‘झी हिंदुस्तान’ने उत्तर प्रदेशातील गोरखपूरमधील (Gorakhpur) चौरीचौरा परिसरातील घरावर पाकिस्तानचा झेंडा (Pakistani flag) फडकावला गेल्याची बातमी चालवली आहे. मुस्लिम व्यक्तीच्या घरावर हा झेंडा फडकवण्यात आल्याचे बातमीमध्ये सांगण्यात आले आहे.
‘झी हिंदुस्तान’चेच पत्रकार तुषार श्रीवास्तव यांनी देखील आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर अशाच प्रकारचा दावा करणारा व्हिडीओ पोस्ट केलाय.
याव्यतिरिक्त न्यूज नेशन, हिंदुस्तान स्मार्टच्या वेबसाईटवर देखील पाकिस्तानी झेंडा फडकविण्यात आल्यासंबंधीच्या बातम्यांना प्रसिद्धी देण्यात आली.
पडताळणी:
झी हिंदुस्तानच्याच बातमीतील घरावरील झेंडा लक्ष्यपूर्वक बघितला तर लक्षात येईल की घरावर फडकविण्यात आलेला झेंडा हा पाकिस्तानचा झेंडा नाही. पाकिस्तानच्या झेंड्याच्या डाव्या बाजूला पांढऱ्या रंगाची पट्टी असते, मात्र व्हिडिओतील झेंड्यावर पांढऱ्या रंगाची पट्टी दिसून येत नाही. व्हिडिओतील झेंडा हिरव्या रंगाचा आहे.
गोरखपूर पोलिसांकडून देखील संबंधित घटनेची माहिती देणारं ट्विट करण्यात आलं आहे. ट्विटमध्ये सांगण्यात आलंय की घरावर पाकिस्तानी झेंडा फडकविण्यात आल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी पोहचत शांतता प्रस्थापित करण्याचे काम पार पाडले. पोलिसांनी झेंडा ताब्यात घेतला असून पोलिसांच्या ३ टीमच्या माध्यमातून आवश्यक कारवाई करण्यात येत आहे.
चौरी चौरा पोलीस स्टेशनशी संबंधित पोलीस अधिकाऱ्याने ‘अल्ट न्यूज’शी बोलताना दिलेल्या माहितीनुसार पोलीस तपासादरम्यान प्रथमदर्शनी असे आढळून आले की ताब्यात घेण्यात आलेला झेंडा पाकिस्तानी झेंडा नसून इस्लामिक ध्वज आहे.
या प्रकरणात सुरुवातीला पोलिसांनी ४ जणांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर देशद्रोहाची केस दाखल केली होती. मात्र बीबीसीच्या १४ नोव्हेंबरच्या बातमीनुसार पोलिसांनी ताब्यात घेण्यात आलेल्या इसमांवरील देशद्रोहाची केस परत घेतली आहे.
बीबीसीच्या रिपोर्टनुसार घटना १० नोव्हेंबर रोजीची असून चौरी चौरा परिसरातील मुदेरा बाजारातील एका घरावरील इस्लामिक झेंड्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. व्हायरल फोटोतील घरावरील झेंडा पाकिस्तानचा असल्याचा दावा करण्यात आला होता.
वस्तुस्थिती:
‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की उत्तर प्रदेशातील गोरखपूर (Gorakhpur) येथील घरावर पाकिस्तानचा झेंडा (Pakistani flag) फडकविण्यात आल्याच्या बातम्या चुकीच्या आहेत.
घरावर फडकविण्यात आलेला झेंडा पाकिस्तानचा नसून इस्लामिक झेंडा असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. माध्यमांनी मात्र कुठलीही खातरजमा न करता घरावर फडकविण्यात आलेला झेंडा पाकिस्तानी असल्याच्या बातम्या प्रसिद्ध केल्या आहेत.
हेही वाचा- पाकिस्तानच्या विजयानंतर फटाके फोडणाऱ्यांना योगी सरकारने धडा शिकवल्याचे दावे फेक!
(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती आमच्या (9172011480) या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.
आपण फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता)
Be First to Comment