Press "Enter" to skip to content

‘मोबाईल नंबर अकरा आकड्यांचा होणार’ म्हणत सकाळ, मटा, इंडिया टुडेने दिल्या चुकीच्या बातम्या

‘मोबाईल नंबर अकरा आकड्यांचा होणार’ असल्याच्या बातम्या दि. ३० मे रोजी अनेक न्यूजपेपर आणि चॅनल्सने प्रसिद्ध केल्या होत्या. मराठीत ‘सकाळ’ आणि ‘महाराष्ट्र टाईम्स’ या नामांकित न्यूजपेपर्सने सुद्धा या बातम्या छापल्या होत्या.

इंग्रजीमध्ये ‘इंडिया टुडे’ने हे वृत्त प्रकाशित केले आहे. ‘ट्राय’च्या ‘युनिफाईड नंबरिंग प्लान’नुसार प्रस्तावित बदलांपैकी हा एक बदल असल्याचे म्हंटले आहे. ‘सकाळ’, ‘महाराष्ट्र टाईम्स’ आणि ‘इंडिया टुडे’ ही केवळ उदाहरणादाखल दिलेली नावं. इतरही अनेक ‘हिंदी’ तसेच ‘इंग्रजी’ वृत्तपत्रांनी ही बातमी प्रकाशित केली आहे.

पडताळणी

मोबाईल नंबर जर खरंच ११ अंकी होणार असेल तर गोष्टी नेमक्या काय आणि कश्या पद्धतीने बदलणार आहेत याची ‘चेकपोस्ट मराठी’ने पडताळणी सुरु केली. वेगवेगळ्या माध्यमसंस्थांनी दिलेल्या बातम्यांमधून ‘ट्राय’च्या अनेक वेगवेगळ्या शिफारसी आमच्या वाचनात आल्या.

याच संशोधनादरम्यान ‘महाराष्ट्र टाईम्स’च्या वेबसाईटवर २१ मे २०१८ रोजी प्रकाशित झालेली एक बातमी आमच्या वाचनात आली. ‘चिंता नको ! मोबाईल क्रमांक १० अंकीच राहणार’ या हेडलाईनसह प्रकाशित बातमीनुसार यापूर्वी देखील मोबाईल क्रमांक १० वरून १३ अंकी होणार असल्याचे दावे करण्यात आले असल्याची बाब समोर आली. त्यामुळे सध्याच्या दाव्यांसंदर्भात ‘ट्राय’ने नेमकं काय म्हंटलय हे आम्ही शोधायला सुरुवात केली.

त्यानंतर आमच्या हाती ‘ट्राय’च्या वेबसाईटवर सचिव एस.के. गुप्ता यांच्या सहीनिशी दि. ३१ मे २०२० रोजी प्रसिद्धीस देण्यात आलेलं पत्रक लागलं. ‘ट्राय’चं प्रसिद्धी पत्रक आणि शिफारसी दोन्हीही ‘ट्राय’च्या वेबसाईटवर उपलब्ध आहेत. प्रसिद्धी पत्रकात ‘ट्राय’ने स्पष्ट केलेले आहे की मोबाईल नंबर १० अंकावरून ११ अंकी करण्याचा ‘ट्राय’चा कुठलाही विचार नाही. ‘ट्राय’ने प्रसिद्धी पत्रकात म्हंटलय,

“देशभरात पुरेसे नंबर उपलब्ध करून देण्यासंदर्भातील शिफारसी २९ मे रोजी देण्यात आल्या आहेत. त्यासंदर्भात प्रसिद्धी पत्रक देखील जारी करण्यात आलं होतं. पण असं निदर्शनास आलंय की ‘ट्राय’ने देशभरात ११ अंकी नंबर लागू करण्याची शिफारस केल्याचं वृत्त काही माध्यमांनी दिलंय. हा ‘ट्राय’च्या शिफारशींचा पूर्णपणे चुकीचा अर्थ लावण्यात आला आहे. ‘ट्राय’ने मोबाईलचे नंबर ११ अंकी बनविण्याची कुठलीही शिफारस केलेली नाही.

खरं तर ‘ट्राय’च्या शिफारसीनुसार देशात १० अंकी मोबाईल नंबरच लागू राहतील. आम्ही ११ अंकी मोबाईल लागू करण्याची योजना स्पष्टपणे नाकारली आहे. फिक्स्ड लँडलाईन नंबरवरून मोबाईलवर फोन लावण्यापूर्वी ‘०’ डायल करण्याची शिफारस मात्र करण्यात आली आहे. मोबाइल नंबर पूर्वी ‘०’ लावल्यामुळे मोबाईल नंबरची संख्या वाढणार नाही. मात्र या पद्धतीमुळे २५४४ मिलियन नंबर मात्र वाढतील.

वस्तुस्थिती

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीत हे स्पष्ट झाले आहे की लँडलाईन नंबरवरून मोबाईलवर फोन लावण्यापूर्वी ‘०’ डायल करण्याची शिफारस ‘ट्राय’कडून करण्यात आल्याचे अनेक माध्यमसंस्थांच्या बातम्यांमध्ये म्हणण्यात आले आहे. अशा प्रकारची शिफारस ‘ट्राय’कडून करण्यात आली आहे. हे अगदी खरं आहे

मात्र दूरसंचार नियामक प्राधिकरण अर्थात ‘ट्राय’ने ग्राहकांचा मोबाईल नंबर १० अंकावरून ११ अंकी बनविण्याची शिफारस केलेली नाही. उलट ‘ट्राय’ १० अंकी नंबरची सद्यस्थितीतील व्यवस्था टिकवून ठेवण्यासाठीच आग्रही आहे.

म्हणजेच ‘मोबाईल नंबर अकरा आकड्यांचा होणार’ म्हणत सकाळ, मटा, इंडिया टुडे सारख्या नामांकित माध्यमांनी दिलेल्या बातम्या चुकीच्या होत्या.

हे ही वाचा

काय सांगताय? भोपाळमध्ये खरंच ‘होमिओपॅथी’ औषधांनी कोरोना रुग्ण ठणठणीत बरे झाले ?

More from लाइफस्टाइलMore posts in लाइफस्टाइल »

Be First to Comment

    Leave a Reply

    Your email address will not be published.

    × न्यूज अपडेट्स मिळवा