Press "Enter" to skip to content

हिंदू प्रेयसीची हत्या करून सुटकेसमधून मृतदेहाची विल्हेवाट लावायला निघालेला मुस्लिम तरुण अटक?

सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होतोय. व्हायरल व्हिडिओमध्ये सुटकेसमध्ये एका तरुणीचा मृतदेह बघायला मिळतोय. सोबतच काही लोक एका तरुणाला मारहाण करताना दिसताहेत. दावा केला जातोय की लव्ह जिहादमुळे गुलशेर या मुस्लिम तरुणाने आपल्या हिंदू प्रेयसीची हत्या केली. सुटकेसमधून मृतदेहाची विल्हेवाट लावायला निघालेल्या या तरुणाला अटक करण्यात आली.

Advertisement

अर्काइव्ह

‘चेकपोस्ट मराठी’चे वाचक निलेश घरत, पुरुषोत्तम शर्मा आणि शैलेश चौधरी यांनी सदर दावे व्हॉट्सऍपवर जोरदार व्हायरल होत असल्याचे निदर्शनास आणून देत पडताळणीची विनंती केली.

पडताळणी:

व्हायरल व्हिडिओच्या किफ्रेम्स रिव्हर्स सर्चच्या साहाय्याने शोधल्या असता ‘खबर पहाड’ या वेबसाईटवर 25 मार्च रोजी प्रसिद्ध बातमी बघायला मिळाली. बातमीनुसार हरिद्वारमधील कालियारमध्ये लग्नास नकार दिल्याने बीकॉमच्या विद्यार्थिनीची हत्या करणाऱ्या गुलवेज नामक तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे.

Source: Khabar Pahad

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृत तरुणीचे नाव काजल नाही तर रमशा आहे. रमशा मुस्लिम असून मंगलोरची रहिवासी होती. शिवाय आरोपी गुलवेज आणि मृत तरुण रमशा एकमेकांचे नातेवाईक होते.

एसपी परमेंद्र डोभाल यांनी सांगितले की या प्रकरणाचा लव्ह जिहादशी काहीही संबंध नाही. मृत रमशा आणि गुलवेज दोघेही एकाच समाजातील असून अनेक दिवसांपासून एकमेकांच्या संपर्कात होते. कालियारच्या हॉटेलमध्ये थांबलेले असताना गुलवेजने काजल नावाच्या तरुणीचा बनावट आयडी दिला होता. मात्र या बनावट आयडीमध्येही काजलच्या वडिलांचे नाव मुस्लिमच होते. पोलिसांकडून या बनावट आयडीचीही चौकशी करण्यात येत आहे.

सध्या आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहे. आरोपीने उशीने चेहरा दाबून प्रेयसीचा खून केला आणि त्यानंतर सुटकेसमधून मृतदेह बाहेर घेऊन जाऊ लागला. मात्र त्याला सुटकेस उचलता येत नसल्याने हॉटेलच्या कर्मचाऱ्यांना संशय आला आणि त्यानंतर हे सर्व प्रकरण समोर आल्याचे देखील परमेंद्र डोभाल सांगतात.

मिळालेल्या माहितीची खात्री करण्याकरिता अधिक शोध घेतला असता जागरणच्या वेबसाईटवर देखील या घटनेची बातमी मिळाली. बातमीनुसार मृत तरुणी रमशा आणि आरोपी गुलवेज हे गेल्या आठ वर्षांपासून एकमेकांच्या प्रेमात होते. मात्र रमशाने लग्नास नकार दिल्याने चिडलेल्या गुलवेजने तिची हत्या केली. मृत तरुणीचे वडील राशिद यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी एफआरआर दाखल करून घेतली असून आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहे.

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की सोशल मीडियावरील व्हायरल दावे चुकीचे असून या प्रकरणाशी लव्ह जिहादचा काहीही संबंध नाही. मृत तरुणी आणि आरोपी दोघेही मुस्लिम आहेत. तरुणीने लग्नास नकार दिल्यानंतर तरुणाकडून तिची हत्या करण्यात आली असून पोलिसांनी आरोपीस अटक केली आहे.

हेही वाचा- बीरभूम हिंसाचार: बंगालमध्ये 10 हिंदू महिला आणि 2 बालकांच्या हत्येचे दावे चुकीचे!

(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती आमच्या (9172011480) या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.

आपण फेसबुकट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता)

More from धर्म-संस्कृतीMore posts in धर्म-संस्कृती »

Be First to Comment

    Leave a Reply

    Your email address will not be published.

    × न्यूज अपडेट्स मिळवा