इटली मध्ये कोरोना व्हायरसवरील लस सापडली असल्याची माहिती देणारा, ‘टाईम्स नाऊ’ न्यूज चॅनेलचा व्हिडीओ भारत पवार यांनी शेअर केलाय.
‘इटलीने सर्वात आधी “कोरोना व्हॅक्सीन (लस)” शोधून काढली आहे. त्यांनी कोरोना virus ला मारणाऱ्या antibodies चा शोध लावल्याचा दावा केला आहे.’ असं त्यांनी फेसबुक पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिलंय. २ मिनिट ५६ सेकंदाचा हा व्हिडीओ आहे.
पडताळणी:
सद्यस्थितीत अवघं जग कोरोना व्हायरसवरील लसीकडे डोळे लाऊन बसलेलं आहे. अशा परिस्थितीत इटली मध्ये कोरोनावरील लस शोधली जाते आणि त्याची बातमी ‘टाईम्स नाऊ’ व्यतिरिक्त इतर कुठल्याच चॅनेलवर येत नाही, हे बरंच संशयास्पद असल्याने आम्ही या व्हिडीओच्या पडताळणीस सुरुवात केली.
एक गोष्ट व्हिडीओ बघताच लक्षात येते ती म्हणजे व्हिडीओ ‘टाईम्स नाऊ’ चॅनेलच्या ‘इंडिया अपफ्रंट’ या कार्यक्रमातील आहे. त्यामुळे आम्ही लगेच व्हिडीओमध्येच दिसणाऱ्या ‘italy claims world’s 1st covid vaccine times now’ या कीवर्डसह युट्युबवर सर्च केलं.
आमच्या संशोधनात आम्हाला ‘अबाऊट टुडे’ आणि ‘अल्पेश ब्रम्हभट्ट’ या दोन वेगवेगळ्या युट्युब चॅनेलवरून हा व्हिडीओ अपलोड करण्यात आला असल्याचे आढळून आले.
दोन्ही चॅनेलवरून अपलोड करण्यात आलेल्या व्हिडीओमध्ये एक गोष्ट कॉमन होती ती म्हणजे व्हिडिओ अपलोड करण्यात आल्याची तारीख. दोन्ही चॅनेलवरून हा व्हिडीओ साधारणतः महिनाभरापूर्वी ६ मे २०२० रोजी अपलोड करण्यात आला होता.
त्यानंतर आम्ही हा व्हिडीओ वेगवेगळ्या कीवर्डसह ‘टाईम्स नाऊ’च्या अधिकृत युट्युब चॅनेलवर शोधण्याचा प्रयत्न केला, परंतु तिथे मात्र तो मिळाला नाही. यावरून ‘टाईम्स नाऊ’ने बहुधा आपल्या युट्युब चॅनेलवरून हा व्हिडीओ काढून टाकला असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
काय झालं होतं ६ मे रोजी ?
पडताळणीमध्ये संबंधित व्हिडीओ ६ मे रोजीचा असल्याचं तर स्पष्ट झालं होतं, त्यामुळे या दिवशी नेमकं काय झालं होतं ते शोधण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी असं समजलं की या दिवशी इटलीमध्ये कोरोना व्हायरसवरील लस तयार झाली असल्याच्या बातम्या पसरल्या होत्या. त्यातले काही दावे पुढीलप्रमाणे-
- इटलीची राजधानी रोम मधील लजारो स्पालनजानी हॉस्पिटलमध्ये कोरोनावरील लस तयार झाली आहे.
- लसीचा उंदरांवरील प्रयोग यशस्वी. उंदरांनंतर माणसांवर प्रयोग.
- जून मध्ये इटलीत लसीचा वापर सुरु होईल.
वस्तुस्थिती:
साधारणतः महिनाभरापूर्वी इटलीमध्ये कोरोना व्हायरस लस बनविण्याचे काम करत असलेया कंपनीच्या दाव्याच्या आधारे इटलीने कोरोनावरील लस शोधल्याच्या बातम्या देण्यात आल्या होत्या.
सोशल मिडियावर इटलीमध्ये कोरोनावरील लस सापडल्याचा दावा करणारा व्हिडीओ त्याचवेळचा असल्याचे ‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे.
हेही वाचा: सॅनिटायझरच्या वारंवार वापराने कॅन्सरचा धोका आहे का ?
Be First to Comment