वेब सिरीजच्या नावाखाली अश्लील व्हिडीओ बनवणारे रॅकेट उघडकीस आले आहे. यात अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे (Shilpa Shetty) पती आणि उद्योजक राज कुंद्रा यांना सोमवारी १९ जुलै रोजी गुन्हे शाखेने अटक केली. तेव्हापासून मीडियात याविषयी बातम्या झळकत आहेत. राज कुंद्राचे (Raj Kundra) उमेश कामत (Umesh Kamat) या व्यक्तीसोबतचे व्हॉट्सऍप चॅट लिक झाल्याची बातमी देताना राष्ट्रीय माध्यमांनी मराठी अभिनेते ‘उमेश कामत’ यांचे फोटोज प्रसारित केले आहेत.
राष्ट्रीय माध्यमे समजली जाणाऱ्या ‘न्यूज नेशन’, ‘आज तक’, आज तकचेच ‘क्राईम तक’ या वाहिन्यांच्या स्क्रिनवर सहआरोपी असलेल्या उमेश कामतचा फोटो म्हणून मराठी अभिनेते ‘उमेश कामत’ यांचा फोटो वापरण्यात आला आहे.
पडताळणी:
- काही दिवसांपूर्वी वेब सीरिजच्या नावाखाली अश्लील चित्रपट बनवण्याचे रॅकेट उघडकीस आले होते, त्यात अभिनेत्री गहना वशिष्ठचे (Gehana Vasisth) नाव आले होते. या प्रकरणात तन्वीर हाश्मी (Tanveer Hashmi) या व्यक्तीस मुंबई गुन्हे शाखेच्या प्रॉपर्टी सेल पोलिसांनी गुजरातमधील सुरत येथून अटक केली होती. ते लोक वेगवेगळ्या व्हिडीओ अॅप्सवर चित्रपट कसे डाऊनलोड करायचे, याची माहिती तन्वीर हाश्मीने चौकशीत दिली होती. याच चौकशी दरम्यान ‘उमेश कामत’ या व्यक्तीला अटक करण्यात आली होती.
- राज कुंद्राच्या (Raj Kundra) मालकीची ‘वियान’ नामक कंपनी आहे. त्याच्या भारतीय शाखेचा व्यवस्थापकीय संचालक म्हणून ‘उमेश कामत’ (Umesh Kamat) हा व्यक्ती काम पहात होता.
- राज आणि उमेश यांच्या संभाषणाचे व्हॉट्सऍप चॅट लिक झाले. यामध्ये त्यांचे नेमके काय बोलणे झाले होते याविषयी बातमी देताना ‘आज तक’, ‘मुंबई तक’ आणि ‘न्यूज नेशन’ने आरोपी ‘उमेश कामत’चा म्हणून चक्क मराठी अभिनेता ‘उमेश कामत’ यांचा फोटो झळकवला.
- या सर्व प्रकारामुळे ‘टाईम प्लीज, येरे येरे पैसा, लग्न पहावे करून, बाळकडू’ यांसारख्या चित्रपटांतून आणि ‘एका लग्नाची तिसरी गोष्ट’ सारख्या मालिकेद्वारे मराठी सिनेरसिकांना परिचित असणाऱ्या उमेश कामत यांना हकनाक मनस्ताप सहन करावा लागलाय.
- स्वतः उमेश कामत यांनी फेसबुकवर खुलासा करत वाहिन्यांच्या गलथान कारभारावर ताशेरे ओढलेत.
“हे कदाचित त्यांना जाणवणार देखील नाही की, त्याच्या एका बेजबाबदार पत्रकारीतेमुळे माझ्या मानसिकतेवर, माझ्या एकूणच प्रतिमेवर काय परिणाम झालाय. आज तक, क्राईम तक, न्यूज नेशन ने जसे माझे फोटोज या प्रकरणी प्रसारित केले त्याक्षणापासून देशभरातून मला आणि माझ्या कुटुंबियांना फोन मेसेजद्वारे चौकशी करणाऱ्यांचा महापूर आलाय. फक्त कुणा एकाला ब्रेकिंग द्यायची एवढी घाई होती की त्याने तथ्यांची तपासणी न करता सरळ सरळ फोटो वापरून मोकळे झाले. माझ्या वैयक्तिक, सामाजिक आणि व्यावसायिक हानीसाठी या वाहिन्यांना जबाबदार धरले जाईल. मी याविषयी कायदेशीर कारवाई करत आहे.”
– उमेश कामत (मराठी अभिनेता)
वस्तुस्थिती:
‘आज तक’, ‘क्राईम तक’, ‘न्यूज नेशन’ यांसारख्या राष्ट्रीय वाहिन्यांच्या बेजबाबदार आणि गलथान कारभारामुळे मराठमोळ्या अभिनेत्याचे ‘उमेश कामत’ यांचे नाव अश्लील व्हिडीओ प्रकरणी अटक झालेल्या राज कुंद्राशी जोडले गेले.
केवळ नाम साधर्म्य सोडता दोन्ही उमेश कामत नावाच्या व्यक्तींचा काहीएक संबंध नाही. त्या प्रकरणातील खरा उमेश कामत गुन्हे शाखेच्या अटकेतच आहे.
[…] हेही वाचा: अश्लील व्हिडीओ प्रकरणी राज कुंद्राच्… […]