Press "Enter" to skip to content

‘एबीपी न्यूज’चे पत्रकार जितेंद्र दीक्षित यांची ‘निसर्ग’ चक्रीवादळाची रिपोर्टींग संशयास्पद !

‘एबीपी न्यूज’चे पत्रकार जितेंद्र दीक्षित यांनी ‘निसर्ग’ चक्रीवादळाची जी रिपोर्टिंग केली त्यावर सोशल मीडियात टिकेचं वादळ घोंघावत आहे.

Advertisement

दिनांक ३ जून २०२० रोजी महाराष्ट्राला ‘निसर्ग’ चक्रीवादळाचा तडाखा बसला. विविध न्यूज चॅनल्सने वेगवेगळ्या ठिकाणच्या रिपोर्टिंगसाठी आपले प्रतिनिधी तैनात केले होते.
‘एबीपी न्यूज’च्या एका पत्रकाराने मुंबईतील वादळाचे परिणाम दाखवण्यासाठी यासाठी एक रिपोर्ट केला. त्या रिपोर्टच्या टीव्हीवरील प्रक्षेपणाच्यावेळचा मोबाईलने रेकॉर्ड केलेला व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झालाय.

काय आहे दावा?

‘चेकपोस्ट मराठी’ला मिळालेल्या माहिती प्रमाणे नितीन कक्कर या फेसबुक युझरने सर्वात आधी हा व्हिडीओ अपलोड केलाय. अपलोड करताना त्यांनी असं लिहिलंय की, “रिपोर्टरच्या मागे पिवळ्या रेनकोटमध्ये असणारा जो माणूस आहे तो शांतपणे आपलं काम करत आहे. ..और ये भैया उडे जा रहे है. ‘निसर्ग’से कुछ पर्सनल है क्या?”

त्याच पोस्टमध्ये अपडेट म्हणून त्यांनी मागे दोन लोक आहेत असंही निदर्शनास आणून दिलंय.
मग तो व्हिडीओ अनेक हिंदी-मराठी भाषिक लोकांनी आपापल्या फेसबुक वॉलवर शेअर केला. फेसबुक युझर ‘सुधीर उत्तम नांगरे’ यांनी ती पोस्ट शेअर करून असं लिहिलंय की “या रिपोर्टरच्या मागे काम करणारी व्यक्ती बघा आणि ठरवा की, किती भारी ऍक्टर आहे हा रिपोर्टर”

credit: facebook

आरोग्य पत्रकार डॉ. संतोष आंधळे यांनी देखील आपल्या फेसबुक वॉलवर या संबंधी एक पोस्ट टाकली आहे.

credit: facebook

कक्कर यांनी टाकलेला व्हिडीओ आठ हजार हून अधिक लोकांनी शेअर केलाय.

पडताळणी:

‘चेकपोस्ट मराठी’ने वरील दाव्यांची पडताळणी करण्यासाठी सर्वात आधी ‘एबीपी न्यूज’च्या ‘त्या’ बातमीपत्राचा शोध घ्यायला सुरुवात केली.

आम्हाला या बातमीचा वेगळा असा व्हिडीओ मिळाला नाही. म्हणून मग युट्युबवरील ३ जूनच्या दिवसभराच्या लाइव्ह स्ट्रीममध्ये शोधाशोध सुरु झाली.
साधारण ३ वाजताच्या बातमीपत्रात अखिलेश आनंद अँकर असताना मुंबईच्या विविध भागात काय परिस्थिती आहे ते दर्शकांना दाखवण्याचा प्रयत्न केला होता. सायनवरून गणेश ठाकूर रिपोर्टिंग करत होते आणि नरीमन पॉईंट वरून जितेंद्र दीक्षित.
लाइव्ह स्ट्रीम असल्याने तो व्हिडीओ डाऊनलोड करता आला नाही. म्हणून ‘मोबिझेन’ या ऍपद्वारे तेवढाच भाग रेकॉर्ड करून घेतलाय. तो पूर्ण व्हिडीओ तुम्ही ‘येथे’ पाहू शकता.

व्हिडीओ व्यवस्थित पाहिल्यानंतर आमच्या निदर्शनास काही गोष्टी आल्या.

१. जितेंद्र दीक्षित यांना अँकर तिथल्या परिस्थितीबद्दल विचारणा करत होते तेव्हा त्यांच्या मागे लाल शर्ट घातलेला ईसम चालत जाताना दिसत आहे.

Credit: Youtube

२. दीक्षित जेव्हा बोलायला सुरुवात करतात तेव्हा त्यांच्या मागे तो लाल शर्टवाला माणूस आणि पलीकडे उजव्या बाजूला छत्री घेऊन येत असलेला दुसरा माणूस दिसू लागतो.

Credit: Youtube

३. वेगवेगळ्या दिशेने हेलकावे खात ‘वाऱ्याचा वेग सुरुवातीला खूप होता, आता तो कमी झालाय’ असं दीक्षित सांगतात. राजभवन परिसरात झाडं पडल्याचंही ते सांगतात. तेवढ्यात त्यांच्या ‘लाईव्ह यु’ उपकरणाचं कव्हर उडताना कॅमेऱ्यात ओझरतं दिसतं.

Credit: Youtube

४. जितेंद्र दीक्षित ते कव्हर उचलून कॅमेरामनला देतात. तेव्हा मागे वाऱ्याने खाली पडलेली प्लास्टिकची कचरा कुंडी दिसते.

Credit: Youtube

५. दीक्षित प्रचंड हेलकावे खात माहिती देतात तेव्हा मागे दोन कर्मचारी पिवळे रेनकोट घालून आलेले दिसतात. ते पडलेली कचराकुंडी उभी करून काही काम करत असल्याचं दिसतं.

Credit: Youtube

६. शेवटी अँकर म्हणतात की “जितेंद्र हम देख पा रहे है के आपके कदम लडखडा रहे है. आपके लिये वहा खडा रेह पाना मुश्कील है. अपना खयाल रखिये आप भी तमाम एहतियात बरते.” हे बोलत असताना चौकटीत दिसत असलेले जितेंद्र दीक्षित अजूनच जास्त हेलकावे खाऊ लागतात. कॅमेरा हलू लागतो.

हे तर झालं, व्हिडीओ पाहून आम्ही नोंदवलेलं निरीक्षण. या सर्व सोशल मीडियातील टीकेच्या वादळानंतर स्वतः जितेंद्र दीक्षित यांनी आपल्या फेसबुक वॉलवर स्पष्टीकरण दिलेलं आहे.

credit: facebook

या स्पष्टीकरणात ते काय म्हणतायेत हे थोडक्यात पाहूयात:
१. अर्धवट कापलेला व्हिडीओ पाहून लोक मत बनवत आहेत आणि रिपोर्टर अभिनय करतोय असा दावा केला जात आहे.
२. सकाळी ७.३० ला ते नाश्ता करून बाहेर पडले तसे विविध भागातील रिपोर्टिंग करण्यात व्यग्र झाले.
३. त्यांना मधुमेह असल्याने त्यावेळी शुगर लेव्हल कमी झाली होती.
४. झाड किंवा खांब अंगावर पडू नये म्हणून ते मधोमध उभे होते त्यामुळे त्यांना वारा जास्त लागत होता. कामगार आडोश्याला असल्याने तिथे तेवढा वारा नव्हता.

दुसरी बाजू म्हणून अजून एक आतला व्हिडीओ व्हायरल होत आहे. यामध्ये रिपोर्टिंग ऑन-एअर जाण्याआधी ब्रेकच्या दरम्यान रेकॉर्ड केला होता असं टेक्स्ट लिहिलं आहे. यामध्ये वारा आणि पाउस जास्त दिसतोय, जितेंद्र दीक्षित हेलकावे खात आहेत. एका जागी स्थिर उभे राहण्याचा प्रयत्न करत आहेत.

या व्हिडीओच्या खाली त्यांचा आणि कॅमेरामन सोबत झालेला संवाद सबटायटल प्रमाणे लिहिलेला आहे.

जितेंद्र दीक्षित: अरे मैं उड रहा हुं, हवा तेज है ठीकसे खडा नहीं हो पा रहा हुं.

कॅमेरामन: अरे मेरे कॅमेरे का कव्हर गया

व्हिडीओ कट होऊन पुढे असं दिसतं की दीक्षित शेजारी उभे असलेल्या कारचा सहारा घेऊन उभे राहत आहेत.

कॅमेरामन: जितु भाई आगे जाओ

गाडीत बसल्या नंतरचे संवाद-

कॅमेरामन: अरे बहुत भारी था ये तुफान… है ना जीतू भाई?

जितेंद्र दीक्षित: अरे बापरे

३४ सेकंदाचा हा व्हिडीओ एकसंध नाही. जवळपास ५ ते ६ तुकडे (shots) जोडून बनवलेला हा व्हिडीओ असल्याचं आमच्या निदर्शनास आलं.

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’ने मूळ व्हिडीओ शोधून केलेल्या निरीक्षणात असं लक्षात आलं की तिथे जोरदार वारे वाहून गेले हे खरंच आहे कारण रस्त्यावर झाडाचा पाला, आडवी पडलेली कचराकुंडी दिसत आहेत.

जितेंद्र दीक्षित यांनी स्पष्टीकरणात सांगितल्याप्रमाणे त्यांचा मधुमेहाचा त्रास, सकाळपासून पोटात नसणारं अन्न आणि मधोमध उभे राहिल्याने आलेला वाऱ्याचा झोत या सर्व गोष्टी त्यांच्या हेलकाव्यांचे कारण असूही शकतात.

समोर आलेल्या दुसऱ्या व्हिडीओमध्ये जो दावा केलाय की हे फुटेज बातमी ऑन-एअर जाण्याअगोदरचे आहे ते नेमकं कुणी पसरवलं आहे? त्याचा अधिकृत सोर्स कोण? हे लक्षात येणं अवघड आहे. मुळात ५-६ तुकडे जोडून केलेला तो व्हिडीओ असल्याने त्यातून पुढे येणाऱ्या माहितीवरच वेगळी शंका उपस्थित केली जाऊ शकते.

लाल शर्ट घालून मागे चाललेला माणूस हेलकावे न खाता सरळ कसा चालला आहे? एवढ्या तीव्र वाऱ्यात उजव्या कोपऱ्यातील माणसाची छत्री सरळ कशी राहिली? वजनदार रिपोर्टर एवढे जोरजोरात हेलकावे खात असेल तर ‘लाइव्ह यु’चे कव्हर तिथल्या तिथेच पडले असते का? मागे पालिकेच्या कर्मचार्यांनी उभी केलेली फायबरची कचराकुंडी पुन्हा खाली कशी नाही पडली? असे काही प्रश्न अनुत्तरीतच राहतात.

घरात बसून ऊन वारा पाउस झेलत काम करणाऱ्यांवर ताशेरे ओढणे अर्थात सोपे आहे; परंतु निदर्शनास आलेल्या गोष्टींचं काय? प्रश्न अनुत्तरीत राहणे म्हणजेच शंकेला अजूनही वाव आहेच.

हे ही वाचा

आयुष मंत्रालयाने सांगितलेल्या होमिओपॅथीक ‘अर्सेनिकम अल्बम ३०’ गोळ्या कोरोनावरचा रामबाण उपाय आहे का?

More from समाजकारणMore posts in समाजकारण »

Be First to Comment

    Leave a Reply

    Your email address will not be published.

    × न्यूज अपडेट्स मिळवा