केंद्र सरकारने कोव्हीड१९ लसीकरणाची वयोमर्यादा ४५ ऐवजी आता १८ केली असून त्याची नोंदणी (registration for covid vaccine above 18) शनिवार दिनांक २४ एप्रिल पासून होणार असल्याच्या बातम्या विविध माध्यमांनी प्रसारित केल्या आहेत.
‘1 मे पासून 18+ सर्वांना मिळणार कोरोना लस, शनिवारपासून CoWin वर रजिस्ट्रेशनला सुरुवात’ या हेडलाईन खाली न्यूज १८ लोकमत
‘द टाईम्स ऑफ इंडीया‘, ‘द हिंदू‘ यांसारख्या माध्यमांनीही २४ एप्रिल रोजी नोंदणी चालू होणार असल्याच्या बातम्या दिल्या होत्या.
पडताळणी:
आम्ही सर्व बातम्या व्यवस्थितरीत्या वाचल्या असता त्यात एक समान धागा सापडला. या सर्व बातम्या राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आर. एस. शर्मा यांच्या हवाल्याने दिल्या आहेत.
शर्मा यांनी सदर माहिती नेमकी कुठे आणि कशा पद्धतीने दिली हे तपासत असताना ‘इंडिया टूडे’ने २२ एप्रिल रोजी त्यांची घेतलेली मुलाखत आमच्या हाती लागली. १ मे पासून १८ वर्षावरील नागरिकांना लसीकरण खुले होणार आहे, तर त्याविषयी नेमकी काय तयारी चालू आहे असा वृत्तनिवेदिकेने प्रश्न विचारला असता शर्मा यांनी उत्तर दिले होते.
- शर्मा नेमके काय म्हणाले?
” लसीकरणासाठीची नोंदणी पद्धत पूर्वीसारखीच राहणार असून, आतापर्यंत जसे ४५ वर्षाखालील लोकांना नोंदणी करता येत नव्हती ती आता ४८ तासांनी करता येणार आहे. हा एक महत्वाचा बदल होणार आहे”
– आर. एस. शर्मा (मुख्य कार्यकारी अधिकारी, राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण)
ती संपूर्ण मुलाखत युट्युबवर उपलब्ध आहे. व्हिडीओच्या १.२६ मिनिटाच्या पुढे आपण हे संभाषण ऐकू शकता.
मुलाखतीत शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार २२ एप्रिल पासून ४८ तासांनी ४५ वर्षाखालील आणि १८ वर्षावरील नागरिकांना नोंदणी (registration for covid vaccine above 18) करता येणार आहे, म्हणजेच २४ तारखेपासून नोंदणी शक्य असल्याचा दावा या वाक्यात आहे.
- केंद्र सरकारने या माहितीस चुकीचे जाहीर केले
केंद्र सरकारच्या ‘MyGovIndia’ या अधिकृत ट्विटर हँडलवरून ट्विट झालेल्या ग्राफिक्समध्ये २४ एप्रिल रोजी १८ वर्षावरील नागरिकांची लसीकरणासाठी नोंदणी सुरु असल्याच्या दाव्यास ‘Myth’ म्हंटले आहे. त्यात नोंदणीची खरी तारीख २८ एप्रिल असल्याचे सांगण्यात आले आहे.
वस्तुस्थिती:
‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये ‘वय वर्षे १८ पेक्षा जास्त असणाऱ्या नागरिकांना कोव्हिड लसीकरण नोंदणी शनिवार दिनांक २४ तारखेपासून करता येणार’ सांगणाऱ्या बातम्या चुकीच्या असल्याचे स्पष्ट झाले. ज्या राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आर. एस. शर्मा यांच्या हवाल्याने या बातम्या प्रसारित झाल्या; त्यांचेच वक्तव्य चुकीचे असल्याचे सांगत केंद्र शासनाने नोंदणी चालू होण्याची तारीख २८ एप्रिल असल्याचे जाहीर केले आहे.
हेही वाचा: योगी सरकारने पसरवल्या ‘हार्वर्ड विद्यापीठा’ने उत्तम कामगिरीची दखल घेतल्याच्या चुकीच्या बातम्या!
Be First to Comment