Press "Enter" to skip to content

मासिक पाळी: समज, गैरसमज आणि तथ्यं!

दरवर्षी 28 मे हा दिवस ‘वर्ल्ड मेन्स्टुअल हायजिन डे’ (Menstrual Hygiene Day) म्हणून साजरा केला जातो. दरम्यानच्या काळात मासिक पाळीबद्दलची वैद्यकीय तथ्यं, स्वच्छता, आरोग्यासंबंधीच्या मुद्द्यांवर विविध माध्यमांद्वारे चर्चा केली जाते.

दोन आठवड्यापुर्वी मुंबईजवळच्या उल्हासनगरमध्ये एका तरुणाने त्याच्या बारा वर्षीय बहिणीचा पाळीबद्दलच्या अज्ञानातून, गैरसमजुतीतून इतका छळ केला की त्यात तिचा मृत्यू झाला. या घटनेतून मासिक पाळीविषयी आपल्याकडे किती अज्ञान, गैरसमजुती हे परत एकदा अधोरेखित झाले. त्यामुळेच मासिक पाळीबद्दलच्या काही प्रचलित गैरसमजुती आणि वैद्यकीय तथ्यं आपण या लेखातून जाणून घेणार आहोत. त्याआधी उल्हासनगरची घटना थोडक्यात समजून घेणं महत्वाचं आहे. 

Advertisement

उल्हासनगरमध्ये नेमकं काय घडलं?

आपल्या 12 वर्ष वयाच्या बहिणीला पाळी आली, हेच उल्हासनगरमधील घटनेतील पीडितेच्या भावाला खोटं वाटलं. इतक्या लहान वयात पाळी आली. शिवाय तिला सलग रक्तस्राव झाला नाही. थोडंसंच स्पॉटिंग म्हणजे रक्ताचे काहीच थेंब बाहेर पडले.

पाळी म्हंटलं की सलग होणारा रक्तस्राव हेच सगळ्यांच्या डोक्यात असल्यामुळे, कधी कधी पाळीच्या पहिल्या दिवशी अनेकींना असं स्पॉटिंग होतं, सलग रक्तस्राव होत नाही, हे वैद्यकीय तथ्य माहीत नसतं. त्यातूनच या तरुणाच्या मनात वेगळीच ‘शंका’ आली.

आपल्या बहिणीचं अफेअर होतं. तिनं त्या मुलासोबत सेक्स केला. याचदरम्यान योनीपटल (हायमन) फाटल्यानं रक्तस्त्राव झाला अशा समजातून संतापून त्यानं तिला मारझोड केली. तीन दिवस उपाशी ठेवलं. त्यात तिचा मृत्यू झाला. सदर घटनेत तो मुलगा दोन गैरसमजुतींना बळी पडला आणि एका बारा वर्षाच्या मुलीचा जीव गेला.

पहिला गैरसमज- बारा वर्षाच्या मुलीला पाळी कशी येईल, आणि सलग रक्तस्राव झाला नाही म्हणजे ती पाळीच नाही. 

दुसरा गैरसमज- केवळ पहिल्या सेक्सनंच योनीपटल (योनीवरचा एक नाजूक पडदा/ हायमन) फाटतो. 

या गैरसमजुतींबद्दल तज्ञ काय म्हणतात?

कल्याणी पवार ‘अनइनहिबिटेड’ या संस्थेअंतर्गत पालघर जिल्ह्यात मासिक पाळी संदर्भात जनजागृतीचं काम करतात. त्यांना कामादरम्यान आलेल्या अनुभवांच्या आधारे आपली निरीक्षणं नोंदवताना त्या सांगतात की अलीकडे मुलींचं मासिक पाळी सुरु होण्याचं वय कमी झालं आहे. बाराच काय पण अगदी नऊ-दहा वर्षाच्या मुलींनाही पाळी येते आणि आता ही गोष्ट सर्वसामान्य आहे. 

तसंच वयात आलेल्या मुलींचं हायमन (Hymen) अनेकदा पहिल्या सेक्सआधीच फाटलेलं असतं. त्याची कारणं वेगवेगळी असू शकतात. खेळणं, सायकल चालवणं, काही कारणानं योनीजवळ दुखापत होणं अशा अनेक कारणांनी हा पडदा फाटतो. त्यामुळे अनेकींना पहिल्यांदा सेक्स करतानाही रक्तस्राव होतही नाही, असं अनेक वैद्यकीय तज्ञांनी वेळोवेळी सांगितलेलं आहे.

मासिक पाळीबद्दलच्या अशा अनेक गैरसमजुतींमुळे स्त्रियांच्या आरोग्याचं खूप नुकसान होतं. त्यांना भेदभावाची वागणूक दिली जाते. पाळी न येणाऱ्या स्त्रियांना कमी लेखलं जातं. 

पाळीबद्दलचे काही प्रचलित गैरसमज 

1. पाळी आल्यावर लोणचं, पापड, कुरडया अशा वाळवणाच्या, साठवणाच्या पदार्थांना हात लावू नये, त्यामुळे ते पदार्थ खराब होतात. 

तथ्य- वाळवणाच्या पदार्थांना कुठल्याही व्यक्तीचे ओले हात लागले, त्यात ओल पसरली किंवा त्यात पुरेसे प्रिझर्वेटिव्ज उदा., मीठ, साखर नसले, तरच ते खराब होण्याचा धोका असतो. मासिक पाळीचा त्याच्याशी काहीही संबंध नाही.

आपण बाहेरुन विकत आणलेले असे पदार्थ नेमके कुणी आणि कधी बनवलेत, पाळी आलेल्या स्त्रीचा त्याला स्पर्श झालेला आहे किंवा नाही, हे तपासणं आपल्याला शक्यच नसतं. तरीही आपण ते पदार्थ विकत घेतो, खातो. ते उत्तम राहतात- कारण त्यांच्या साठवणुकीची योग्य अशी वैज्ञानिक पद्धत.

खरं तर लोणची, पापड बनवणाऱ्या कारखान्यांत काम करणाऱ्या निम्न आर्थिक वर्गातल्या स्त्रियांना पाळीचे पाच दिवस घरी बसून त्यांचा रोजगार गमावणं परवडणारं नसतं. त्यामुळे  त्या पाळीच्या काळातही काम करतात. त्यांनी हाताळलेले आणि उत्तम टिकणारे असे अनेक पदार्थ आपण विकत आणून वापरतो. 

2. पाळी आल्यावर केस धुऊ नये. चौथ्या-पाचव्या दिवशीच केस धुवावेत. पाळी लांबली तर केस धुतल्याने पाळी येते.

तथ्य- स्त्रीरोगतज्ञ डॉ. ऐश्वर्या रेवडकर सांगतात, केस धुण्याचा आणि पाळी येण्या- न येण्याचा काहीही संबंध नाही. कधी कधी एखादीचं पाळीचं सायकल (Menstrual Cycle) लांबलेलं असतं आणि नेमकं पाळी येण्याचा दिवस आणि केस धुण्याचा दिवस एकच, असा योगायोग घडतो. लोकांचा गैरसमज मात्र बळावतो की केस धुतल्यानं पाळी आली.

पाळीच्या काळात केस धुवू नयेत, हाही एक मोठा गैरसमज आहे. त्यामागं काहीही शास्त्रीय कारण नाही. याऊलट दर दोन-तीन दिवसांनी केस धुतले नाहीत तर ते अस्वच्छ राहतात. 

3. सात-आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस पाळी सुरु राहिली तर कुणी तरी त्या स्त्रीवर काळी जादू केलेली असते.  

तथ्य- डॉ. रेवडकर सांगतात, मी छत्तीसगड, बस्तर या भागात स्त्रीरोगतज्ञ म्हणून काम करत असताना तिथल्या आदिवासीबहुल भागात अशी अंधश्रद्धा खूप प्रचलित होती आणि अजूनही आहे. आठवड्याभरापेक्षाही जास्त काळ पाळीचा रक्तस्राव सुरु राहिला तर लोक असं समजतात की ती स्त्री ज्या सांस्कृतिक कार्यक्रमात गेली होती, तिथं कुणी तरी तिच्यावर काळी जादू केल्यानंच तिच्या पाळीवर परिणाम झाला. अशावेळी ते त्यांना माहित असलेले जंगली जडी-बुटीचे उपाय करतात. त्या मुलीला घरीच ठेवतात, वेळीच प्राथमिक आरोग्य केंद्रात घेऊन येत नाहीत. तरीही रक्तस्राव थांबलाच नाही तर खूप उशिरा ते दवाखान्यात घेऊन येतात. त्यावेळेपर्यंत मुलीचा रक्सस्राव इतका झालेला असतो की तिच्या अंगात खूप कमी रक्त उरतं. हिमोग्लोबीन अगदी दीड -दोनपर्यंत गेलेलं असतं आणि तिच्या जीवाला धोका निर्माण झालेला असतो.

हिमोग्लोबीन इतकं कमी झाल्यानं अशा स्त्रियांचा हार्ट रेट वाढतो. रक्तदाब सतत वरखाली होतो. त्यांचं शरीर आधी स्थिर करावं लागतं मग बाकी रक्तस्राव थांबवण्याचे उपचार. यादरम्यान या स्त्रियांचा जीव किती तरी धोक्यात असतो. त्यामुळे सात-आठ दिवसांपेक्षा जास्त रक्तस्राव होत असेल तर घरीच कोणतेही उपाय करत बसू नये. लगेच डॉक्टरकडे जायला पाहिजे.   

4. पाळी आल्यावर धार्मिक – अध्यात्मिक कार्यक्रमात सहभागी होऊ नये कारण पाळीचं रक्त अशुद्ध असतं. 

 तथ्य- डॉ. रेवडकर सांगतात, मानवी शरीरातल्या रक्ताकडे जगण्यासाठी आवश्यक असलेला महत्वाचा घटक म्हणून पाहिलं पाहिजे. मंदिरातले पुजारी, धर्मोपदेशक – जे जे लोक पाळीच्या रक्ताला अशुद्ध, विटाळ वगैरे म्हणतात, त्या प्रत्येकाचा जन्मही गर्भाशय आणि योनीवाटेच झालेला आहे. स्त्री-पुरुष सगळ्यांचाच जन्म नैसर्गिक-जीवशास्त्रीय प्रक्रियेतून होतो. त्यातसा मासिक रक्तस्राव अशुद्ध कसा असेल? असा प्रश्न आपण विचारला पाहिजे.

5. अंगावरून पांढरं जाणं म्हणजे शरीरातले धातू बाहेर पडत आहेत, हाडं ठिसूळ होणं. असा स्राव बाहेर पडतो म्हणजे शरीरातली घाणही बाहेर पडते.

तथ्य- मासिक पाळीबद्दल शास्त्रीय माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करणाऱ्या कल्याणी पवार सांगतात, “पांढरा स्राव (White discharge) किंवा अंगावरून पांढरं पाणी जाणं, हे योनीमार्ग व्यवस्थित काम करत असल्याचं लक्षण आहे. ज्याप्रमाणे डोळ्यात काही कचरा गेल्यावर डोळ्यातून पाणी येतं आणि डोळा साफ होतो, तसंच योनीमार्गाचं हे स्वच्छतेचं मेकॅनिझम”

पाळी येण्यापूर्वीदेखील देखील काही महिलांच्या अंगावरून जास्त पांढरं जातं आणि ही सामान्य गोष्ट आहे. त्याने शरीरातले कोणतेही उपयोगी धातू बाहेर पडत नाहीत किंवा हाडांची झीज होत नाही, तर यामुळे योनी आणि योनीमार्गाची स्वच्छता होते. योनी आणि योनी मार्गास वंगण (lubricant) म्हणनू पांढरं पाणी काम करतं.

या स्त्रावाला थोडासा वास नैसर्गिकरित्या असतोच. पण जास्त दुर्गंधी येणं, योनी भागात खाज येणं, स्त्रावाचा रंग बदलला म्हणजे पांढऱ्याऐवजी पिवळसर, करडा, हिरवा होणं अशी लक्षणं दिसली तर कदाचित संसर्ग झालेला असू शकतो. अशावेळी लगेचच डॉक्टरकडे गेलं पाहिजे. पांढऱ्या स्रावाचं प्रमाण नेहमीपेक्षा जास्त असलं म्हणजे आतले कपडे किंवा सॅनिटरी नॅपकीन पूर्ण भिजण्याइतकं असलं तरीही लगेचच डॉक्टरला दाखवणं गरजेचं आहे.    

6. रक्तानं माखलेले सॅनिटरी नॅपकीन्स उघड्यावर असेच टाकू नयेत.  त्याजवळून साप फिरले तर, ज्या स्त्रीनं ते पॅड्स टाकलेत तिला वंध्यत्व येतं (मुलबाळ होत नाही)

तथ्य- कल्याणी पवार सांगतात, “पाळीच्या काळात वापरलेले पॅड्स असेच फेकू नयेत, हे योग्यच आहे. ते नीट पेपरमध्ये गुंडाळून- कुणाच्याही अगदी सफाई कामगारांच्या हाताला लागणार नाहीत, याची काळजी घेऊनच कचऱ्यात टाकले पाहिजेत. याचं साधं कारण आहे की इतरांना जंतुसंसर्ग होऊ शकतो. अगदी प्राण्यांनाही तो होऊ नये म्हणून काळजी घेतली पाहिजे.

डॉ. रेवडकरही सांगतात, कचऱ्याजवळ बऱ्याचदा कुत्रे फिरतात, रक्ताचा वास हुंगून ते वापरलेल्या सॅनिटरी नॅपकीन्सच्या संपर्कात येणं शक्य असतं. त्यामुळे इतर जनावरांना, माणसांना अपाय होऊ नये, म्हणून त्याची नीट विल्हेवाट लावणं गरजेचं आहे. पण अशा वापरलेल्या सॅनिटरी नॅपकीन्सच्या संपर्कात कुठलंही जनावर आलं तरी त्याचा बाईच्या प्रजनन क्षमतेवर काहीही परिणाम होत नाही. 

 7. पाळीदरम्यान सेक्स करू नये.

तथ्य- डॉ. रेवडकर सांगतात, पाळीदरम्यान सेक्स करण्यात काहीही अपाय नाही. पाळीच्या काळात सेक्स करू नये, असा मोठाच गैरसमज आपल्याकडे आहे. पाळीच्या काळात अनेकींना पहिल्या दोन-तीन दिवसांत थकवा असतो, एनर्जी कमी असते, एक्झर्शन नको वाटतं, म्हणून सेक्स करणं नको वाटलं, तर ते ठीकच आहे, पण पाळी दरम्यान सेक्स करण्यास शास्त्रीयदृष्ट्या कुठलाही मज्जाव नाही.

पाळीदरम्यान केलेल्या सेक्सनं दोघांपैकी कुणाच्याही शरीराला काहीही अपाय होत नाही, उलट स्त्रियांना याचा फायदाच होतो. ‘ऑक्सीटोनीन’ हे हार्मोन शरीरात स्रवल्याने त्यांचा मूड छान होतो. पण हा सेक्स छान, हळूवार हवा, स्त्रियांच्या भावनिक, मानसिक गरजांची, त्यांना अपेक्षित असलेल्या हळुवार स्पर्शाच्या गरजेची जोडीदारानं नीट दखल घ्यायला हवी. त्यामुळे या काळात होणारी चिडचिड, मूड स्विंग्ज काहीसे कमी होऊन मनस्थिती आंनदी राहण्यासाठी मदत होते. सेक्सनंतर शरीरातल्या हार्मोन्स सिक्रेशनमुळे पाळीदरम्यान जे क्रॅम्प्स येतात, तेही कमी होतात. त्यामुळे या काळात योग्य ती काळजी घेऊन सेक्स करायला काहीच हरकत नाही.”  

ग्राफिक्स- मयुरी धुमाळ/bolkyamarathibayka

हे ही वाचा- ग्रहण काळातील गर्भवती स्त्रियांविषयी अंधश्रद्धेच्या नियमांची वैज्ञानिक दृष्टीने उलटतपासणी!

(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती आमच्या (9172011480) या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.

आपण फेसबुकट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता) 

More from फॅक्ट फाईल्सMore posts in फॅक्ट फाईल्स »

Be First to Comment

    Leave a Reply

    Your email address will not be published.

    × न्यूज अपडेट्स मिळवा