Press "Enter" to skip to content

मुंबईच्या रक्षणासाठी ‘मुंबई पोलीस’ सक्षम, मिलिटरी लॉकडाऊन निव्वळ अफवा!

‘पुढच्या १० दिवसांसाठी संपूर्ण मुंबईमध्ये मिलिटरी लॉकडाऊन लागणार आहे. त्यामुळे जीवनावश्यक वस्तू साठवून ठेवा. मिलिटरी लॉकडाऊनच्या काळात फक्त दुध आणि औषधी उपलब्ध असतील’ असा दावा सोशल मिडीयावर केला जातोय.

Advertisement

व्हॉटसअपवर व्हायरल झालेल्या दाव्यात तर मुंबईसह पुण्यात देखील मिलिटरी लॉकडाऊन लागणार असल्याचं म्हंटलय. शहर मिलिटरीच्या ताब्यात दिलं जाऊ शकतं आणि उद्धव ठाकरे याचं शहरावरील नियंत्रण संपू शकतं, असा दावा  व्हायरल मेसेजमध्ये करण्यात आलाय.

महाराष्ट्र सरकारची बैठक सुरु असून रात्रीपर्यंत लॉकडाऊनची घोषणा करण्यात येईल. मुंबईतल्या आपल्या मित्रांना या गोष्टीची कल्पना द्या. सर्व जीवनावश्यक गोष्टींचा साठा करून ठेवा, असंही या मेसेजमध्ये म्हणण्यात आलं आहे.

कोरोनाचा संसर्ग पसरू नये म्हणून घोषित करण्यात आलेलं लॉकडाऊन लोक व्यवस्थित पाळत आहेत की नाहीत. कुणी नियमांचा भंग तर करत नाहीयेत ना? हे पाहण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यांत जागोजागी पोलिस दल तैनात आहे. परंतु आता परिस्थिती पोलिसांच्याही हाताबाहेर जाऊ लागल्याने केंद्र सरकारकडून मिलिटरी पुण्या मुंबईत दाखल होईल असे दावे केले जात आहेत.

पडताळणी:

सोशल  मिडीयावर व्हायरल होत चाललेल्या या दाव्याचा शोध घेतला असता आम्हाला मुंबई पोलिसांच्या अधिकृत ट्वीटर अकाऊंटवरून ७ मे रोजी करण्यात आलेलं एक  ट्वीट सापडलं. त्यात मुंबई पोलीस म्हणतात, ‘आम्हाला कल्पना आहे की सध्या खूपच मोकळा वेळ आहे. पण त्या वेळेचा उपयोग अफवा पसरवण्यापेक्षा इतरही चांगल्या गोष्टींसाठी नक्कीच केला जाऊ शकतो. तुम्हाला ना जीवनावश्यक गोष्टींचा साठा करण्याची आवश्यकता आहे, ना आर्मी किंवा पॅरामिलिटरी फोर्सेस बोलाविण्यात येणार आहेत. निवांतपणे घरातच बसून रहा. कोरोनाविरुद्धच्या लढ्यात तेवढंच करायची आवश्यकता आहे.’

मुंबई पोलिसांच्या या ट्वीटनंतर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी देखील मुंबईत सैन्य तैनात करण्यात येणार असल्याचे दावे म्हणजे खोडसाळपणे पसरविण्यात येत असलेली अफवा असल्याचं स्पष्ट केलं होतं. कुठल्याही प्रकारची परिस्थिती सांभाळण्यासाठी मुंबई पोलीस पुरेसे सक्षम असल्याचं, गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हंटलं होतं.

मुंबई पोलीस आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांनी हे स्पष्टीकरण देऊन जवळपास पंधरा दिवस उलटलेत, परंतु तरी देखील सोशल मिडीयावरून केले जाणारे हे दावे थांबले नाहीत शिवाय त्यांचं प्रमाण देखील खूप अधिक आहे.

हे लक्षात आल्याने काल दि. २६ मे रोजी पुन्हा एकदा मुंबई पोलिसांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून ह्या दाव्यांचं खंडन केलंय.

आपल्या ताज्या ट्वीटमध्ये मुंबई पोलीस म्हणतात, “सोबत जोडलेला मेसेज फेक आहे, परंतु तो मोठ्या प्रमाणात पसरलाय. तुम्हालाही जर हा मेसेज मिळाला तर तो पुढे न पाठवता ही साखळी तिथेच मोडून काढा. सर्वच अत्यावश्यक गोष्टींचा पुरवठा उपलब्ध असेल आणि लॉकडाऊनच्या नियमांप्रमाणे दळणवळणाच्या परवानग्या देखील देण्यात येत आहेत.

वस्तुस्थिती:

मुंबई पोलीस आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडून आलेल्या स्पष्टीकरणानंतर मुंबईमध्ये पुढच्या १० दिवसांसाठी मिलिटरी लॉकडाऊन लागणार असल्याच्या दाव्यांमध्ये कुठलंही तथ्य नसल्याचं स्पष्ट झालेलं आहे. त्यामुळे या दाव्यांना लाल झेंडा दाखवून आम्ही ‘चेकपोस्ट’वरच अडवतोय.

मुंबई पोलिसांनी सांगितल्याप्रमाणे तुम्हीही अफवांना बळी पडू नकात आणि जिथे कुठे अशा प्रकारच्या अफवा पसरवल्या जात आहेत, तिथपर्यंत हे तथ्य पोहचवून अफवांची साखळी मोडून काढायला आपलं योगदान द्या.

हे ही वाचा- ‘इंडिया टीव्ही’ने चायनीज म्हणून वापरला कोरियन सेलिब्रिटीचा फोटो.

More from समाजकारणMore posts in समाजकारण »

Be First to Comment

    Leave a Reply

    Your email address will not be published.

    × न्यूज अपडेट्स मिळवा