मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांना लिहिलेल्या पत्रातील ‘माझ्या हिंदुत्वाला कुणाच्या प्रमाणपत्राची गरज नाही’ या वाक्याची खूप चर्चा झाली. त्यावर प्रतिक्रिया देताना भाजप नेते आशिष शेलार यांनी बाळासाहेब ठाकरेंच्या हिंदुत्वापासून फारकत घेतलेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना देवभूमीहून आलेल्या राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांच्या हिंदुत्वाच्या प्रमाणपत्राची नक्कीच गरज असल्याचे म्हंटले आहे. शिवाय शिवसेनेने कसाबला बिर्याणी (kasab biryani) खाऊ घालणाऱ्या काँग्रेसशी संसार थाटल्याचा दावा देखील शेलार यांनी केलाय.
भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा यांनी देखील गेल्याच महिन्यात ‘आज तक’ न्यूज चॅनेलवरील ‘दंगल’ कार्यक्रमात विचारण्यात आलेल्या एका प्रश्नाच्या उत्तरात काँग्रेस सत्तेत असताना मुंबई हल्ल्यातील आरोपी कसाबला बिर्याणी देण्यात आल्याचा दावा केला होता. यासंदर्भातील व्हिडीओ पात्रा यांनी आपल्या ट्विटर हॅण्डलवरून देखील शेअर केला होता.
यापूर्वी देखील अनेकवेळा भाजप नेत्यांकडून काँग्रेस सरकारच्या काळात कसाबला बिर्याणी देण्यात आल्याचा दावा करण्यात आलेला आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दोन वर्षांपूर्वी राजस्थान विधानसभा निवडणुकीच्या मकराना येथील प्रचारसभेत बोलताना दावा केला होता की, काँग्रेसचे सरकार सत्तेत असताना दहशतवाद्यांना बिर्याणी खाऊ घालण्यात येत होती, आम्ही दहशतवाद्यांना गोळ्या घालतोय.
पडताळणी:
‘कसाब आणि बिर्याणी’ हा किस्सा बराच चर्चेत राहिलेला असून त्यावर मोठ्या प्रमाणात वाद विवाद देखील झालेले आहेत.
कसाब आणि बिर्याणीचा विषय सर्वप्रथम समोर आला होता तो मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यातील दोषी अजमल कसाबवरील खटल्याच्या वेळी. या खटल्यातील सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी कसाबने जेलमध्ये बिर्याणीची मागणी केल्याचं वक्तव्य माध्यमांसमोर दिलं होतं.
निकम यांच्या या वक्तव्यावरून मोठ्या प्रमाणात गदारोळ झाला होता. त्यावरून काँग्रेस सरकारला जनतेचा मोठा रोष देखील सहन करावा लागला होता. मात्र याच उज्जवल निकम यांनी २०१५ साली राजस्थानमधील जयपूर येथे भरलेल्या दहशतवादविरोधी संमेलनानंतर माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना याप्रकरणी खुलासा केला होता.
कसाबने जेलमध्ये कधीच बिर्याणीची मागणी केली नव्हती, ना सरकारकडून कधी कसाबला बिर्याणी (kasab biryani) देण्यात आली. खटल्यादरम्यान देशभरात कसाबच्या बाजूने सहानुभूती निर्माण व्हायला लागली होती. ही सहानुभूती कमी करण्यासाठी आपण खोटी माहिती दिली होती, असं निकम यांनी २०१५ साली सांगितलं होतं.
विशेष म्हणजे निकम यांनी ज्यावेळी हा खुलासा केला त्यावेळी केंद्रात आणि राज्यात देखील भाजपचे सरकार होते. उज्ज्वल निकम यांनी सांगितलेला बिर्याणी प्रकरणाचा संपूर्ण किस्सा आपण ऐकू शकता.
वस्तुस्थिती:
‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की काँग्रेस सरकारच्या कार्यकाळात दहशतवाद्यांना बिर्याणी देण्यात आल्याचा दावा संपूर्णतः खोटा आहे.
हा दावा करणाऱ्या सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनीच या दाव्याविषयीचं सत्य सांगितलेलं आहे. भाजप नेते आशिष शेलार यांनी आणि इतरांनीही वेळोवेळी केलेल्या दाव्याला कुठलाही आधार नाही.
हे ही वाचा- उद्धव ठाकरे यांचा रिपब्लिक चॅनेल बघतानाचा एडिटेड फोटो चुकीच्या दाव्यांसह व्हायरल!
[…] हे ही वाचा- खरंच काँग्रेस सरकारच्या काळात कसाबला… […]
[…] हे ही वाचा- खरंच काँग्रेस सरकारच्या काळात कसाबला… […]