सोशल मीडियावर एक फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. फोटोत कुठल्याशा रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अस्ताव्यस्त पडलेला भाजीपाला दिसतोय. दावा केला जातोय की शेतकऱ्यांच्या वेशभूषेतील गद्दारांनी हा अशा प्रकारे ‘भारत बंद’च्या दरम्यान भाजीपाल्याची नासधूस (Vegetables vandalized during Bharat band) केली.
भाजपशी संबंधित विकास प्रीतम सिन्हा यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून हा फोटो शेअर केलाय. त्यांनी आरोप केलाय की राहुल गांधींचे राजकारण चमकावण्यासाठी कॉंग्रेस पक्ष शेतकरी, मजूर, गरीब; प्रत्येकाचे जीवनमान उध्वस्त करू शकतो. ट्विटरवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह सिन्हा यांना फॉलो करतात.
ट्विटर बायोमध्ये स्वतःची ओळख पत्रकार आणि लेखक अशी सांगणाऱ्या राजीव सचन यांनी हा फोटो पोस्ट करताना शेतकरी हिताच्या नावाखाली योगेंद्र यादव आणि त्याच्या अराजकी साथीदारांचे हे कृत्य असल्याचा दावा केलाय !!
सचन यांच्याकडून पोस्ट करण्यात आलेला फोटो २८७ युजर्सकडून रिट्विट करण्यात आलाय. रिट्विट करणाऱ्यांमध्ये भाजपच्या राष्ट्रीय प्रवक्त्या संजू वर्मा यांचा देखील समावेश आहे.
याशिवाय इतरही अनेकांकडून हा फोटो मोठ्या प्रमाणात शेअर केला गेलाय. भाजीपाल्याची नासधूस करताना (Vegetables vandalized during Bharat band) अनेक फेरीवाल्यांच्या घरी बसलेल्या भुकेलेल्यांचा देखील विचार केला गेला नाही. हे काय शेतकरी हिताचा विचार करतील? असा दावा फोटो शेअर करताना केला जातोय.
पडताळणी:
व्हायरल फोटो नेमका कुठला आणि कधीचा आहे हे शोधण्यासाठी आम्ही तो रिव्हर्स सर्चच्या मदतीने शोधला. आम्हाला ९ मे २०२० रोजी अपडेट करण्यात आलेल्या एका बंगाली भाषेतील ब्लॉगमध्ये हा फोटो आढळला. तसेच ‘हल्ला बोल इंडिया’ या फेसबुक पेजवरून ९ मे २०२० रोजीच हा फोटो पोस्ट करण्यात आल्याचे आढळले.
ब्लॉग पोस्ट आणि फेसबुक पोस्टवरून सध्या व्हायरल करण्यात येत असलेला फोटो शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ पुकारण्यात आलेल्या आलेल्या ‘भारत बंद’ दरम्यानचा नाही, हे तर स्पष्ट झाले.
फोटो नेमका कुठला हे शोधण्याचा प्रयत्न केला असता आम्हाला ‘द क्विन्ट’चा एक रिपोर्ट मिळाला. या रिपोर्टनुसार सध्या व्हायरल होत असलेला फोटो पश्चिम बंगालमधील उत्तर २४ परगणा जिल्ह्यातील बरसात या ठिकाणचा आहे.
वस्तुस्थिती:
‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की ज्या फोटोच्या आधारे ‘भारत बंद’च्या दरम्यान भाजीपाल्याची नासधूस केल्याचा दावा केला जातोय, त्या फोटोचा सध्याच्या ‘भारत बंद’शी काहीही संबंध नाही. फोटो साधारणतः या वर्षीच्या मे महिन्यापासून इंटरनेटवर असून तो पश्चिम बंगालच्या उत्तर २४ परगणा जिल्ह्यातील आहे.
हे ही वाचा- शेतकरी आंदोलनाला ‘देशद्रोही’ ठरवण्यासाठी भाजप नेत्याने शेअर केला ७ वर्ष जुना फोटो!
[…] हे ही वाचा– ‘भारत बंद’मध्ये भाजीपाल्याची नासधूस … […]