Press "Enter" to skip to content

गोठ्यातला ‘तो’ व्हायरल व्हिडीओ ना मुंबईचा आहे, ना त्यातला व्यक्ती मुस्लीम!

सोशल मीडियावर दुधात भेसळ करणाऱ्या व्यक्तीचा व्हिडीओ व्हायरल होत असून तो व्हिडीओ मुंबईच्या जोगेश्वरी तबेल्यातील असल्याचे सांगण्यात येतेय. शिवाय व्हिडीओ व्हायरल करताना त्याला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न केला जातोय.

एक व्यक्ती म्हशीचे दुध काढून स्वतः पितोय आणि उरलेले उष्टे दुध बादलीतील दुधात मिक्स करतोय. पिल्यामुळे कमी झालेले दुध भरून काढण्यासाठी उघड्या टाकीतले खराब पाणी त्या दुधात ओततोय. शेजारच्या इमारतीमधील काही महिलांनी हा व्हिडीओ शूट केला आणि मुंबई मधील घटना म्हणत प्रचंड व्हायरल झाला.

मेहुल नावाच्या व्यक्तीने ट्विटरवर हा व्हिडीओ शेअर करून ‘ब्रेकिंग, जर तुम्हाला शंभर टक्के शुद्ध दुध हवं असेल तर मुंबईमधील जोगेश्वरीला जा. पहा आणि इतरांना पाठवा’ या कॅप्शनसह शेअर केलाय.

अर्काइव्ह लिंक

याच घटनेला काही लोक धार्मिक रंग देऊन मुस्लीम लोकांना, धर्मनिरपेक्ष लोकांना दुषणे देत आहेत. ‘डिझायनर विकास देव सनातनी’ असं स्वतःचं ट्विटर हँडलनेम ठेवलेला व्यक्ती काय लिहितोय पहा:

‘नारा-ए-तकबीर ऐका.. मुस्लीम दुधवाला तेच करतोय जे त्यांना त्यांचं पुस्तक शिकवतं. जे अजूनही ‘गंगा जमुनी तेहजीब’वर विश्वास ठेवतायेत त्या सर्वांपर्यंत हा एक्सक्लूझीव किळसवाना व्हिडीओ पोहचायला हवा. बघा आपल्यातले काही लोक किती घाण खातायेत/पितायेत.’

अर्काइव्ह लिंक

हा व्हिडीओ ईतरही सोशल साईट्सवर व्हायरल होतोय असे ‘चेकपोस्ट मराठी’चे वाचक दिनेश पवार यांनी निदर्शनास आणून दिले.

पडताळणी:

‘चेकपोस्ट मराठी’ने सर्वात आधी व्हायरल व्हिडीओ व्यवस्थित ऐकला. त्यामध्ये पाठीमागून अजान होत असल्याने महिलांचा आवाज स्पष्टपणे ऐकू येत नाहीये. तरीही ‘झूठा डालता क्या?’ असा एक संवाद स्पष्टपणे ऐकू आला. हा लहेजा आणि बोलण्याची पद्धत मुंबईची नसल्याने शंका आली आणि पडताळणीला आम्ही सुरुवात केली.

व्हिडीओची एक फ्रेम गुगल रिव्हर्स सर्च करून पाहिली तेव्हा आमच्यासमोर टाईम्स ऑफ इंडियाने याविषयी केलेली व्हिडीओ न्यूज पहायला मिळाली. यामध्ये सदर घटना हैदराबादमधील असल्याचे सांगण्यात आले आहे.

याच अनुषंगाने काही कीवर्ड्स टाकून सर्च केले असता आम्ही ‘न्यूजमीटर’ने पब्लिश केलेल्या बातमीवर पोहचलो. यामध्ये त्यांनी सदर घटना हैदराबाद मध्येच घडली असल्याचे सांगितले असून याविषयी डबीरपूरा पोलिसांनी कारवाई सुद्धा चालू केली असल्याचे स्पष्ट केले आहे.

गोलखबर परिसरातील जहांगीर मिल्क फार्म मध्ये घडलेला हा प्रकार असून पोलिसांनी आयपीसी सेक्शन 269, 272 आणि 273 अंतर्गत कारवाई तक्रार नोंदवून घेतली आहे. बातमीत लिहिल्याप्रमाणे पोलिसांनी फार्मचा मालक युसुफ यास अटक केली आहे पण व्हिडीओमध्ये दिसणारा व्यक्ती ‘राजू’ फरार आहे.

याच वेबसाईटशी संबंधीत असणाऱ्या पत्रकार कोरीना सौरेस यांनी हीच माहिती ट्विटरवर पोस्ट केलीय.

वस्तुस्थिती:

चेकपोस्ट मराठी‘च्या पडताळणीमध्ये हे सिद्ध झालं की सदर व्हायरल व्हिडीओ मुंबईमधील जोगेश्वरीचा नसून तो हैदराबादमधील आहे. यात दिसणारी व्यक्ती मुस्लीम नसून राजू नामक हा इसम सध्या फरार आहे.

कुठल्याही घटनेला धार्मिक रंग देऊन खरी ‘गंगा-जमुनी तेहजीब’ गढूळ करण्याचा प्रयत्न सातत्याने होत असतो, अशावेळी कशावर विश्वास ठेवावा आणि कशावर नाही हे चटकन लक्षात येत नसेल तर ‘9172011480’ या ‘चेकपोस्ट मराठी’च्या अधिकृत व्हॉट्सऍप नंबरवर संपर्क साधा. आम्ही तुम्हाला खरं काय खोटं काय ते सांगू.

हेही वाचा: ‘सुप्रीम कोर्टाचा निर्णय, ब्राह्मण समाजासाठी ऍट्रॉसिटी ऍक्ट मंजूर’ फेक मेसेज व्हायरल!

More from धर्म-संस्कृतीMore posts in धर्म-संस्कृती »
More from समाजकारणMore posts in समाजकारण »

Be First to Comment

    Leave a Reply

    Your email address will not be published.

    × न्यूज अपडेट्स मिळवा