स्वयंपाकासाठी वापरण्यात येणाऱ्या गॅसचा म्हणजेच LPG सिलेंडरच्या दरवाढीस केंद्र सरकार नव्हे, तर राज्य सरकार कारणीभूत आहे. आपण केंद्राचा केवळ ५% आणि राज्याचा तब्बल ५५% टॅक्स (tax on lpg cylinder) मोजत आहोत, अशी आकडेवारी दर्शवणारा मेसेज सोशल मीडियात व्हायरल होतोय.
व्हायरल दावा:
स्वयंपाक गॅस किंमत विश्लेशन मुलभूत किंमत …………. ₹. 495.00 केंद्र सरकार कर..रा…………₹.24.75 वाहतूक, ……………………₹. 10.00 ---------------------------------------------- एकूण किंमत …….. …….₹..529.75 राज्य सरकार कर………..₹..291.36 राज्यातील ट्रान्सपोर्ट……..₹.. 15.00 डीलर्स कमिशन……………₹…. 5.50 अनुदान ……………………₹.. 19.57 ---------------------------------------------- ग्राहक पैसे देते 1 सिलिंडर.₹.861.18 केंद्र सरकार कर 5%, व राज्य सरकार कर 55 % तर कृपया स्वयंपाकाच्या गॅस-किंमत वाढीसाठी कोणते सरकार, केंद्र किंवा राज्य दोषी आहे हे शोधा! 🚩♂️🇮🇳🤨🙏🙏🤫🇮🇳♂️
लोकनेते देवेंद्र फडणवीस, सीएम देवेंद्र फडणवीस फॅन क्लब, भारत रक्षा मंच, पप्पू के राजनीतिक व्यंग, वी आर अगेन्स्ट सिकुलरीजम, ऑल वर्ड जैन परिवार या अशा फेसबुक ग्रुप्सवर या पोस्ट्स व्हायरल होतायेत.
बोईसर भाजपचे सरचिटणीस कृपाल जी रावत यांच्या नाव आणि नंबरसह काही स्क्रिनशॉट व्हायरल होताना दिसतायेत.
‘चेकपोस्ट मराठी’चे वाचक प्रवीण साखरे, दत्तू गवाणकर,मितेश टाके आणि राजेंद्र काळे यांनी फेसबुक, ट्विटरसह व्हॉट्सऍपवर देखील अशाप्रकारचे मेसेज फॉरवर्ड होत असल्याचे निदर्शनास आणून देत पडताळणीची विनंती केली.
पडताळणी:
- व्हायरल दाव्यातील सर्वात मोठी चूक म्हणजे LPG सिलेंडरवर दर्शवण्यात आलेला राज्य आणि केंद्राचा वेगवेगळा टॅक्स. केंद्र सरकारच्या निर्णयानुसार २०१७ सालापासून LPG सिलिंडरवर केवळ GST लागू आहे. GST व्यतिरिक्त राज्याचा इतर कुठलाही वेगळा कर सिलेंडरवर आकारला जात नाही.
- घरगुती वापराच्या LPG सिलेंडरवर आकारण्यात येणाऱ्या ५% GST पैकी २.५% रक्कम केंद्र सरकारला आणि २.५% राज्य सरकारला मिळते.
- व्हायरल दाव्यात रकमेचे विवरण नेमके घरगुती वापराच्या सिलिंडरचे आहे की व्यावसायिक याचा उल्लेख नाही. तरीही आम्ही पडताळणी केली असता असे समजले की व्यावसायिक सिलिंडरवर देखील १८% GST वगळता राज्य सरकारचा इतर कुठला टॅक्स नाही.
- आपण सिलिंडर घेतल्यानंतर बिल मागाल तर त्यामध्ये स्पष्टपणे केंद्र आणि राज्याच्या GST चे किती किती रुपये आकारले जात आहेत ते लक्षात येईल. नमुना दाखल आम्हाला इंटरनेटवर सापडलेल्या मागच्याच महिन्यातील एका बिलाचा फोटो येथे देत आहोत.
वस्तुस्थिती:
‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीत व्हायरल दावा फेक असल्याचे स्पष्ट झाले. LPG सिलिंडरच्या किंमतीवर विविध राज्यातील राज्य सरकारकडून वेगवेगळा टॅक्स (tax on lpg cylinder) आकारला जात आकारला जात नाही.
LPG सिलिंडरवर केवळ केंद्र सरकारकडून ५% GST आकारला जातो. याचाच अर्थ असा की केंद्र केवळ ५% आणि राज्य ५५% टॅक्स आकारत असल्याचे सांगत LPG सिलिंडरच्या दरवाढीचे खापर राज्य सरकारवर फोडण्यासाठी केले जाणारे दावे फेक आहेत.
हेही वाचा: दिलीप कुमार पाकिस्तानी एजंट होते? त्यांनी नौदल विधवांच्या संस्थेत भ्रष्टाचार केलेला?
(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती आमच्या (9172011480) या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.
आपण फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता)
Be First to Comment