील ‘रोड शो’चा म्हणून एक फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय.

Advertisement

अनेक भाजप सर्मथकांकडून पश्चिम बंगालमध्ये भाजपला मिळत असलेला प्रचंड प्रतिसाद दाखविण्यासाठी हा फोटो शेअर केलाय. काही जणांनी तर आता केवळ निवडणुकीची औपचारिकताच बाकी राहिली असल्याचं सांगितलंय. भाजप समर्थक वेगवेगळ्या कॅप्शनसह हा फोटो शेअर करताहेत.

मध्य प्रदेश भाजपचे प्रदेश सह-संघटन मंत्री हितानंद शर्मा यांनी देखील आपल्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरून हा फोटो शेअर केलाय. फोटोच्या कॅप्शनमध्ये ते म्हणतात, “अभी तो सिर्फ ‘शाह’ आये है..! “शहंशाह” आना तो बाकी है!”

अर्काइव्ह पोस्ट

पडताळणी:

गृहमंत्री अमित शहा यांच्या बंगाल दौऱ्याला जनतेचा चांगला प्रतिसाद मिळाला. या दौऱ्यात तृणमूल काँग्रेस, काँग्रेस आणि इतर पक्षांमधील जवळपास डझनभर नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. मात्र या दौऱ्याच्या न्यूज चॅनेल्स अथवा न्यूज पेपर्समधील रिपोर्टींग मध्ये कुठेही एवढ्या विशाल गर्दीचा फोटो बघायला मिळाला नाही. त्यामुळे सध्या व्हायरल होत असलेला फोटो कुठला आणि कधीचा आहे, हे शोधण्याचा आम्ही प्रयत्न केला.

व्हायरल फोटो आम्ही रिव्हर्स सर्चच्या मदतीने शोधला असता आम्हाला ‘इंडिया टीव्ही’च्या युट्यूब चॅनेलवर ३० नोव्हेंबर २०१४ रोजी अपलोड करण्यात आलेल्या बातमीमध्ये सध्या व्हायरल होत असलेल्या फोटोशी साधर्म्य असणारे व्हिज्युअल्स आम्हाला बघायला मिळाले. अमित शहा यांच्या २०१४ मधील निवडणूक प्रचारादरम्यानच्या कोलकाता येथील रॅलीची ही बातमी होती.

आम्ही अजून शोधाशोध केली असता सध्या व्हायरल होत असलेला फोटो आम्हाला ‘डेली मेल’च्या वेबसाईटवर १ डिसेंबर २०१४ रोजी प्रसिद्ध बातमीमध्ये वापरण्यात आल्याचे आढळून आले. ‘डेली मेल’ने रॉयटर्स या वृत्तसंस्थेच्या हवाल्याने हा फोटो प्रसिद्ध केला होता. बातमीमध्ये अमित शहा यांच्या कोलकाता येथील रॅलीविषयीचे सविस्तर रिपोर्टींग करण्यात आले आहे.

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे की सोशल मीडियावर अमित शहा यांच्या नुकत्याच झालेल्या बंगाल दौऱ्यातील (amit shah bengal visit) म्हणून शेअर केला जात असलेला फोटो हा आताचा नसून जवळपास सहा वर्षांपूर्वीचा आहे. अमित शहा यांच्याच २०१४ मधील कोलकाता रॅलीतील या फोटोचा शहांच्या सध्याच्या बंगाल दौऱ्याशी काहीही संबंध नाही.

हे ही वाचा- नरेंद्र मोदी ज्यांना झुकून नमस्कार करताहेत, त्या उद्योगपती अदानींच्या पत्नी प्रीती आहेत?

More from राजकारणMore posts in राजकारण »

Be First to Comment

    Leave a Reply

    Your email address will not be published.

    × न्यूज अपडेट्स मिळवा