कॉंग्रेस शासित छत्तीसगडमधील जशपुर (Jashpur accident) येथे निघालेल्या दुर्गा विसर्जन मिरवणुकीवर भरधाव जीप चालून आली. ५० पेक्षा जास्त लोकांना जीपने उडवले. त्यात ४ जण मृत झाले. या दाव्यांसह घटनेचा व्हिडीओ व्हायरल करत आता महाविकास आघाडी महाराष्ट्र बंद करणार का? असा उपरोधिक सवाल विचारणाऱ्या पोस्ट्स सोशल मीडियात व्हायरल होतायेत.
‘चेकपोस्ट मराठी’चे वाचक नंदकिशोर भारसाखळे, वाघेश साळुंखे, बळीराम पाटील आणि हर्शल अरबाड यांनी सदर दाव्यांची पडताळणी करण्याची विनंती केलीय.
पडताळणी:
‘चेकपोस्ट मराठी’ने छत्तीसगडच्या या घटनेविषयी (Jashpur accident) गुगल सर्च केल्यानंतर एबीपी न्यूज, आजतक, इंडिया टीव्ही आणि द हिंदू यांसारख्या विविध राष्ट्रीय माध्यमांच्या बातम्या समोर आल्या. या सर्वांच्या माहितीनुसार छत्तीसगड जशपुर येथे मिरवणुकीवर चालून आलेल्या भरधाव गाडीच्या धडकेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला, २ जण गंभीर आहेत तर १५ जणांना दुखापत झालीय.
राजकीय संदर्भ
३ ऑक्टोबर २०२१ रोजी उत्तरप्रदेशातील लखीमपुर येथे शेतकरी आंदोलकांवर भाजप नेते केंद्रीय मंत्री अजय मिश्रा (Ajay Mishra) यांच्या मुलाने गाडी चालवली होती. या घटनेत ८ जणांना आपले प्राण गमवावे लागले होते. आंदोलन दडपण्यासाठी सत्ताधारी पक्षाच्या नेत्याच्या मुलाकडून ही घृणास्पद घटना घडलीय. त्यावर देशाचे पंतप्रधान, उत्तरप्रदेश मुख्यमंत्री व भाजप नेते बोलण्यास तयार नाहीत. कायदेशीर कारवाईत देखील दिरंगाई होतेय अशा विविध दाव्यांसह भाजप विरोधकांनी हल्लाबोल केला होता. घटनेचा निषेध म्हणून महाविकास आघाडी संचलित महाराष्ट्र सरकारने ११ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र बंद जाहीर केला होता.
देशभरातून लखीमपुर घटनेवर भाजपविरोधी वातावरण तयार होत असतानाच कॉंग्रेसशासित छत्तीसगढ मध्ये ही घटना घडलीय. छत्तीसगढ पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे. बबलू विश्वकर्मा आणि शिशुपाल साहू या दोन तरुणांना कलम ३०२ आणि ३०४ अंतर्गत अटक केली आहे. हे दोघेही मध्यप्रदेशातील असून ते गांजा घेऊन चालले होते.
मध्यप्रदेशात शिवराज सिंह चौहान (Shivraj Singh Chouhan) यांच्या नेतृत्वाखाली भाजप सरकार आहे. त्यामुळे छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश सिंह बघेल (Bhupesh Baghel) यांनी ‘मध्यप्रदेशात गांजा विक्रीसाठी या दोघांना नेमके कोण संरक्षण देत होते’ याचीही चौकशी केली जाईल असे विधान करत भाजपवर निशाना साधलाय.
लखीमपुर खेरी आणि जशपुर घटनेत फरक नेमका काय?
लखीमपुरमध्ये शेतकरी आंदोलकांवर केंद्रीय मंत्र्याच्या मुलाने गाडी चालवली होती. भाजप नेत्यांनी यावर प्रतिक्रिया देणे टाळले. तसेच कायदेशीर कारवाईस देखील दिरंगाई झाली. सरकारविरोधी आंदोलकांवर सरकारमधीलच मंत्र्यांच्या मुलाने चालवलेली गाडी स्पष्टपणे हेतुपुरस्सर केलेला गुन्हा दिसतो.
जशपुरमध्ये घडलेल्या घटनेत अजूनतरी राजकीय हेतू असल्याचे स्पष्ट झाले नाही. छत्तीसगड सरकारने आरोपींना तत्काळ अटक केले असून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई चालू आहे. छत्तीसगड पोलीस प्रशासनाने दोन स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित केले आहे. तसेच मुख्यमंत्री बघेल यांनी घटनेत मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांना ५० लाख रुपये देण्याचे जाहीर केलेय.
महाविकास आघाडीने निषेध करायला हवा?
लखीमपुर घटनेचा आणि केंद्र-राज्य सरकारचा निषेध करत महाविकास आघाडीने महाराष्ट्र बंद जाहीर केला होता. मग आताही या घटनेबद्दल महाराष्ट्र बंदची हाक का दिली जात अनही? छत्तीसगड कॉंग्रेस शासित असल्याने महाविकास आघाडी नेते शांत आहेत का असा सवाल होतोय. परंतु जशपुर घटनेत शासन-प्रशासनाने जेजे करणे आवश्यक आहे ते ते केले आहे, करत आहेत. अशा परिस्थितीत नेमका कशाचा आणि कुणाचा निषेध करून थेट महाराष्ट्र बंदचे पुन्हा आवाहन करावे या प्रश्नाचे उत्तर मविआ विरोधकांकडून येताना दिसत नाहीये.
वस्तुस्थिती:
‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीत हे स्पष्ट झाले की महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधण्यासाठी व्हायरल होत असलेले दावे दिशाभूल करणारे आहेत. तसेच जशपुर घटनेत चार नव्हे तर एका व्यक्तीचा मृत्यू झालाय.
हेही वाचा: शेतकरी आंदोलनात भारतीय तिरंग्याचा अपमान? वाचा व्हायरल व्हिडीओचे सत्य!
(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती ‘ चेकपोस्ट मराठी’च्या 9172011480 या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.
आपण फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता)
Be First to Comment