Press "Enter" to skip to content

‘ईद’ तर नाहीच, परंतु ‘१५ ऑगस्ट’ आणि ‘२६ जानेवारी’ सुद्धा आपले राष्ट्रीय सण नाहीत!

‘महाराष्ट्र शासनाने एक पत्रक काढले त्यात असे नमूद आहे की ‘ईद या राष्ट्रीय सणा’ निमित्त कर्मचाऱ्यांना एप्रिल महिन्याचा पगार लवकर देण्यात यावा. ‘ईद’ राष्ट्रीय सण कधीपासून झाला?’ असा सवाल करत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी करत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर टीका केली आहे.

Advertisement

चंद्रकांत पाटील यांचे वक्तव्य:

Source: Youtube/ TV9 Marathi

भाषणात ते ज्या पत्रकाचा उल्लेख करतायेत ते पत्रक सोशल मीडियात २८ एप्रिल पासून व्हायरल होतेय. ‘१५ ऑगस्ट, २६ जानेवारी हे राष्ट्रीय सण माहिती होते, महाराष्ट्रात ईद हा कधीपासून राष्ट्रीय सण होऊ लागला आहे? तसं झालं तर मग दिवाळी, गुढीपाडवा, दसरा हे देखील राष्ट्रीय सण असायला हवेत. राम जन्म, कृष्णजन्माष्टमी हे देखील राष्ट्रीय सण असायला हवेत. महाराष्ट्र कोणत्या दिशेला जात आहे?’ अशा कॅप्शनसह ते पत्रक व्हायरल होतेय.

‘चेकपोस्ट मराठी’चे वाचक निशिकांत गोळे यांनी ट्विटर, फेसबुकप्रमाणेच व्हॉट्सऍपवरही हे पत्रक व्हायरल होत असल्याचे निदर्शनास आणून देत पडताळणीची विनंती केली.

पडताळणी:

‘चेकपोस्ट मराठी’ने व्हायरल दाव्यांची सत्यता पडताळण्यासाठी विविध कीवर्डसच्या आधारे गुगल सर्च केले असता असे लक्षात आले की भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाने आपल्या अधिकृत वेबसाईटवर देशातील महत्वाच्या सण-उत्सवांची यादी प्रकाशित केली आहे.

यामध्ये एकूण २० सण-उत्सवांची नावे आहेत. त्यात प्रजसत्ताक दिन, स्वातंत्र्य दिन तर आहेच पण सोबतीला राम नवमी, कृष्ण जन्माष्ठमी, ख्रिसमस, मोहरम आणि ईद सुद्धा आहेत. परंतु या यादीवर कुठेही ‘राष्ट्रीय सण/ उत्सव’ असा स्पष्ट उल्लेख केलेला नाही.

Source: indiaculture.nic.in

राष्ट्रीय सण/ उत्सव कोणते?

भारताचे राष्ट्रीय सण उत्सव कोणते? असा गुगलला प्रश्न विचारला तर विकीपिडिया आणि इतर खाजगी साईट्सवर ‘प्रजासत्ताक दिन’, ‘स्वातंत्र्य दिन’ आणि ‘महात्मा गांधी जयंती’ असे तीन दिवस राष्ट्रीय सण उत्सव असल्याचे नमूद केल्याचे दिसते; परंतु यासाठी त्यांनी कशाचा संदर्भ घेतला आहे हे पाहिले असता त्यात कोणत्याही शासकीय अधिकृत वेबसाईटचा किंवा परीपत्रकाचा उल्लेख आढळत नाही.

अधिक शोधाशोध केली असता २३ मे २०१२ रोजीची बातमी आम्हाला सापडली. उत्तर प्रदेशातील लखनऊ येथील १० वर्षीय अश्विनी पराशर या मुलीने माहितीच्या अधिकारात मागविलेल्या उत्तरात असे लक्षात आले की प्रजासत्ताक दिन, स्वातंत्र्य दिन आणि महात्मा गांधी जयंती हे राष्ट्रीय सण असल्याचे सरकार दरबारी कोगदोपत्री कुठेही नमूद नाही.

Source: India Today

मोदी सरकार आल्यानंतर यात काही बदल झाले का? हे तपासत असताना २०१६ सालची ‘अमर उजाला’ने प्रसिद्ध केलेली बातमी आम्हाला मिळाली. आरटीआय कार्यकर्ता दानिश खां यांनी ३० जानेवारी २०१५ रोजी सदर दिवसांची माहिती मागवली परंतु यांना राष्ट्रीय सण घोषित करण्याविषयी कुठलीही माहिती गृहमंत्रालयाकडे नसल्याचेच स्पष्ट झाले.

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीत हे स्पष्ट झाले की भारत सरकारकडे ‘राष्ट्रीय सण’ अशी कुठलीही संकल्पना नाही. सांस्कृतिक मंत्रालयाने नमूद केलेल्या प्रमुख सण-उत्सवांत त्यात प्रजसत्ताक दिन, स्वातंत्र्य दिन तर आहेच पण सोबतीला राम नवमी, कृष्ण जन्माष्ठमी, ख्रिसमस, दिवाळी, मोहरम आणि ईद सुद्धा आहेत.

महाराष्ट्र शासनाच्या पत्रात ‘ईद’चा उल्लेख राष्ट्रीय सण म्हणून करणे जसे तथ्यास धरून नाही, तसेच १५ ऑगस्ट, २६ जानेवारी हे राष्ट्रीय सण आहेत असे म्हणणेही तथ्यपूर्ण नाही.

हेही वाचा: मोराला राष्ट्रध्वजामध्ये गुंडाळून अंतिम संस्कार करण्याचा ‘प्रोटोकॉल’ नाही! ते कृत्य कायद्याच्या चौकटीत बसत नाही!

(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती आमच्या (9172011480) या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.

आपण फेसबुकट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता)

More from धर्म-संस्कृतीMore posts in धर्म-संस्कृती »
More from राजकारणMore posts in राजकारण »

Be First to Comment

    Leave a Reply

    Your email address will not be published.

    × न्यूज अपडेट्स मिळवा