देशातील वाढत्या महागाईच्या विरोधात काँग्रेसकडून दिल्लीतील रामलीला मैदानावर हल्लाबोल रॅलीचे (Halla Bol Rally) आयोजन करण्यात आले होते. या रॅलीत राहुल गांधींनी (Rahul Gandhi) महागाईच्या मुद्द्यावरून केंद्र सरकारवर जोरदार टीका केली.
आता राहुल गांधींच्या हल्लाबोल रॅलीतील भाषणातील एक क्लिप सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतेय. या क्लीपच्या आधारे राहुल गांधी आटा (पीठ) लिटरमध्ये मोजत असल्याचे सांगत राहुल गांधींची खिल्ली उडवली जातेय.
‘टाईम्स नाऊ नवभारत’च्या संपादक नाविका कुमार यांनी राहुल गांधींच्या भाषणाची ही क्लिप शेअर केली होती. त्यात त्यांनी राहुल गांधी आटा लिटरमध्ये मोजत असल्याचा दावा केलाय.
अनेक युजर्सकडून हा व्हिडीओ शेअर केला जातोय. व्हिडीओ शेअर करणाऱ्यांमध्ये अनेक पत्रकारांचा समावेश आहे.
राहुल गांधी यांच्या भाषणाची जी क्लिप व्हायरल होतेय, त्यावर ‘ANI’ या वृत्तसंस्थेचा लोगो बघायला मिळतोय. त्यामुळे आम्ही ‘ANI’ या वृत्तसंस्थेच्या ट्विटर हँडलवर जाऊन मूळ क्लिप शोधण्याचा प्रयत्न केला. ‘ANI’ च्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरून 4 सप्टेंबर रोजी करण्यात आलेल्या ट्विटमध्ये आम्हाला हा व्हिडीओ बघायला मिळाला.
राहुल गांधी आपल्या भाषणादरम्यान 2014 आणि 2022 या दोन्ही वर्षांमधील महागाईची तुलना करताहेत. त्यात ते वेगवेगळ्या वस्तूंच्या 2014 आणि 2022 मधील किमतीचे आकडे देताहेत. यामध्ये पेट्रोल, डिझेल, मोहरी तेल, दुधाच्या वाढलेल्या किंमती ते सांगताहेत. त्यानंतर ते आटा (पीठ) 2014 साली 22 रुपये लिटर आणि आज 40 रुपये लिटर असं म्हणताहेत. मात्र, आपल्याकडून एकक वापरताना चूक झाल्याचे लक्षात येताच राहुल गांधी लगेच आपली चूक सुधारतात आणि पुढे ‘केजी’ (किलोग्रॅम) असं म्हणताना बघायला मिळताहेत.
आपल्या भाषणात राहुल गांधी ज्या गोष्टींच्या किंमती (पेट्रोल, डिझेल, मोहरी तेल, दुध) सांगताहेत, त्या एकामागून एक येणाऱ्या या सर्वच गोष्टींच्या मोजमापाचे एकक म्हणजे ‘लिटर’ होय. त्यामुळे बोलण्याच्या ओघात राहुल गांधींकडून आट्यासाठी देखील ‘लिटर’ हे एकक वापरले गेल्याचे दिसतेय.
राहुल गांधींकडून झालेली चूक ही एक मानवी चूक आहे. कुणाकडूनही ती होऊ शकते. भाषणात राहुल गांधी आपली चूक लगेच सुधारतात देखील. मात्र आता सोशल मीडियावर या व्हिडिओतील ठराविक भाग कट करून तो चुकीच्या दाव्यांसह व्हायरल केला जातोय.
हेही वाचा- राहुल गांधींचा आपण स्वतः महात्मा गांधींशी संवाद साधल्याचा दावा? वाचा सत्य!
(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती आमच्या (9172011480) या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.
आपण फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता)
[…] हेही वाचा- राहुल गांधी पीठ ‘लिटर’ मध्ये मोजतात? म… […]
[…] हेही वाचा- राहुल गांधी पीठ ‘लिटर’ मध्ये मोजतात? म… […]