सोशल मीडियात किंवा व्हॉट्सऍप ग्रुपवर आक्षेपार्ह मेसेज किंवा पोस्ट शेअर केल्यास ग्रुप ऍडमिन आणि इतर सदस्यांना जबाबदार धरत गुन्हे दाखल होणार (whatsapp admin responsible for content) अशी माहिती देणारी एक न्यूज क्लिप व्हायरल होतेय.
‘इन सोलापूर न्यूज’ची २.११ मिनिटांची व्हिडीओ क्लिप सध्या सोशल मीडियात व्हायरल होतेय. दावा केला जातोय की सोनिया गांधी, राहुल गांधी, नरेंद्र मोदी, शरद पवार, अरविंद केजरीवाल आणि इतर राजकारण्यांसंबंधी आक्षेपार्ह फोटो, व्हिडीओ किंवा मेसेज शेअर केल्यामुळे पुणे, मुंबई, चेन्नई येथे एकूण २६० ग्रुप ऍडमिन्सवर गुन्हे दाखल केले आहेत. त्यांना तुरुंगवास भोगावा लागत आहे. महाराष्ट्र सायबर सेलद्वारे व्हॉट्सऍप ग्रुपवर निगराणी ठेवली जात आहे. जात-धर्म, रूढी परंपरा, भौगोलिक हद्दी यांविषयी विधाने करण्यास बंदी आहे.’
वगैरे अगदी कलमांचे दाखले देत सदर बातमी दिली आहे.
ही व्हिडीओ क्लिप व्हॉट्सऍप ग्रुप्सवर व्हायरल होत असल्याचे ‘चेकपोस्ट मराठी’चे वाचक सुनील गिरकर यांनी निदर्शनास आणून दिले. तसेच सदर क्लिप फेसबुकवरील ‘टरबूजने ब्लॉक केलेल्या १ करोड लोकांचा ग्रुप’वर देखील सुजित खापरे या ग्रुप मेंबरने शेअर केली आहे.
पडताळणी:
‘चेकपोस्ट मराठी’च्या निदर्शनास सदर व्हायरल व्हिडीओ आल्यानंतर आम्ही ‘इन सोलापूर न्यूज’ या युट्युब चॅनलवर मूळ व्हिडीओसाठी शोधाशोध केली परंतु ती बातमी काही आम्हाला सापडली नाही. त्यानंतर व्हायरल व्हिडीओ क्लिपच्या की फ्रेम्स ‘यांडेक्स’वर रिव्हर्स सर्च करून पाहिल्या.
व्हायरल न्यूज व्हिडीओ क्लिप जुनी:
आम्हाला युट्युबवरच विवेक राठोड या युट्युब चॅनलवर सदर बातमीचा व्हिडीओ २५ मे २०१९ रोजी अपलोड केल्याचे दिसले. त्याच प्रमाणे हीच व्हिडीओ क्लिप राजा राम येरागुंता असे नाव असणाऱ्या युट्युब चॅनलवर ६ मार्च २०१९ रोजी अपलोड करण्यात आल्याचे आढळले. म्हणजेच मूळ बातमी कदाचित डिलीट केल्याने ती केव्हाची आहे, हे जरी समजले नसले तरी या दोन्ही युट्युब चॅनलमुळे ती आताची नसून वर्ष-दोन वर्षे जुनी असल्याचे लक्षात आले.
२६० ऍडमिन्स तुरुंगाची हवा खात आहेत?
गुगलवर कीवर्ड्सच्या सहाय्याने सर्च केल्यानंतर अशी कुठली अधिकृत बातमी आम्हाला सापडली नाही ज्यात २६० ऍडमिन्सवर गुन्हा दाखल केल्याचे सांगितले असेल. इतर विविध ठिकाणी विविध कारणांनी व्हॉट्सऍप ग्रुप ऍडमिन्स आणि सदस्यांवर कारवाई झाल्याच्या (whatsapp admin responsible for content) काही बातम्या उपलब्ध आहेत परंतु त्यांच्यावर केलेली कारवाई आणि व्हायरल व्हिडीओत सांगितलेले कलम यांचा काहीएक संबंध नाही. बहुतांश केसेस मध्ये धार्मिक भावना दुखवण्याप्रकरणी गुन्हे दाखल केले गेले आहेत.
ग्रुप ऍडमिन जबाबदार नसतो:
मुळात व्हायरल बातमीमध्ये कायदेशीर बाबीची मोठी चूक आहे. ‘कोणतेही प्रक्षोभक विधान अथवा मेसेज व्हाट्सअप ग्रुपवरती टाकल्यास संबंधित ग्रुप अॅडमिन व पोस्ट करणाऱ्या व्यक्तीवर गुन्हे दाखल करुन कठोर कारवाई करण्यात येईल.‘ अशा अर्थाचे वाक्य वापरले आहे.
वस्तुस्थिती अशी की २० डिसेंबर २०१६ रोजी पब्लिश बातम्यांनुसार दिल्ली हायकोर्टाने ‘आशिष भल्ला विरुद्ध सुरेश चौधरी’ या केसच्या वेळी हे नमूद केले आहे की येथून पुढे व्हॉट्सऍप ग्रुपवर कुणी एखादा चुकीचा किंवा प्रक्षोभक मेसेज अथवा फोटो टाकला तर त्या ग्रुपच्या ऍडमिनला जबाबदार (whatsapp admin responsible for content) धरू नये. किंबहुना ग्रुप मधील इतर सदस्यांना सुद्धा जबाबदार ठरवू नये. ही सर्वस्वी त्या मेसेज पाठवणाऱ्या एकट्याची जबाबदारी असेल.
दिल्ली हायकोर्टाने म्हंटले आहे की व्हॉट्सऍप ग्रुपचा ऍडमिन म्हणजे एखाद्या न्यूजपेपरचा उत्पादक असल्यासारखा आहे. त्यातील मजकुराशी त्याचा संबंध येत नाही, ती जबाबदारी संपादकाची असते.
बऱ्याचदा ग्रुपचा ऍडमिन कोण हे इतर सदस्यांना माहित नसते. अनेक वेळा त्या व्यक्तीला स्वतःला सुद्धा हे माहित होत नाही की आपल्याला ऍडमिन बनवले आहे. कैकवेळा असे होते की मुख्य ऍडमिन ग्रुप सोडतो तेव्हा पुढील व्यक्ती आपोआप ग्रुपचा ऍडमिन बनतो. या अशा सर्व तांत्रिक बाबींमुळे दिल्ली उच्च न्यायालयाने ऍडमिनला जबाबदार ठरवू नये असे सांगितले आहे.
वस्तुस्थिती:
‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीनुसार सदर व्हायरल व्हिडीओ क्लिप जुनी असून यातील बातमी फेक आहे. दिल्ली हायकोर्टाने हे नमूद केले आहे की व्हॉट्सऍप ग्रुपवर कुणी एखादा चुकीचा किंवा प्रक्षोभक मेसेज अथवा फोटो टाकला तर त्या ग्रुपच्या ऍडमिनला जबाबदार धरू नये. किंबहुना ग्रुप मधील इतर सदस्यांना सुद्धा जबाबदार ठरवू नये.
ही सर्वस्वी त्या मेसेज पाठवणाऱ्या एकट्याची जबाबदारी असेल.
ग्रुप मधील सदस्याने अशी काही आक्षेपार्ह पोस्ट, मेसेज, व्हिडीओ टाकला तर ग्रुप ऍडमिनने ते स्वतः डिलीट सुद्धा करू नये कारण CRPC सेक्शन ३९ नुसार पुरावे नष्ट करणे हा गुन्हा आहे. यावेळी सरळ नजीकच्या पोलीस स्टेशनमध्ये जाऊन संबंधित व्यक्तीबद्दल तक्रार नोंदवायला हवी.
हेही वाचा: रणवीर, दीपिका आणि संदीप सिंग सोबतच्या फोटोत अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम आहे?
[…] रिपोर्ट सादर केला होता, तो आपण ‘येथे‘ वाचू […]
[…] हेही वाचा: आक्षेपार्ह मेसेजसाठी ग्रुप ऍडमिन जबा… […]