करोडो डीसलाईक्सचा बळी ठरलेल्या ‘सडक २’ चित्रपटाच्या ट्रेलरप्रमाणेच ‘शाहरुख खान’च्या ‘पठाण’ या चित्रपटाचा ट्रेलर (pathan trailer) डिसलाईक करण्याचे आवाहन सोशल मीडियावर केले जातेय.
सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणापासून बॉलीवूड आणि राजकारणात रोज काही ना काही नव्या हालचाली होताना दिसत आहेत. त्यात सुशांत विरोधक म्हणून महेश भट, आलिया भट यांच्या नावे खडे फोडत ‘सडक २’च्या ट्रेलरवर ठरवून डीसलाईकचा पाऊस पाडला. हीच पद्धत शाहरुख खानवर अवलंबण्यासाठी ‘पठाण’ चित्रपटाच्या ट्रेलरला सुद्धा डीसलाईक करा असे सोशल मीडियातून आवाहन केले जात आहे.
सुप्रीम कोर्टात वकिली करणाऱ्या प्रशांत पटेल उमराव यांनी “क्या आपने खान गैंग की फ़िल्म Pathan का ट्रेलर dislike व रिपोर्ट किया?” असे ट्विट केलेय. या ट्विटला जवळपास ७ हजार लोकांनी रीट्विट केलेय.
अनेकांनी तर मी स्वतः डीसलाईक केलंय तुम्ही करा सांगण्यासाठी पुराव्याखातर स्क्रीनशॉट जोडत आवाहन केलंय. असेच एक ट्विटर युजर ‘पंडित बिल गेट्स (अयोध्या वाले)’ यांचे ट्विट.
पडताळणी:
मागील काही दिवसांमध्ये वॉर चित्रपटाचे दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद यशराज फिल्म्स सोबत पठाण नावाचा चित्रपट बनवणार असल्याची चर्चा बॉलिवूड मध्ये आहे.
‘झीरो’ या आपल्या शेवटच्या चित्रपटात दिसलेल्या शाहरुख खानला या चित्रपटात मुख्य भूमिकेसाठी निवडण्यात आलंय. तर अभिनेत्री म्हणून दीपिका पदुकोणची निवड देखील करण्यात आलिये. तसेच हा चित्रपट २०२१ मध्ये पडद्यावर येवू शकतो. याविषयी बातम्या सुद्धा प्रसिद्ध झाल्या होत्या.
परंतु या सर्व बातम्या सूत्रांच्या हवाल्याने दिल्या आहेत. निर्माते, दिग्दर्शक किंवा कलाकार कुणाकडूनही या चित्रपटाविषयी अजून अधिकृत घोषणा झाल्याचे आढळले नाही.
सात-आठ ‘ऑफिशियल’ ट्रेलर्स:
ज्या चित्रपटाची घोषणाच अजून झाली नाही, चित्रपटाचे शूट चालू नाही त्याचा ट्रेलर (pathan trailer) कसा येऊ शकतो? या कुतुहलापोटी ‘चेकपोस्ट मराठी’ने पडताळणीस सुरुवात केली.
युट्युबवर पठाण चित्रपटाचा ट्रेलर शोधण्यासाठी सर्च केले तेव्हा सात आठ लिंक्स समोर आल्या. गंमत म्हणजे प्रत्येकाने ‘ऑफिशियल ट्रेलर’ असे लिहिले आहे. बातमी करतेवेळी सर्वात जास्त डीसलाईक मिळालेले दोन ट्रेलर सापडले. एका ट्रेलरला एक लाख तर दुसऱ्यास तीन लाख एवढे डीसलाईक्स होते.
दोन्ही ट्रेलरमध्ये रईस:
दोन्ही ट्रेलर आम्ही पाहिले आणि लक्षात आले की हे अधिकृत प्रोडक्शन हाऊसच्या युट्युब चॅनलवरून पोस्ट केलेले नाहीत. ना यातील दृश्ये पठाण चित्रपटाची आहेत. यात सैफ अली खानच्या ‘लाल कप्तान’ आणि नेटफ्लिक्सवर हिट झालेल्या ‘बुलबुल’ या चित्रपटामधील दृश्ये आहेत.
एवढेच नव्हे तर शाहरुख खानचा पठाण चित्रपटातील लुक कसा असेल हे दाखवण्यासाठी दोन्ही ट्रेलर मेकर्सने ‘रईस’ चित्रपटातील फुटेज वापरले आहे.
शाहरुख खानचे स्पेलिंग चुकीचे:
हे ट्रेलर्स (pathan trailer) ऑफिशियल नसण्याचा आणखी एक पुरावा म्हणजे यात मुख्य कलाकाराचे नाव म्हणजेच शाहरुखचे नाव लिहिताना स्पेलिंगमध्ये चूक केली आहे. ‘Shah Rukh Khan’ असे लिहिण्या ऐवजी ‘Sharukh Khan’ असे सलग लिहून त्यातला ‘H’ गायब केलेला आहे.
अजब क्रेडीट लिस्ट:
सर्वात जास्त डीसलाईक मिळालेल्या ट्रेलरच्या सर्वात शेवटी पोस्टर येते. त्यावर खाली क्रेडीट लिस्ट दिलीय. पहा काय काय नावे आहेत. ऍक्शन डायरेक्टर- योगी आदित्यनाथ, डायलॉग- ब्रिजवा, असिस्टंट डायरेक्टर- गौरव, वेशभूषा राहुल आणि पोस्टर डिझाईन पवन स्वामी.
यात कडी म्हणजे, सर्वात शेवटी वाक्य आहे ‘वैसे ये कोई मुव्ही आनेही नहीं वाली है’
वस्तुस्थिती:
‘चेकपोस्ट मराठी‘च्या पडताळणीमध्ये हे समोर आले की युट्यूबवर टाकण्यात आलेले पठाण चित्रपटाचे ट्रेलर ‘ऑफिशियल’ नाहीत. ते शाहरुख खानच्या फॅन्सने बनवलेले असून, मूळ चित्रपटाविषयी अद्याप अधिकृत घोषणा देखील करण्यात आलेली नाही.
नेपोटिझमला, सुशांतला त्रास देणाऱ्यांना विरोध करायचा म्हणून पठाण चित्रपटास नापसंती व्यक्त करण्याचे आवाहन नेटिझन्स करत आहेत; परंतु ज्यांना लाखोने डीसलाईक केले जात आहे ते ट्रेलर्स खरे नाहीत.
हेही वाचा: सूरज पांचोली बरोबर दिसणारी ‘ती’ तरुणी सुशांतची माजी मॅनेजर दिशा सलिअन नाही!
Be First to Comment