Press "Enter" to skip to content

‘मोदींची निवड WHO च्या चेअरमनपदी’ म्हणत अभिनंदन करणाऱ्यांनो, असं कुठलं पदच अस्तित्वात नाही !

‘जागतिक आरोग्य संघटना’ अर्थात WHO च्या शीर्षस्थानी पहिल्यांदाच भारताचे पंतप्रधान आरूढ झाले’हे कॅप्शन. सोबत पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मस्त असा एडीट केलेला फोटो. त्यावर ‘इंडियाज बेस्ट लीडर’ आणि ‘बधाईया रुकनी नही चाहिये’ असं लिहून फेसबुक युझर कांचन खरे

Advertisement
यांनी शेअर केलंय.

कांचन खरे फेसबुकवर स्वतःची ओळख ‘व्ही.पी.वूमन सेल कल्याण जिल्हा. झोनल रेल्वे कमिटी मेंबर आणि फिल्म सेन्सॉर बोर्डाच्या सल्लागार समितीच्या सदस्या’ अशी सांगतात.

याबद्दल ट्विटरवर ’७२ साल में पहली बार मोदीजी के प्रयासोसे भारत WHO का अध्यक्ष बना है. मजाल है किसी चमचे ने बधाई दी हो ?’ असं लिहिलंय. तर कुणी ‘चीन का भविष्य WHO के हाथो में. और WHO २२ मई यानी आज से हमारे मोदीजी के हाथ मे! असली खेल तो अब शुरू होगा चिंगचोंग.’ असं लिहून ट्विट केलंय.

पडताळणी:

‘जागतिक आरोग्य संघटने’च्या म्हणजेच WHO च्या चेअरमन पदी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची निवड व्हावी आणि मुख्य प्रवाहातील माध्यमांनी या बातमीची दखल घेऊ नये, हे आजघडीला तरी शक्य नाही. म्हणून मग हे नेमकं प्रकरण काय आहे, याच्या पडताळणीसाठी आम्ही WHO च्या अधिकृत वेबसाईटवर गेलो. चेअरमन पदी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं नाव सापडतंय का ते शोधण्याचा प्रयत्न केला.

ह्या सगळ्या संशोधनात आम्हाला एक गमतीशीर गोष्ट सापडली. ती अशी की WHO मध्ये चेअरमन वगैरे असं काही पदच नाहीये. संघटनेतलं सर्वात महत्वाचं पद म्हणजे ‘डायरेक्टर जनरल’. कदाचित ‘डायरेक्टर जनरल’ ऐवजी ‘चेअरमन’ असा शब्द लिहिला गेला असावा, अशी शक्यता लक्षात घेऊन मग आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदींची निवड या पदावर झालीये का  हे शोधण्याचा प्रयत्न केला.  

आम्ही ‘डायरेक्टर जनरल’ची चौकशी केली तर तिथेही आम्हाला भलतंच नाव सापडलं. WHO च्या वेबसाईटनुसार संघटनेच्या ‘डायरेक्टर जनरल’ पदावर सध्या डॉ. तेद्रोस अधनॉम घेब्रेयेसस हे विराजमान आहेत. साधारणतः ३ वर्षांपूर्वी म्हणजेच मे २०१७ साली त्यांची या पदावर निवड झाली होती आणि ही निवड ५ वर्षांसाठी करण्यात आली होती. म्हणजेच किमान २०२२ पर्यंत तरी या पदावर घेब्रेयेसस हेच विराजमान असणार आहेत, हे तर स्पष्टच आहे. त्यांच्याबद्दलची सविस्तर माहिती वेबसाईटवर उपलब्ध आहे.

मग कदाचित लोकांनी WHO चा चेअरमन आणि ‘कार्यकारी मंडळाचा चेअरमन’ यात काही गल्लत केली की काय, ही शक्यता तपासून पाहण्यासाठी आम्ही ‘कार्यकारी मंडळाचा चेअरमन’ या पदावर सध्या कोण विराजमान आहे, हे शोधलं, त्यावेळी २२ मे रोजी केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांची या पदावर निवड झाल्याची माहिती आम्हाला NDTVच्या बातमीत सापडली. WHO च्या वेबसाईटवर या निवडीचा व्हिडीओसुद्धा उपलब्ध आहे.

तीन वर्षांच्या कार्यकाळासाठी ३४ सदस्यांची निवड या कार्यकारी मंडळासाठी होते. या सदस्यांची वार्षिक बैठक होते आणि त्यात सार्वमताने काही ठराव संमत केले जातात. कार्यकारी मंडळाचा अध्यक्ष रोटेशन पद्धतीने एका वर्षासाठी निवडला जातो.

वस्तुस्थिती:

WHO म्हणजेच जागतिक आरोग्य संघटनेचा ‘चेअरमन’ असे कुठलेही पद अस्तित्वात नाही. जे मुख्य पद आहे ‘डायरेक्टर जनरल’ त्यावर ‘डॉ. तेद्रोस अधनॉम घेब्रेयेसस’ हे विराजमान आहेत.

‘चेअरमन’ हे पद ज्या कार्यकारी मंडळासाठी आहे त्यावर डॉ. हर्षवर्धन यांची निवड झालीय. जी दर वर्षी रोटेशन पद्धतीने होत असते.

त्यामुळे WHO च्या चेअरमनपदी मोदींची निवड झालीय ही फेकन्युज असून असले कुठले पदच अस्तित्वात नाही, हे आमच्या पडताळणीत स्पष्ट झाले आहे.

हेही वाचा:

होय, कॉंग्रेसने खरंच सावरकरांना समलिंगी म्हंटलं होतं !

More from राजकारणMore posts in राजकारण »

2 Comments

Leave a Reply

Your email address will not be published.

× न्यूज अपडेट्स मिळवा