पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) हे संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेचे (UNSC) अध्यक्षपद भूषविणार आहेत. सुरक्षा परिषदेत 9 ऑगस्ट रोजी “सागरी सुरक्षा” ह्या विषयावर आंतरराष्ट्रीय चर्चसत्राचे आयोजन करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी या चर्चासत्राचे अध्यक्ष असणार आहेत.
संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर दावा केला जातोय की भारताच्या स्वातंत्र्यानंतरच्या कालावधीत प्रथमच भारताला सुरक्षा परिषदेच्या बैठकीचे अध्यक्षस्थान भूषविण्याचा मान मिळत आहे. स्वातंत्र्यानंतरच्या 75 वर्षांच्या काळात प्रथमच भारताकडे सुरक्षा परिषदेचे अध्यक्षपद आले आहे.
महाराष्ट्र भाजपचे उपाध्यक्ष माधव भंडारी यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर यासंदर्भात ट्विट केलंय. ट्विटमध्ये भंडारी म्हणतात,
“संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या अध्यक्ष पदी भारताचे पंतप्रधान मा.श्री. @narendramodi जी होणार विराजमान…७५ वर्षात प्रथमच भारताकडे संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे अध्यक्षपद…पंतप्रधान मा.श्री. नरेंद्रजी मोदी आणि सर्व देशवासीयांचे मनःपूर्वक अभिनंदन !
भंडारी यांच्यासह भाजप नेते अमल महाडिक, जिंतूरच्या आमदार मेघना साकोरे बोर्डीकर आणि शिरीष बोराळकर यांनी देखील अशाच प्रकारचा दावा केलाय.
पडताळणी:
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (Narendra Modi) रूपात स्वातंत्र्यानंतरच्या 75 वर्षात प्रथमच भारताकडे संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे (UNSC) अध्यक्षपद आल्याचा दावा साफ खोटा आहे.
भारताने यापूर्वी अनेकवेळा संयुक्त राष्ट्र संघाच्या सुरक्षा परिषदेचे अध्यक्षपद भूषविलेले आहे.
- ‘एबीपी माझा’च्या रिपोर्टनुसार यापूर्वी 1950 आणि 51 मध्ये नरसिंग बेनेगल, 1972- समर सेन, 1977 – रिखी जयपाल, 1985 – नटराजन क्रिष्णन, 1991 – चिन्मया रजनीनाथ घारेखान, 2011 आणि 12 मध्ये हरदीप सिंग पुरी आणि 2021 – टी.एस. तिरुमुर्ती यांनी संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेचे अध्यक्षपद भूषविलेले आहे.
- नरेंद्र मोदी हे संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेचे अध्यक्षपद भूषविणारे पहिले भारतीय पंतप्रधान ठरणार आहेत एवढं मात्र खरं. यापूर्वी भारताकडून प्रामुख्याने अधिकारी किंवा राजदूतांनी या बैठकीचे अध्यक्षपद भूषविलेले आहे. मोदी हे या बैठकीचे अध्यक्षपद भूषविणारे पहिलेच पंतप्रधान ठरणार आहेत.
कसे मिळाले भारताला सुरक्षा परिषदेच्या बैठकीचे अध्यक्षपद?
- अमेरिका, चीन, ब्रिटन, रशिया आणि फ्रान्स हे संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेचे 5 स्थायी सदस्य आहेत. भारत सध्या दोन वर्षांसाठी सुरक्षा परिषदेचा अस्थायी सदस्य आहे.
- इंग्रजीच्या वर्णक्रमानुसार संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे अध्यक्षपद दर महिन्याला बदलते. त्यामुळे फ्रान्सनंतर आता भारताला परिषदेचे अध्यक्षपद मिळाले आहे. भारत ऑगस्ट महिन्यासाठी सुरक्षा परिषदेचा अध्यक्ष असणार आहे.
- 1 जानेवारी 2021 पासून भारताला सुरक्षा परिषदेचे अस्थायी सदस्यत्व मिळाले होते. भारताचे हे सदस्यत्व 31 डिसेंबर 2021 रोजी संपेल. या संपूर्ण कालावधीत भारताला संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेचे अध्यक्षपद भूषविण्याची संधी दोनदा मिळाली आहे.
वस्तुस्थिती:
‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की 75 वर्षात प्रथमच भारताकडे संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे अध्यक्षपद आल्याचा दावा साफ खोटा आहे. भारताने यापूर्वी अनेकवेळा संयुक्त राष्ट्र संघाच्या सुरक्षा परिषदेचे अध्यक्षपद भूषविलेले आहे, मात्र ते प्रामुख्याने भारताच्या संयुक्त राष्ट्रसंघातील राजदूतांनी भूषविलेले आहे. नरेंद्र मोदी हे सुरक्षा परिषदेच्या बैठकीचे अध्यक्षपद भूषविणारे पहिले भारतीय पंतप्रधान ठरणार आहेत.
हेही वाचा- पंतप्रधान मोदींची १५३ देशांच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे का?
(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती आमच्या (9172011480) या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.
आपण फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता)
Be First to Comment