Press "Enter" to skip to content

आधार क्रमांकाविषयी खबरदारी घ्यायला सांगणाऱ्या व्हायरल ऑडीओशी मुंबई पोलिसांचा संबंध नाही!

‘जिनके आधार कार्ड बने हुए उनके लिए जरूरी सुचना – सभी सावधान रहे और ये रिकॉर्डिंग जरूर सुने और जल्दी से जल्दी आगे पहुँचाया जाये प्लीज़ – धन्यवाद..- Mumbai Police

कृपया !! तुमच्याकडे जेवढे ग्रुप आणि कॉन्टॅक्ट नंबर असतील त्यांना ही  बातमी पटकन पाठवा…’

Advertisement

या अशा मेसेज सोबत एक ऑडिओ क्लिप व्हॉट्सऍपद्वारे फिरत आहे. ही माहिती ‘चेकपोस्ट मराठी’च्या वाचकांनी आमच्या ‘9172011480’  या क्रमांकावर मेसेज करून कळवली.

मेसेजचा स्क्रीनशॉट:

Whatsapp viral message claiming not to share Aadhar number
Source: Whatsapp

ऑडीओमध्ये निवेदक सांगत आहे की ‘तुम्हाला कुणाही हिंदी भाषिक व्यक्तीचा आयडिया, एअरटेल सारख्या कंपनीतून बोलतोय असे सांगून कॉल येऊ शकतो. ते व्हेरिफिकेशनच्या नावाखाली आपणास आधार क्रमांक ( aadhar kramank ) मागतील आणि काही वेळाने तुमच्या मोबाईलवर आलेला OTP विचारतील. जसा आपण ओटीपी सांगाल तसे काही क्षणात आपल्या बँक अकाऊंटमधील सगळे पैसे ट्रान्सफर झालेले असतील. अशा फसव्या आणि बोगस कॉल पासून दक्ष रहा.’

पडताळणी:

‘चेकपोस्ट मराठी’ने ऑडीओ व्यवस्थित ऐकला. या ऑडीओच्या शेवटी निवेदक ‘लाइव्ह महाराष्ट्रसाठी किशोर गावडे भांडूप’ असं म्हणाले आहेत. तरीही या ऑडीओचा मुंबई पोलिसांशी काही संबंध आहे का हे तपासण्यासाठी आम्ही ‘लाईव्ह महाराष्ट्र’ या न्यूज पोर्टलच्या वेबसाईटवरून संपादकांचा संपर्क क्रमांक शोधला.

संपादक अनिल कांबळे यांच्याशी झालेल्या संवादातून लक्षात आले की ‘ही ऑडीओ क्लिप आताची नसून दोन वर्षांपूर्वीची आहे. जनजागृतीसाठी ही ऑडीओ क्लिप बनवली होती. याचा मुंबई पोलिसांशी किंवा इतर कुठल्याही शासकीय संस्थेशी काही एक संबंध नाही. क्लिप व्हायरल करताना कुणीतरी खोडसाळपणा करत ‘Government of India’ आणि ‘मुंबई पोलीस’ लिहून पाठवल्याचं दिसतंय.’

आधार क्रमांक वापरून बँकेतील पैसे चोरी केले जाऊ शकतात काय?

‘फायनान्सियल एक्स्प्रेस’ने २०१८साली ‘Linked your bank account with Aadhaar? Can someone steal your money now? Know UIDAI’s answer’ अशी एक बातमी केली होती.

यात सांगितल्याप्रमाणे आधार नंबरद्वारे ( aadhar kramank ) आपल्या बँकमधील पैसे कुणी काढून घेऊ शकते का? या प्रश्नावर उत्तर देताना शासकीय अधिकारी असं म्हणाले की, ‘अजिबात नाही, जसे केवळ ATM नंबर माहिती असल्याने कुणी ATM मधून आपले पैसे काढू शकत नाही तसे केवळ आधार नंबरच्या आधारे तुमच्या अकाऊंटमधील पैसे काढून घेऊ शकत नाही. जोवर तुम्ही बँकेकडून आलेला एखादा पिन किंवा OTP कुणाशी शेअर करत नाहीत तोवर तुमचे पैसे आणि खाते सुरक्षित आहे.’

ते पुढे असंही म्हणाले ‘या व्यतिरिक्त आधारच्या मदतीने कुणाचे पैसे चोरी झाल्याची अजून एकही केस निदर्शनास आलेली नाही.’

आधारच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरसुद्धा असं सांगितलं आहे की ‘इतर कोणत्याही ओळखपत्रांप्रमाणेच आधार एक आहे. यात गोपनीय ठेवावी अशी कुठली माहिती नाही. केवळ आधार नंबर माहिती असल्याने कुणीही त्या व्यक्तीस तोतयागिरी करून त्रास देऊ शकत नाही. ओळख पटवून देण्यासाठी त्या व्यक्तीचे बायोमेट्रिक डीटेल्स सुद्धा गरजेचे असतात.’

(बायोमेट्रिक म्हणजे बोटांचे ठसे आणि डोळ्यांचे स्कॅन केलेले डीटेल्स.)

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये हे सिद्ध झालं की व्हायरल ऑडीओचा मुंबई पोलीस किंवा इतर कुठल्याही शासकीय संस्थेशी संबंध नाही.

आधार कार्डवरील क्रमांक वापरून कुणीही आपल्या बँक खात्यातील पैसे काढू शकत नाही, आधार द्वारे ओळख पटवून देण्यासाठी बायोमेट्रिक डीटेल्स आवश्यक आहेत.

या व्यतिरिक्त खबरदारी म्हणजे बँकेकडून आलेला कुठलाही पिन किंवा OTP इतर कुणालाच न सांगण्यात आपल्या पैशांची आणि खात्याची सुरक्षितता अवलंबून आहे.

हेही वाचा: होंडा कंपनी फ्रीमध्ये ऍक्टिवा वाटतेय असा मेसेज तुम्हाला आलाय? मग हे नक्की वाचा

More from लाइफस्टाइलMore posts in लाइफस्टाइल »
More from समाजकारणMore posts in समाजकारण »

2 Comments

Leave a Reply

Your email address will not be published.

× न्यूज अपडेट्स मिळवा