Press "Enter" to skip to content

रतन टाटा यांच्या नावे उद्योजकांना देण्यात आलेला उभारीचा संदेश फेक!

कोरोना महामारीच्या काळात उद्योगधंद्याचं मोठं नुकसान झालं आहे. अशा स्थितीत सोशल मिडीयावर उद्योगपती रतन टाटा यांच्या नावाने एक संदेश व्हायरल झालाय. “२०२० हे फक्त जिवंत राहायचे वर्ष आहे. नफा-नुकसानीचा अजिबात विचार करू नका. स्वप्न आणि योजनांविषयी चकार शब्दही काढू नका. या वर्षी स्वतःला जिवंत ठेवणे हेच सर्वात महत्वाचे आहे. जिवंत राहणे हाच मोठा नफा आहे.” अशा अर्थाचा हा संदेश आहे.

Advertisement

काही लोकांनी टाटांनी सांगितलंय म्हणून फारच मनोभावे फॉरवर्ड केलंय तर काहींनी ‘विश्वास नांगरे पाटील, नाना पाटेकर, व.पु. काळे या सन्माननीय लोकांच्या यादीत एका अद्वितीय व्यक्तिमत्वाचे नाव’ असं म्हणत फेसबुकवर डकवलं आहे.

रतन टाटांच्या नावाने दिला गेलेला हा संदेश फक्त सोशल मिडीयावरच व्हायरल झाला असं नाही, तर ‘प्रभात खबर’ या हिंदी दैनिकाच्या जमशेदपूर आवृत्तीच्या पहिल्या पानावर रतन टाटांच्या नावाने छापण्यात आली होती.

पडताळणी

मुळात प्रथमदर्शनीच अतार्किक वाटणाऱ्या या दाव्याची पडताळणी करण्यासाठी आम्ही राष्ट्रीय पातळीवरील महत्वाच्या वृत्तपत्रांमध्ये अशी काही बातमी छापण्यात आली आहे का, याचा शोध घेतला. पण कुठल्याही महत्वाच्या पेपर किंवा न्यूज चॅनलवर आम्हाला यासंबंधीची कुठलीही बातमी पहायला मिळाली नाही. टाटा सन्सच्या वेबसाईटवर देखील काही माहिती मिळतेय का हे तपासण्याचा प्रयत्न केला, परंतु तिथे देखील अशा प्रकारचा कुठलाही संदेश आमच्या बघण्यात आला नाही. त्यानंतर आम्ही रतन टाटा यांच्या ट्विटस तपासल्या तिथे खुद्द रतन टाटांनीच हा दावा फेटाळून लावल्याचं लक्षात आलं. आपण असा कुठलाही संदेश दिला नसल्याचं स्पष्ट करताना रतन टाटा यांनी केलेलं एक ट्वीट आमच्या हाती लागलं.

या ट्वीटमध्ये रतन टाटांनी दैनिक प्रभात खबर मधील बातमीचा फोटो पोस्ट करताना असं म्हंटलय की, “मी असं म्हंटलेल नाही. मला जेव्हा कधी शक्य असेल, त्यावेळी मी खोट्या बातम्यांचं खंडन करीनच, पण तुम्ही  सुद्धा बातमीच्या सूत्रांची  खातरजमा करून घेण्याची सवय लावा. कुठल्यातरी कोटसोबत माझा फोटो छापलेला आहे, याचा अर्थ असा नाही होत की ते मीच बोललो आहे. अनेकांना या समस्येचा सामना करायला लागत आहे.”

वस्तुस्थिती  

खुद्द रतन टाटांनीच आपण असा काही दावा केला नसल्याचं सांगितल्याने सोशल मिडियावर व्हायरल झालेले संदेश वस्तुस्थितीला धरून नाहीत. ते दिशाभूल करणारे आहेत, हे स्पष्ट होतंय. त्यामुळे या दाव्यांना आम्ही ‘चेकपोस्ट’वरच अडवतोय. 

हे ही वाचा- अर्जुन देशपांडे यांच्या कंपनीचे ५०% शेअर्स टाटांनी घेतले नाहीत. एबीपी, भास्करच्या बातम्या चुकीच्या

More from समाजकारणMore posts in समाजकारण »

4 Comments

Leave a Reply

Your email address will not be published.

× न्यूज अपडेट्स मिळवा