सोशल मीडियावर एका महिलेचा फोटो शेअर केला जातोय. दावा करण्यात येतोय की सदर महिला पंतप्रधान मोदींच्या वहिनी असून त्यांचं नुकतंच अहमदाबादच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आजारामुळे निधन झालं (death of Narendra Modi’s daughter-in-law) आहे. त्या नरेंद्र मोदींचे बंधू प्रल्हाद भाई मोदी यांच्या पत्नी होत्या.
व्हाट्सअपवर देखील हाच फोटो व्हायरल होतोय.
पडताळणी:
व्हाटसअप मेसेजमध्ये भगवती बेन मोदी असा महिलेच्या नावाचा उल्लेख असल्याने आम्ही गुगल सर्चच्या आधारे शोध घेतला. त्यावेळी आम्हाला १ मे २०१९ रोजी म्हणजेच साधारणतः दीड वर्षांपूर्वी अनेक वृत्तपत्रांच्या वेबसाईटवर प्रसिद्ध बातम्या सापडल्या. या बातम्यांनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदींचे बंधू प्रल्हाद मोदी यांच्या पत्नी भगवती बेन मोदी यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन (death of Narendra Modi’s daughter-in-law) झाले होते.
हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वी भगवती बेन मोदी दीर्घकाळापासून आजारी होत्या. अहमदाबादमधील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु होते. त्यांना बीपी, किडनी आणि मधुमेहाचा देखील त्रास होता.
‘आज तक’च्या वेबसाईटवर प्रसिद्ध बातमीनुसार भगवती बेन यांचे पती प्रल्हाद मोदी हे पंतप्रधान नरेंद्र मोदींपेक्षा दोन वर्षांनी लहान आहेत. गेला बराच काळ ते आपल्या मोठ्या भावाच्या संपर्कात नव्हते. गेल्या 13 वर्षात त्यांची आणि नरेंद्र मोदी यांची भेट आणि संवाद फारच कमी झाला असल्याची माहिती देखील त्यांनी एका मुलाखतीत दिली होती.
इथपर्यंतच्या पडताळणीमध्ये हे स्पष्ट झालं की नरेंद्र मोदींच्या वहिनींचे अहमदाबादमधील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये निधन झालेले आहे, पण ही घटना आताची नसून साधारणतः दीड वर्षांपूर्वीची आहे. पण बहुतांश रिपोर्ट्समध्ये भगवती बेन मोदी यांचा फोटो नसल्याने सध्या व्हायरल होत असलेला फोटो पंतप्रधानांच्या वहिनीचाच आहे का हे मात्र या रिपोर्ट्समधून स्पष्ट झाले नाही.
त्यानंतर सध्या व्हायरल होत असलेला फोटो भगवती बेन मोदी यांचाच आहे का, या गोष्टीची खात्री पटविण्यासाठी आम्ही तो फोटो रिव्हर्स सर्चच्या मदतीने शोधला. त्यावेळी आम्हाला ‘लाईव्ह उत्तर प्रदेश’ या पोर्टलवर भगवती बेन मोदी यांच्या मृत्यूसंबंधीची बातमी मिळाली. या बातमीमध्ये तोच फोटो वापरण्यात आलेला आहे, जो सध्या व्हायरल होतोय.
वस्तुस्थिती:
‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले की सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला दावा दिशाभूल करणारा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वहिनी भगवती बेन मोदी यांचा साधारणतः दीड वर्षांपूर्वी मृत्यू झाला आहे. सध्या त्यांचा फोटो वापरून दिशाभूल करणारा दावा व्हायरल केला जातोय.
हे ही वाचा- पाकिस्तानच्या संसदेत लावण्यात आले ‘मोदी-मोदी’चे नारे?
Be First to Comment