नेताजी सुभाषचंद्र बोस (Subhas Chandra Bose) यांची प्रतिमा असणारी १० रुपयांची नोट पंडित जवाहरलाल नेहरू (Jawaharlal Nehru) यांनी बंद केल्याचे दावे सोशल मीडियात व्हायरल होतायेत. नेताजींचे बलिदान भारतीयांपर्यंत पोहचू नये असा त्यांचा हेतू होता असेही यात लिहिले आहे.
फेसबुक, ट्विटर आणि व्हॉट्सऍपवर हे दावे व्हायरल होतायेत. ‘चेकपोस्ट मराठी’चे वाचक बळीराम पाटील यांनी सदर दावे निदर्शनास आणून देत पडताळणीची विनंती केली.
पडताळणी:
‘चेकपोस्ट मराठी’ने व्हायरल दाव्याच्या अनुषंगाने काही कीवर्डसच्या आधारे गुगल सर्च केले असता महत्वाची माहिती समोर आली.
नेताजी सुभाषचंद्र बोस यांची प्रतिमा असणारी ही नोट ‘आझाद हिंद बँक’ची आहे. कनईलाल बसू (Kanailal Basu) यांच्या ‘नेताजी:रीडिस्कव्हर्ड‘ या पुस्तकात पृष्ठ क्रमांक 339 वर नेताजींना आर्थिक बाबींसाठी जपानवर निर्भर राहणे पसंत नसल्याने स्वतः एका स्वतंत्र बँकेची स्थापना केली असा उल्लेख आहे. या बँकेचे नाव ‘नॅशनल बँक ऑफ आझाद हिंद’ असे होते. याच बँकेमार्फत युद्धकाळात आर्थिक देवघेव करण्यासाठी नोटांची छपाई केली गेली होती. या बँकेची स्थापना रंगून म्हणजेच आताचे म्यानमार मधील यंगून येथे केली गेली होती.
सीन टर्नेल यांच्या ‘Fiery Dragons: Banks, Moneylenders and Microfinance in Burma’ या पुस्तकातही ‘आझाद हिंद बँक’चा (Azad Hind Bank) उल्लेख आहे. या बँकेअंतर्गत छापण्यात आलेल्या काही नोटांचे दुर्मिळ फोटोज इंटरनेटवर उपलब्ध आहेत.
नेताजींच्या ११३ व्या जयंतीनिमित्त त्यांच्या अनुयायांनी ‘आझाद हिंद बँके’द्वारे छापण्यात आलेली तब्बल १ लाख रुपयांच्या नोटेची प्रतिमा सार्वजनिक केली गेली होती. याविषयी ‘द हिंदू’ने बातमीसुद्धा केली होती.
‘आझाद हिंद सेने’च्या स्थापनेस ७५ वर्षे पूर्ण झाल्याचे औचित्य साधून नेताजींचे जन्मस्थळ असलेल्या कटक येथील संग्रहालयाचे नूतनीकरण करण्यात आले. याविषयी ‘द टेलिग्राफ‘ने बातमी प्रसारित केली होती. यात असाही उल्ल्केह आहे की ‘आझाद हिंद बँक’ने टंकित केलेली नाणी आणि छापलेल्या नोटा या संग्रहालयात उपलब्ध आहेत.
१९४३ साली स्थापन झालेल्या या ‘आझाद हिंद बँक’च्या नोटांना बर्मा, क्रोसिया, जर्मनी, नानकिंग (चीन), मंचुको, इटली, थायलंड, फिलिपिन्स व आयर्लंड या देशांनी मान्यता दिली होती. याविषयी ‘आउटलुक‘ने लेख प्रसिद्ध केला आहे.
राहिला प्रश्न नेहरूंनी ही किंवा या इतर नोटांवर बंदी आणण्याचा तर, नेताजींनी स्वातंत्र्यपूर्व काळात चालू केलेल्या बँकेला ब्रिटीश सरकारने किंवा स्वातंत्र्यानंतर भारत सरकारने आपल्या प्रणालीत समाविष्ट करून केले नव्हते, त्यामुळे या नोटांवर बंदी आणण्या न आणण्याचा अधिकार पंडित जवाहरलाल नेहरूंकडे राहतच नाही.
वस्तुस्थिती:
‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीत हे स्पष्ट झाले की नेताजींचे बलिदान भारतीयांपर्यंत पोहचू नये या हेतूने त्यांची प्रतिमा असणारी नोट नेहरूंनी बंद केल्याचे दावे फेक आहेत. त्या नोटा भारत सरकारच्या अखत्यारीत कधीच नव्हत्या, ती ‘आझाद हिंद बँक’ची मालमत्ता आहे.
हेही वाचा: भारताचे मूळ राष्ट्रगीत रवींद्रनाथ टागोर यांचे नसून नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे आहे? वाचा सत्य!
(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती आमच्या (9172011480) या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.
आपण फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता)
Be First to Comment