Press "Enter" to skip to content

औरंगाबादच्या विद्यार्थिनीची नासाच्या फेलोशिप पॅनलवर निवड झाल्याच्या बातम्या म्हणजे निव्वळ अफवा!

औरंगाबाद येथील 14 वर्षीय विद्यार्थिनीची नासाच्या फेलोशिप पॅनलवर निवड झाल्याच्या बातम्या म्हणजे निव्वळ अफवा असल्याचे एस्ट्रॉनॉमिकल सोसायटी ऑफ इंडियाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. या विद्यार्थिनीची नासाच्या एमएसआय फेलोशिप (NASA’s MSI Fellowship) व्हर्च्युअल पॅनेलवर पॅनेलिस्ट म्हणून निवड करण्यात आल्याची बातमी ANI या वृत्तसंस्थेकडून देण्यात आली होती.

Source: Astron-SOC

ANI च्या बातमीच्या आधारे अनेक राष्ट्रीय आणि प्रादेशिक माध्यमांनी यासंदर्भात बातम्या दिल्या आहेत. सोशल मीडियावर देखील यासंदर्भातील पोस्ट्स व्हायरल होताहेत.

Advertisement
Aurangabad Girl selected as NASA panelist fake news by renowned national news organizations
Source: Google News

एस्ट्रोनॉमिकल सोसायटी ऑफ इंडियाने (Astronomical Society Of India) मात्र सदर विद्यार्थिनीकडून सादर करण्यात आलेल्या डॉक्युमेंट्समध्ये अनेक विसंगती दाखवून देण्यात आल्या आहेत. शिवाय या प्रकरणात सदर विद्यार्थिनीची फसवणूक झाली असल्याचे सांगण्यात आले आहे.

एस्ट्रॉनॉमिकल सोसायटी ऑफ इंडियानुसार कुठल्याही संशोधकाचे नवीन संशोधन इतर शास्त्रज्ञांकडून स्वीकारले जाण्यासाठी ते संशोधन तज्ञ संशोधकांकडून तपासले जाण्याची आवश्यकता असते. एवढेच नाही तर ते एखाद्या नामांकित वैज्ञानिक जर्नल्समध्ये प्रकाशित होणे गरजेचे असते. असे असले तरी अशी जर्नल्स देखील आहेत, ज्यांच्याकडून लेखकांची फसवणूक केली जाते.

अशा प्रकारची जर्नल्स लेखकांकडून आर्थिक मोबदला घेऊन कुठल्याही पडताळणीशिवाय काहीही प्रकाशित करायला तयार असतात. लेखांकडून पैसे उकळणे एवढाच त्यांचा उद्देश्य असतो. अशा प्रकाशकांना ‘प्रेडेटरी पब्लिशर्स’ असं म्हंटलं जातं. मराठीत त्यांना ठोबळमानाने ‘फसवी प्रकाशने’ असं म्हणता येईल. ANI च्या ट्विटमध्ये ज्या जर्नलचा उल्लेख बघायला मिळतोय, त्या जर्नलचा समावेश फसव्या प्रकाशनांच्या यादीत असल्याचे बघायला मिळतेय. या फसव्या प्रकाशनांची संपूर्ण यादी आपण येथे बघू शकता.

ANI च्या ट्विटमध्ये सदर विद्यार्थिनीच्या संशोधनाचा विषय ‘ब्लॅक होल अँड गॉड’ (Black Hole and God) असा असल्याचे सांगण्यात आले आहे. हा विषय केवळ तत्वज्ञान किंवा धर्मशास्त्रातील चर्चेचा भाग असू शकतो. वैज्ञानिक संशोधनासाठी ठोस पुराव्यांची आवश्यकता असते. त्यामुळे बहुतेक वैज्ञानिक जर्नल्स प्रारंभिक पातळीवरच हा संशोधन विषय नाकारतील. कारण ब्लॅक होल आणि देव अशा दोन असंबंधित संकल्पनांना एकमेकांशी जोडणारा कुठलाही युक्तिवाद हा केवळ शब्दखेळ असू असेल,असेही ‘एस्ट्रॉनॉमिकल सोसायटी ऑफ इंडिया’कडून स्पष्ट करण्यात आले आहे.

सदर मुलीला कथितरित्या नासाकडून देण्यात आलेल्या प्रमाणपत्रावर नासाचे अधिकारी म्हणून “जिम ब्रिडेस्टाईन” आणि “जेम्स फ्रेडरिक” यांचे नाव बघायला मिळतेय. त्यातील “जिम ब्रिडेस्टाईन” हे नासाचे “सीईओ आणि अध्यक्ष” असल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र वस्तुस्थिती अशी की अशा प्रकारचे कुठलेही पद अस्तित्वातच नाही. शिवाय “जिम ब्रिडेस्टाईन” आणि “जेम्स फ्रेडरिक” ही दोन्ही नावे नासाचे माजी प्रशासक “जेम्स फ्रेडरिक ब्रिडेस्टाईन” (James Frederick Bridenstine) यांच्या नावावरून घेतली असण्याची शक्यता आहे.

सदर मुलीला कथितरित्या नासाकडून आलेला ईमेल देखील संशयास्पद आहे. ईमेलच्या सब्जेक्टमध्ये शुद्धलेखनाची चूक बघायला मिळतेय. सदर मुलीची नासाची पॅनेलिस्ट म्हणून निवड झाल्याची पुष्टी करणाऱ्या ईमेलच्या सब्जेक्टमध्ये “URGERT ACTION REQUIRED” असं लिहिलेलं बघायला मिळतंय. यातील अर्जंटच्या स्पेलिंगमधील चूक आपल्या सहज लक्षात येऊ शकते.

भारतीय माध्यमांमध्ये नासाच्या संदर्भाने अशा प्रकारच्या बातम्या दिल्या जाण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी देखील असे प्रकार घडलेले आहेत. खुद्द नासाकडूनच हे दावे नाकारण्यात आलेले आहेत. प्रत्येकवर्षी अशा प्रकारचे एखादेतरी प्रकरण बघायला मिळतेच. यात फक्त विद्यार्थ्यांचे नाव आणि ठिकाण बदललेले असतं. बाकी कथानक अगदी सारखंच असतं, असं देखील एस्ट्रॉनॉमिकल सोसायटी ऑफ इंडियाच्या रिपोर्टमध्ये सांगण्यात आलंय. 

‘एस्ट्रॉनॉमिकल सोसायटी ऑफ इंडिया’ने या संपूर्ण प्रकाराबद्दल ANI या वृत्तसंस्थेसंस्थेच्या एकूणच कारभारावर ताशेरे ओढले आहेत. सध्याच्या प्रकरणात सर्वात मोठी चूक आहे ती ANI या वृत्तसंस्थेची. कुठलीही बातमी प्रकाशित करण्यापूर्वी त्याविषयीच्या तथ्यांची तपासणी करणे हे पत्रकारांचे मूलभूत कर्तव्य आहे. बातमी प्रकाशित करण्यापूर्वी एखाद्या विश्वासार्ह संशोधकाशी संपर्क साधून माहितीची खातरजमा केली गेली असती, तर हे सगळं टाळता आलं असतं. मात्र असं झालं नाही, याबद्दल ‘एस्ट्रॉनॉमिकल सोसायटी’ने खेद व्यक्त केला आहे.

दरम्यान, ANI वृत्तसंस्थेच्या संपादक स्मिता प्रकाश यांनी देखील ही बातमी चुकीची असल्याची गोष्ट स्वीकारत यासंदर्भात स्पष्टीकरण दिले आहे. सदर मुलीने ‘नासा’ची आणि आमची देखील फसवणूक केली असल्याचे स्मिता प्रकाश यांनी म्हंटले आहे. नवीन माहिती समोर आल्याने बातमी मागे घेण्यात येत असल्याचे देखील त्यांनी म्हंटले आहे.

अर्काइव्ह

हेही वाचा- इंधन दरवाढीचे खापर कॉंग्रेस काळातील ‘ऑईल बॉंड’वर फोडून भाजप नेत्यांकडून जनतेची दिशाभूल!

(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती आमच्या (9172011480) या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.

आपण फेसबुकट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता) 

More from फॅक्ट फाईल्सMore posts in फॅक्ट फाईल्स »
More from समाजकारणMore posts in समाजकारण »

Be First to Comment

    Leave a Reply

    Your email address will not be published.

    × न्यूज अपडेट्स मिळवा