Press "Enter" to skip to content

नेब्युलाइजर ऑक्सिजनचा पर्याय असू शकत नाही, पर्याय सुचवणाऱ्या डॉक्टरलाच मागावी लागली माफी!

देशात कोरोना व्हायरसमुळे हाहाकार माजलेला असतानाच ऑक्सिजनची कमतरता हा कोरोनावरील उपचारांमध्ये मोठाच अडथळा ठरतोय. देशातल्या जवळपास अर्ध्या-अधिक राज्यांमध्ये सध्या ऑक्सिजनची प्रचंड मोठ्या प्रमाणात कमतरता आहे. ऑक्सिजन अभावी अनेकांना जीव गमवावे लागताहेत. अशात सोशल मीडियावर एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. देशभरातील ऑक्सिजन टंचाईच्या पार्श्वभूमीवर व्हिडिओत दिसणारी व्यक्ती ऑक्सिजनला पर्याय म्हणून नेब्युलाइजर मशीन (nebulizer machine for oxygen) वापरण्याचा सल्ला देतेय.

Advertisement

व्हिडिओत दिसणाऱ्या व्यक्तीचं नाव डॉ. अलोक असून ही व्यक्ती फरीदाबादच्या सर्वोदय हॉस्पिटलमध्ये सेवेत असल्याचं सांगण्यात येतंय. वातावरणात मानवी शरीराला आवश्यक असणारा पुरेसा ऑक्सिजन उपलब्ध असून तुम्हाला फक्त कुठलीही औषधी न टाकता नेब्युलाइजर मशीन वापरायचाय. बाकी काहीही करण्याची आवश्यकता नाही, असा सल्ला या व्हिडिओमधून देण्यात आलाय. ऑक्सिजन सिलेंडरला पर्याय म्हणून नेब्युलाइजर मशीन (nebulizer machine for oxygen) वापरण्याचा सल्ला देणाऱ्या या डॉक्टरचं सोशल मीडियावर कौतुक देखील व्हायला लागलं.

अर्काइव्ह पोस्ट

व्हाट्सअपवर देखील हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. ऑक्सिजनच्या कमतरतेवरचा रामबाण उपाय म्हणून लोक हा व्हिडीओ शेअर करताहेत. डॉ. अलोकने सुचवलेली ट्रिक वापरून हवेतील ऑक्सिजन मिळविण्याचं आवाहन केलं जातंय.

डॉ. अलोक यांचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल व्हायला लागल्यानंतर सर्वप्रथम तर सर्वोदय हेल्थ केअरने एक ट्विट करून यासंदर्भात खुलासा केला. डॉ. आलोक यांच्या दाव्यांना कुठलाही वैज्ञानिक आधार नसून या दाव्यांचं आम्ही खंडन करत आहोत. डॉक्टरच्या सल्ल्याशिवाय घरगुती उपाय करणे धोक्याचे ठरू शकते. त्यामुळे कोणत्याही औषधोपचार पद्धतीचा अवलंब करण्यापूर्वी नेहमीच डॉक्टरचा सल्ला घ्या, असं आवाहन देखील सर्वोदय हेल्थकेअरकडून करण्यात आलंय.

अर्काइव्ह पोस्ट

सर्वोदय हॉस्पिटलकडून हे निवेदन देण्यात आल्यानंतर डॉ. आलोक यांच्याकडून या प्रकरणावर दुसरा व्हिडीओ रिलीज करण्यात आला. त्यात डॉ. आलोक सांगताहेत,

“मला काहीतरी वेगळं सांगायचं होतं आणि कदाचित मी चुकीचे शब्द वापरले. त्यामुळे लोकांमध्ये चुकीचा मेसेज जात आहे. ऑक्सिजनचा पर्याय नेब्युलाइजर आहे, असं मला म्हणायचं नव्हतं. नेब्युलाइजर कधीच ऑक्सिजनचा पर्याय असू शकत नाही.”

अर्काइव्ह पोस्ट

  • नेब्युलाइजर मशीन काय असते?

तुम्ही कधी दवाखाण्यातील वाफ घेण्याचं मशीन पाहिलंय? साधारण तसच काहीसं परंतु पाण्याच्या वाफेशिवाय काम करणारं हे मशीन. अस्थमा/दमा असलेल्या व्यक्तीला जे औषध नाकावाटे द्यायचे आहे ते या नेब्युलाइजर मशिनच्या मदतीने धुक्याच्या स्वरुपात करून दिले जाते. श्वसनाच्या इतर आजारांसाठीसुद्धा याचा वापर होतो. काहीवेळा कफामुळे ब्लॉक झालेले नाक मोकळे करण्यासाठीही हे वापरतात. लहान मुलांना वाफेच्या गरमीचा त्रास होऊ शकतो म्हणून वेपरायझर ऐवजी अनकेदा नेब्युलाईजर वापरले जाते.

अगदी टेबलावर ठेवता येईल एवढ्या मोठ्या ते कुठेही घेऊन फिरता येईल अशा स्वरुपातही हे मशीन्स असतात. यात केवळ लिक्विड मेडिसिनचे धुक्यात रुपांतर होते जे आपण नाकावाटे श्वसन नलिकेतून फुप्पुसापर्यंत घेऊ शकतो. यात ऑक्सिजन तयार होत नाही.

White Portable Nebulizer

वस्तुस्थिती:

नेब्युलाइजर मशीन हा ऑक्सिजनचा पर्याय असल्याचं सुचविणाऱ्या डॉक्टरनेच यासंदर्भात स्पष्टीकरण देऊन आपल्या बोलण्याचा चुकीचा अर्थ लावला गेल्याचं म्हटलंय. शिवाय नेब्युलाइजर हा कधीच ऑक्सिजनचा पर्याय असू शकत नाही, असं देखील सांगितलंय. त्यामुळे अशा प्रकारच्या कुठल्याही अफवांवर विश्वास ठेऊ नये. कुठलेही वैद्यकीय उपचार घेण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घरगुती वैद्यकीय उपचार न अवलंबवणेच आपल्या आणि आपल्या कुटुंबियांच्या फायद्याचे.

हे ही वाचा- ऑक्सिजन सिलिंडर घेऊन मोटार सायकलवरून हॉस्पिटलकडे चाललेल्या महिलेचा फोटो भारतातला नाही!

More from कोरोनाMore posts in कोरोना »

Be First to Comment

    Leave a Reply

    Your email address will not be published.

    × न्यूज अपडेट्स मिळवा