‘दैनिक लोकमत’ने ‘जय महाराष्ट्र’ उद्धव ठाकरे पुन्हा एकदा देशातील टॉप फाईव्ह मुख्यमंत्र्यांमध्ये’ या हेडलाईनसह बातमी प्रसिद्ध केलीये. (Uddhav Thackeray in top 5 CM)
कोरोना व्हायरसच्या संकटातही महाराष्ट्रातील परिस्थिती संयमाने हाताळणाऱ्या मुख्यमंत्र्यांमध्ये उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा टॉप फाईव्ह मध्ये स्थान पटकावलं आहे, असं लोकमत ने आपल्या बातमीत म्हंटलं आहे.
‘लोकमत’ने आपल्या बातमीचा सोर्स इंडिया टुडे आणि कार्व्ही इन्साईट्सचा ‘मुड ऑफ द नेशन’ सर्व्हेक्षण असल्याचं सांगितलंय.(Uddhav Thackeray in top 5 CM)
लोकमत व्यतिरिक्त सकाळ, महाराष्ट्र टाईम्स, न्यूज१८ लोकमत आणि झी २४ तास यांनीसुद्धा उद्धव ठाकरे टॉप ५ मुख्यामंत्र्यांपैकी एक असल्याचे सांगितले आहे.
याच सर्व्हेविषयीची ‘लोकसता’ची बातमी देखील आमच्या वाचनात आली, ज्यात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सातवा क्रमांक देण्यात आलाय.
पडताळणी:
मुख्य प्रवाहातील दोन महत्वाच्या वृत्तपत्रांमधील बातम्यांमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देण्यात आलेला वेगवेगळा क्रमांक बघून आम्ही पडताळणीस सुरुवात केली.
सर्वप्रथम तर आम्ही ‘लोकमत’ची बातमी व्यवस्थित वाचली. बातमीनुसार पहिल्या तीन क्रमांकावर अनुक्रमे योगी आदित्यनाथ, अरविंद केजरीवाल आणि वाय.एस. जगनमोहन रेड्डी विराजमान आहेत तर चौथ्या क्रमांकावर ममता बॅनर्जी असल्याचं लिहिलंय.
उद्धव ठाकरे आणि नितीश कुमार प्रत्येकी ७ टक्के मतांसह संयुक्तपणे पाचव्या क्रमांकावर असल्याचं ‘लोकमत’ने म्हटलंय.
त्यानंतर आम्ही दोन्ही बातम्यांचा मूळ सोर्स असणारा ‘इंडिया टुडे’चा ‘मुड ऑफ द नेशन’ सर्व्हे बघण्यासाठी इंडिया टुडेच्या वेबसाईटला भेट दिली. वेबसाईटवर या सर्व्हेच्या निष्कर्षासंबंधीची बातमी मिळाली. या बातमीमध्ये कुठल्या मुख्यमंत्र्याला किती टक्के मते मिळाली आहेत आणि त्यानुसार त्यांचा क्रमांक कितवा यासंबंधी माहिती देणारे ग्राफिक देखील देण्यात आले आहे.
‘मुड ऑफ द नेशन’ सर्व्हेची माहिती देणाऱ्या ग्राफिकनुसार पहिल्या चार क्रमांकावर अनुक्रमे योगी आदित्यनाथ, अरविंद केजरीवाल, वाय.एस. जगनमोहन रेड्डी, ममता बॅनर्जी विराजमान असल्याची खात्री पटली. पाचव्या क्रमांकावर मात्र ‘इतर’ आहे.
पाचव्या क्रमांकावरील ‘इतर’ या पर्यायाला ८ टक्के लोकांनी मत दिलं आहे. म्हणजेच त्या सर्व्हेसाठी मतदान केलेल्या ८ टक्के लोकांना सर्व्हेसाठी त्यांना उपलब्ध असलेल्या मुख्यमंत्र्यांच्या यादीपेक्षा इतर कुठल्यातरी मुख्यमंत्र्याला मत द्यायचं होतं.
आपल्या पसंतीचा मुख्यमंत्री यादीत नसलेल्या लोकांनी ‘इतर’ या पर्यायाची निवड केली असून अशी निवड करणारे जवळपास ८ टक्के लोक आहेत. या यादीत सहाव्या क्रमांकावर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचं नाव असून त्यांच्या खालोखाल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विराजमान आहेत. म्हणजेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सातव्या क्रमांकावर असल्याचं लक्षात येतंय.
यातही गोम अशी की नितीश कुमार आणि उद्धव ठाकरे या दोहोंनाही समसमान म्हणजे ७ टक्के लोकांनी आपली पसंती दर्शविली असल्याचं ‘मुड ऑफ द नेशन’ सर्व्हेची माहिती देणारं ग्राफिक सांगतं.
वस्तुस्थिती:
‘चेकपोस्ट मराठी’च्या बातमीत स्पष्ट झालं आहे की इंडिया टुडेच्या ‘मुड ऑफ द नेशन’ सर्व्हेची बातमी देताना ‘लोकमत’सह ‘सकाळ’, ‘महाराष्ट्र टाईम्स’, ‘झी २४ तास’, ‘न्यूज 18 लोकमत’ यांनी आपल्या बातम्यांमधून मुख्यमंत्र्यांना टॉप फाईव्ह मध्ये स्थान मिळाल्याचं सांगत वाचकांची दिशाभूल केली आहे.
‘लोकसत्ता’च्या बातमीनुसार मुख्यमंत्री सातव्या स्थानावर असल्याच म्हणणं देखील तितकंसं बरोबर नाही.
‘मुड ऑफ द नेशन’ सर्व्हे’ नुसार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यासह संयुक्तपणे सहाव्या स्थानावर आहेत.
हेही वाचा: ‘महाराष्ट्रात ‘जय श्रीराम’चा घोष करणाऱ्यांवर कारवाई’ म्हणत भाजप कार्यकर्ते पेरतायेत अफवा!
[…] […]