रामदेव बाबांच्या ‘कोरोनिल’वर आयुष मंत्रालयाने बंदी घातली. त्या पाठोपाठ महाराष्ट्र सरकार आणि राजस्थान सरकारने देखील या औषधावर बंदी घातलीये.
सोशल मिडीयावर मात्र एका ट्वीटच्या स्क्रिनशॉटच्या माध्यमातून वेगळाच दावा व्हायरल होतोय. पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ या ट्विटर हँडलवरून हे ट्वीट करण्यात आलंय.
ट्वीटनुसार बाबा रामदेव यांच्या ‘कोरोनिल’वर बंदी घालणाऱ्या डॉ.मुजाहिद हुसैन यांना आयुष मंत्रालयातून काढून टाकण्यात आलं आहे. मुजाहिद हुसैन सारखे लोक आयुर्वेदाचा प्रचार होऊ नये म्हणून व्यवस्थेत राहून जिहाद पसरवतात.
हाच स्क्रिनशॉट फेसबुकवरून शेअर करून सेक्युलर लोकांना बोल लावले जाताहेत.
स्वतःबद्दल नॅशनॅलिस्ट आणि बाल्यकाल स्वयंसेवक अशी माहिती देणाऱ्या आशिष जग्गी या ट्विटर युजरने देखील साधारणतः अशाच आशयाचं ट्वीट केलंय.
तुम्हाला आयुष मंत्रालयातील ‘त्या’ डॉक्टरचं नाव माहितेय का, ज्याने पतंजलीच्या ‘कोरोनिल’वर बंदी घातली. तो आहे डॉक्टर मुजाहिद हुसैन आणि त्याला असं वाटत की व्हायरस बरा करण्यासाठी आयुर्वेदाचा प्रचार आणि प्रसार होऊ नये. व्यवस्थेमधल्या अशा लोकांची नावं देशाला माहित असणं गरजेचं आहे.
आशिष जग्गीचं हे ट्वीट ६ हजार लोकांनी लाईक आणि आणि ३६०० लोकांनी रिट्वीट केलंय.
ट्विटर आणि फेसबुकवर इतरही अनेकांनी हेच दावे केलेत. बहुतांश दाव्यांची भाषा देखील सारखीच आहे.
पडताळणी:
आयुष मंत्रालयाने ‘कोरोनील’ औषधावर बंदी घातल्यामुळे कुठल्या डॉक्टरवर बंदी घातली असल्यासंबंधीची कुठलीही बातमी न्यूज पेपर किंवा न्यूज चॅनेलने दिल्याचं आम्हाला आढळलं नाही.
पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ या ट्विटर हँडलवरून करण्यात आलेलं ट्वीट शोधण्याचा प्रयत्न आम्ही केला परंतु संबंधित अकाऊंटवरून व्हायरल झालेल्या स्क्रीनशॉटमधील मूळ ट्वीट डिलीट करण्यात आलेलं आहे.
आमच्या पडताळणी दरम्यान आम्हाला आयुष मंत्रालयाचंच एक ट्वीट मिळालं, ज्यात आयुष मंत्रालयाकडून सोशल मिडीयावर पसरवल्या जात असलेल्या मेसेजविषयी स्पष्टीकरण देण्यात आलंय. मंत्रालयाकडून डॉक्टरला काढून टाकण्यात आल्याचा दावा स्पष्टपणे नाकारण्यात आलाय. ट्वीटमध्ये मंत्रालयाने म्हंटलंय,
आयुष मंत्रालयाकडून हे स्पष्ट करण्यात येतंय की मंत्रालयाने गेल्या काही दिवसांमध्ये कुठल्याही डॉक्टर किंवा वैद्यकीय अधिकाऱ्याला सेवेतून काढलेले नाही.शिवाय ट्वीटसोबत मंत्रालयाने पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ या ट्विटर हँडलवरून करण्यात आलेल्या ट्वीटचा स्क्रीनशॉट देखील जोडलेला आहे.
त्यानंतर आम्ही आयुष मंत्रालयाच्या वेबसाईटवर ‘डॉ. मुजाहिद हुसैन’ यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. परंतु अशा नावाचे कुठलेही डॉक्टर अथवा वैद्यकीय अधिकारी आयुष मंत्रालयात कार्यरत असल्याचा कुठलाही पुरावा आम्हाला मिळाला नाही.
वस्तुस्थिती:
‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणी मध्ये हे स्पष्ट झालंय की सोशल मीडियात पसरविण्यात येत असलेले दावे फेक आहेत. शिवाय ‘कोरोनिल’वरील बंदीचा आणि तथाकथित डॉ. मुजाहिद हुसैन यांचा देखील काहीही संबंध नाही. डॉ. मुजाहिद हुसैन या नावाचे डॉक्टर आयुष मंत्रालयात कार्यरत असल्यासंबंधी कुठलाही पुरावा उपलब्ध नाही.
बाबा रामदेव यांच्या संदर्भाने ‘डॉ. मुजाहिद हुसैन’ हे नाव वापरून विशिष्ठ धर्माला टार्गेट करण्याच्या उद्देश्याने सुनियोजित पद्धतीने हे फेक दावे पसरविण्यात येत आहेत. अशा दाव्यांपासून वेळीच सावध राहिलेलं चांगलं.
हेही वाचा: बुरखा घातलेल्या भाजपा कार्यकर्त्याला स्थानिकांनी पकडल्याची घटना खरी; पण…
Be First to Comment