Press "Enter" to skip to content

सुशांतसिंह राजपूतला श्रद्धांजली वाहताना राहुल गांधी त्यास क्रिकेटर म्हणाले का?

अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या दुर्दैवी आत्महत्येनंतर वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवरांकडून सुशांतला श्रद्धांजली वाहण्यात येतेय. सिनेक्षेत्रातील दिग्गजांसह क्रीडा आणि राजकिय क्षेत्रातील मान्यवरांनी देखील या आत्महत्येबद्दल दुःख व्यक्त केलंय.

Advertisement

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी देखील सुशांतच्या मृत्यूनंतर त्याला श्रद्धांजली वाहिलीये. परंतु राहुल गांधी यांचं एक ट्विट सध्या व्हायरल होतंय. या ट्विटच्या सत्येतेची विचारणा ‘चेकपोस्ट मराठी’ कडे करण्यात आलीय.

काय आहे ट्विटमध्ये ?

सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असलेल्या या ट्विटमध्ये राहुल गांधींनी सुशांतला श्रद्धांजली वाहिलीये. श्रद्धांजली वाहताना राहुल गांधी सुशांतचा उल्लेख ‘तरुण आणि प्रतिभावंत क्रिकेटर’ करत आहेत असं या ट्विटवरून दिसतं.

edited tweet of rahul gandhi about sushant singh rajput
credit: twitter

याच स्क्रीनशॉटचा आधार घेऊन ट्विटरवर राहुल गांधी विरोधकांनी टीकेची राळ उठवली आहे. ‘और ये प्रधानमंत्री बनेगा’, ‘ऍक्टरको क्रिकेटर बना दिया इसने’,’ but Rahul gandhi knows him as a cricketer’ असे काही कॅप्शन देत हा स्क्रीनशॉट ट्विटरवर दिवसभर फिरत होता. शेलक्या भाषेत राहुल गांधींना टीकेचे लक्ष्य बनवले जात होते.

पडताळणी:

राहुल गांधी यांच्या व्हायरल ट्विटकडे व्यवस्थित बघितलं तरी या ट्विटमधील मजकुराशी छेडछाड करण्यात आली आहे, हे सहज लक्षात येण्यासारखं आहे.

राहुल गांधींच्या ट्विटमधील इतर शब्दांचा आणि ‘cricketer’ या शब्दाचा फॉन्ट वेगळा असल्याचं लक्षात येईल. त्यामुळे प्रथमदर्शनीच हे ट्विट फेक असल्याचं लक्षात येतं. परंतु तरीही अधिक खातरजमा करण्यासाठी आम्ही राहुल गांधी यांच्या ट्विटर हँडलला भेट दिली.

राहुल गांधींच्या ट्विटर हँडलवर त्यांचं मूळ ट्विट उपलब्ध आहे. त्यात त्यांनी सुशांतचा उल्लेख ‘तरुण आणि प्रतिभावंत कलाकार’ असाच केलेला आहे.

‘सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूबद्दल ऐकून व्यथित झालोय. त्याच्या रूपाने एक तरुण आणि प्रतिभावंत कलाकार फार लवकर जग सोडून गेलाय. सुशांतचे कुटुंबिय, मित्रपरिवार आणि चाहत्यांच्या दुःखात मी सहभागी आहे.’ असं राहुल गांधींनी आपल्या ट्विटमध्ये म्हंटलंय.

वस्तुस्थिती:

राहुल गांधींच्या व्हायरल होत असलेल्या ट्विटशी छेडछाड करण्यात आलेली आहे, हे ‘चेकपोस्ट मराठी‘च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झालेलं आहे.

सुशांतने एम.एस. धोनीवरील बायोपिकमध्ये धोनीची भूमिका केली होती. हाच धागा पकडून राहुल गांधी सुशांतला क्रिकेटर समजत असत, असं भासवण्याचा खोडसाळपणा या ट्विटच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न होत आहे.

हेही वाचा: सुशांतची ‘सुसाईड नोट’ सापडल्याचं सांगत युट्युबर्सने दिल्या खोट्या बातम्या

More from राजकारणMore posts in राजकारण »
More from लाइफस्टाइलMore posts in लाइफस्टाइल »

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published.

× न्यूज अपडेट्स मिळवा