चीनने कोरोना व्हायरस तयार केला आणि पसरवला. सीमेवर चीनी सैन्याच्या कागाळ्या चालू आहेत. म्हणून चीनला धडा शिकवण्यासाठी भारतातील काही लोकांनी ‘बॉयकॉट चायना’ मोहीम राबवायला सुरुवात केलीय.
मोहिमेचा जसा बोलबाला चालू झाला तसं अनेकांनी ‘चीन एवढा हुशार आहे की स्वतः ‘बॉयकॉट चायना’ चे प्रोडक्ट तयार करून विकेल आणि फायदा करून घेईल.’ असं म्हणत विनोदनिर्मिती केली.
हे म्हणून काही दिवस उलटले तोच सोशल मिडीयावर पुराव्यांसह पोस्ट व्हायरल होऊ लागल्या.
फेसबुक युझर प्रशांत गेडाम यांनी एक पोस्ट टाकलीय. त्यात टोप्यांवर ‘बॉयकॉट चायना’ असं लिहिलंय आणि खाली दुसऱ्या फोटोत टोपीच्या आतल्या बाजूला असलेला ‘मेड इन चायना’चा टॅग दाखवला आहे.
हेच फोटोज असलेले एक ट्विट ‘असिफ दर’ या हँडलने शेअर केले आहेत. सोबत ‘‘बॉयकॉट चायना’ टोप्या सुद्धा जर चीन बनवून देत असेल तर तुम्ही कसे त्यांना हद्दपार करणार आहात?’ असेही लिहिलेले आहे.
एका पाकिस्तानी न्यूज पोर्टलने ‘India Protests to “Boycott China” by Wearing Made in China’ या हेडलाईन खाली बातमी प्रसिद्ध करून भारतीयांची खिल्ली उडवली आहे. त्यातही हेच फोटो आणि आसिफ दरचे ट्विट शेअर केले आहे.
सोबतच त्यांनी कॉंग्रेस पक्षाचे नेते आणि माजी खासदार अभिजीत मुखर्जी यांचं एक ट्विटसुद्धा बातमीत आधार म्हणून घेतलंय. या ट्विटमध्ये मुखर्जी म्हणत आहेत, ‘भारतीय भक्तांकडून मोठी मागणी होण्याच्या अपेक्षेने चीन ‘बॉयकॉट चायना’ चे टी-शर्ट बनवत आहे.’
‘डिजिटल प्रभात’ने सुद्धा ‘China is Manufacturing ‘Boycott China’ Caps and T-Shirts Due To High Demand in India’ या हेडलाईनखाली बातमी करून तोच फोटो लावलाय.
पडताळणी:
ज्या फोटोजच्या आधारे चीन ‘बॉयकॉट चायना’चे प्रॉडक्ट तयार करत असल्याचे दावे केले जाताहेत त्या फोटोकडे पाहताच सुज्ञ माणसाला या फोटोशी छेडछाड करण्यात आली असल्याचे लक्षात येईल.
‘बॉयकॉट चायना’ लिहिलेल्या टोप्यांचा आणि ‘मेड ईन चायना’ टॅग असलेल्या टोपीच्या रंगात फरक आहे. परंतु दावा हाणून पाडण्यासाठी एवढे म्हणणे पुरेसे नसल्याने ‘चेकपोस्ट मराठी’ने पडताळणीला सुरुवात केली.
फोटोत ‘बॉयकॉट चायना बेसबॉल कॅप’ असे नाव असलेले फ्लिपकार्टवरील उत्पादन असल्याचे दिसत आहे. म्हणून आम्ही फ्लिपकार्टवर वेगवेगळे कीवर्ड्स टाकून या अशा काही टोप्या आहेत का हे शोधण्याचा प्रयत्न केला पण आम्हाला असे कुठले प्रोडक्ट सापडले नाही.
किंबहुना ३५८ रुपये किंमत असलेल्या फ्लिपकार्ट अश्यूअर्ड कॅप शोधून पाहिल्या, फ्रेंड्सकार्ट ब्रांड असलेल्या टोप्या शोधून पाहिल्या पण असे कुठलेच प्रोडक्ट सापडले नाही.
मग आम्ही तो फोटो बिंग व्हिज्युअल सर्च द्वारे रिव्हर्स ईमेज सर्च करून पाहिला तेव्हा आम्हाला ‘मेड ईन चायना’चा टॅग असणाऱ्या टोपीची मुख्य वेबसाईट मिळाली. ‘fair for all guide’ असे नाव असलेल्या लाइफस्टाइल ब्लॉग वेबसाईटवर एक लेख आहे. या लेखासाठी तीच ‘मेड ईन चायना’चा टॅग असणाऱ्या टोपीची इमेज वापरली आहे. आणि हा ब्लॉग १० जून २०१४ रोजी लिहिलाय.
वस्तुस्थिती:
‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये व्हायरल फोटो मधील प्रोडक्ट फ्लिपकार्टवर सापडलं नाही. ‘बॉयकॉट चायना’ लिहिलेली टोपी आणि ‘मेड ईन चायना’ टॅग असणाऱ्या टोपीचे रंग वेगवेगळे दिसत आहेत. एवढच नव्हे तर ‘मेड ईन चायना’ टॅग असणारी टोपी १० जून २०१४ सालच्या ब्लॉगवरची इमेज आहे.
म्हणजेच काय तर चीन स्वतःच ‘बॉयकॉट चायना’ लिहिलेल्या टोप्या बनवतोय हे सांगण्यासाठी ज्या फोटोचा आधार घेतला जातोय ते फोटोच इकडचे तिकडचे आणून जोडले आहेत. अशा फेक गोष्टींवर विश्वास न ठेवण्यातच शहाणपण.
[…] ‘चीन स्वतःच ‘बॉयकॉट चायना’ लिहिलेल्य… […]
[…] हेही वाचा: ‘चीन स्वतःच ‘बॉयकॉट चायना’ लिहिलेल्य… […]