Press "Enter" to skip to content

भूतानने भारताचं पाणी अडवलं सांगणाऱ्या बातम्या चुकीच्या!

पाकिस्तान, चीन, नेपाळ आणि आता भूतान सगळे जण भारताला ‘लाल आंखे’ दाखवत आहेत. असं म्हणत अनेक माध्यमांनी भूतानने आसामचं पाणी अडवल्याच्या बातम्या दिल्या.

 ‘चीन, नेपाळ पाठोपाठ आता भूतानकडूनही भारताची अडवणूक; शेतकऱ्यांना बसणार मोठा फटका’ अशी बातमी लोकमत पेपरने दिली होती.

Lokmatt news about bhutan stopped india's water
Source: Lokmat

‘टाईम्स ऑफ इंडिया’ने सुद्धा ही बातमी दिली होती.

Times of india saying Bhutan stopped India's water
Source: Times of India

प्रमुख माध्यमांतून जर अशा बातम्या येत असतील तर सोशल मिडिया शांत बसेल तरच नवल. काहींनी ग्राफिक्स बनवून व्हायरल केले तर काहींनी बातम्या शेअर केल्या.

Viral Graphic claiming Bhutan stopped water

फेसबुक युजर क्षिती देशपांडे यांनी ‘साम’ वाहिनीच्या बातमीचा फोटो एका ग्रुपवर शेअर केला आहे.

https://www.facebook.com/photo.php?fbid=297498721635870&set=gm.921890628326588&type=3&theater

पडताळणी:

भारतासमोर भूतान अतिशय छोटा देश, त्यात गेली कित्येक वर्षे चीनच्या अरेरावीमुळे पिचलेला. अशा देशाने भारतासारख्या मोठ्या देशाशी शत्रुत्व घेणं म्हणजे आत्मघात असाच साधारण अंदाज कुणीही लावेल. याच अनुषंगाने ‘चेकपोस्ट मराठी’ने सत्यता पडताळून पाहण्यासाठी काही प्रयत्न केले.

नेमकी परिस्थिती समजून घेत असताना आम्हाला भूतानच्या परराष्ट्र धोरण खात्याने जारी केलेले प्रेस रिलीज मिळाले. यात असे सांगितले आहे की,

‘२४ जून २०२० पासून भारतातील अनेक माध्यमांनी भूतान देशाने आसामचे पाणी अडवल्याच्या बातम्या दिल्याचं निदर्शनास आलं.

हे आरोप त्रासदायक असल्यामुळे परराष्ट्र धोरण मंत्रालय याविषयी स्पष्टीकरण देऊ इच्छिते की माध्यमांनी दिलेल्या बातम्या पूर्णतः निराधार आहेत. पाणी अडवून ठेवण्याचं कुठलंही कारण नाही. भूतान आणि आसामच्या मैत्रीपूर्ण संबंधांमध्ये गैरसमज निर्माण करण्याचा हा खोडसाळपणा दिसतोय.

बक्सा आणि उडालगुरी जिल्ह्यांना भूतानमधून कित्येक दशकांपासून पाणी दिलं जात आहे. आजही कोव्हीड१९ साथरोग येऊ पर्यंत हे चालूच होतं.’

पत्रकात स्पष्ट करण्यात आलंय की आजवर आसामचे शेतकरी स्वतः येऊन या प्रवाहात काही बिघाड झाल्यास दुरुस्ती करत होते परंतु आता कोरोनामुळे भारतातील लॉकडाऊन आणि भूतानच्या सिमाबंदीमुळे त्यांना इकडे येणे शक्य झाले नाही. म्हणूनच भुतानच्या ‘समदृप जोंगखार’ जिल्ह्यातील स्थानिकांनी आणि जिल्हा अधिकाऱ्यांनी मिळून विस्कळीत झालेला प्रवाह दुरुस्त करण्याचे हाती घेतले आहे.

मुसळधार पाउस आणि अचानक वाढणाऱ्या पाणी पातळीमुळे या कामात अनेक अडचणी येत आहेत तरीही भूतानी अधिकारी मोठमोठ्या मशीनच्या सहाय्याने ब्लॉकेज दूर करत आहेत.’

भूतानच्या परराष्ट्र खात्याने जारी केलेल्या पत्रकातून जी माहिती समोर तिला आसामच्या मुख्य सचिवांनी केलेल्या ट्विटमुळे अजूनच बळकटी मिळालीय.

मुख्य सचिव कुमार संजय कृष्णा यांनी असं म्हंटलंय ‘माध्यमांनी दिलेल्या बातम्या चुकीच्या आहेत. पाण्याचा प्रवाह अडून राहण्यामागे नैसर्गिक कारणे आहेत. उलट भूतान या समस्येला सोडविण्यासाठी मदत करतोय.’

बिंगच्या रिव्हर्स इमेज सर्च मध्ये आम्हाला हे लक्षात आलं की भूतान देशाने पाणी अडवलं सांगत व्हायरल होणाऱ्या ग्राफिक्स सोबत जोडलेला फोटो आताचा नसून २०१५चा आहे. भूतान मध्ये २०१५ मध्ये सर्वात जास्त लांबीच्या पाटाचे उद्घाटन झाले होते. त्यावेळचा हा फोटो आहे. याचा रिपोर्ट भूतानच्या शेती आणि वन मंत्रालयाच्या अधिकृत वेबसाईटवर आजही उपलब्ध आहे.

Screenshot of report on bhutan's ministry of agriculture and forest website
Source: Bhutan’s Ministry of Agriculture and Forest website

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये असे समजले की भूतानने भारताचे म्हणजेच आसाम मधील शेतकऱ्यांचे पाणी अडवलेले नाही. नैसर्गिक कारणामुळे त्याच्या प्रवाहात अडचणी येत असतात. एरवी असं झाल्यास स्थानिक शेतकरी स्वतः जाऊन ते दुरुस्त करत. परंतु सध्या कोरोनामुळे लागू लॉकडाऊन आणि सीमाबंदीमुळे शेतकरी जाऊ शकले नाहीत. उलट भूतानचे अधिकारी आणि स्थानिक लोक मिळून या खंडित झालेल्या पाण्याच्या प्रवाहाला मोकळं करण्यासाठी कसोशीने प्रयत्न करत आहेत.

माध्यमांनी आणि सोशल मिडीयाने ‘भूतान ने भारताचं पाणी अडवलं’ सांगत छेडलेला राग निराधार आहे, खोट्या बातम्यांवर आधारित आहे.

हेही वाचा: सुप्रीम कोर्टात सरकारची बाजू मांडताना सॉलिसीटर जनरल तुषार मेहता यांनी दिला चक्क फेक गोष्टीचा दाखला

More from राजकारणMore posts in राजकारण »

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published.

× न्यूज अपडेट्स मिळवा